सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आंदोलनातल्या शेतकऱ्यांना मी मरायला सांगितलं काय – नरेंद्र मोदी.

meghalaya governer satyapal malik

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हरियाणामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, मोदी आणि त्यांच्यात शेतकरी आंदोलनाच्या वेळी झालेल्या चर्चेचा तपशील सार्वजनिक केला आहे. मोदींच्या शेतकरी भूमिकेवर भाष्य करून मलिकांनी खळबळ उडवून दिली आहे.

मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. मलिक कधीही हातच राखून बोलत नाहीत. त्यांच्या मनात येईल ते बिनधास्त बोलणारे नेते म्हणून सत्यपाल मलिक प्रसिद्ध आहेत. स्वपक्षाच्या विरोधी भूमिका घेताना देखील मलिक कसलीही पर्वा करत नाहीत. काल त्यांच्या गृहराज्य हरियाणा मध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मलिकांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात झालेल्या बैठकीचा तपशील जाहीर केला. शेतकरी आंदोलनाच्या विषयी चर्चा करायला गेल्यावर मोदींनी शेतकऱ्यांविषयी अनास्था दाखवल्याचे सत्यपाल मलिकांनी म्हंटले आहे.

शेतकरी आंदोलनाचा निकाल लावावा म्हणून मोदींची भेट.

सत्यपाल मलिक मूळचे हरियाणाचे. जम्मू काश्मीरला राज्यपाल म्हणून जाण्याअगोदर मलिक हरियाणाच्या राजकारणात सक्रिय होते. शेतकरी आणि राज्याच्या प्रश्नावर मलिकांचे बारीक लक्ष असायचे. त्यामुळे मलिक राज्यपाल झाले असले तरी त्यांचे हरियाणाच्या परिस्थितीवरून लक्ष हटले नव्हते. आपल्या राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असल्यामुळे मलिक शेतकरी आंदोलन संपवावे म्हणून आग्रही भूमिका घेत होते. वेळोवेळी सत्यपाल मलिक पंतप्रधान आणि सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवावे म्हणून विनंती करत होते. आपण केलेल्या मागणीला यश मिळत नाही हे जाणवल्यावर मालिकांनी पंतप्रधान मोदी यांची वेळ मागितली आणि शेतकरी प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली.

भेटीत बाचाबाची आणि मोदींचे वादग्रस्त विधान

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करताना मालिकांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. मागच्या एक वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत त्यामुळे सरकारने लक्ष घालून आंदोलन संपवले पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची असल्याची भूमिका मालिकांनी मोदींच्या पुढे ठेवली. मालिकांच्या भूमिकेशी सहमत होऊन मोदी यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिले. पण मालिकांनी चर्चा पुढे नेत आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवारांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी भूमिका घेतली. नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर मात्र मोदी आणि मालिकांमध्ये मतभेद झाले. नुकसान भरपाई साठी मोदी तयार नव्हते.
नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या परिवाराला मिळायलाच पाहिजे कारण त्यांच्या घरातला कर्ता माणूस त्यांनी गमावला असल्याची भूमिका मालिकांनी रेटायचा प्रयत्न केल्यावर मात्र मोदींनी वादग्रस्त भूमिका घेतली. मोदी म्हणाले,”शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल सरकारला सहानभूती आहे मात्र त्या शेतकऱ्यांना आम्ही आंदोलन करायला लावले नव्हते त्यामुळे त्यांचा मृत्यू काही सरकारमुळे झाला नाही आणि त्यांना मी मरायला सांगितले नव्हते.”
मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल घेतलेली भूमिका मालिकांना अपेक्षित नव्हती. त्यामुळे मालिकांनी मोदींचा निरोप घेतला आणि आता हरियाणा मध्ये पत्रकारांना बोलताना त्या बैठकीचा तपशील जाहीर करून मालिकांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.