“हॅलो सर मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलते आहे. तुमचं डेबिट कार्ड एक्सपायर झालं आहे. कार्ड चालू ठेवण्यासाठी तुमचा कार्ड नंबर आणि तीन अंकी CVV नंबर सांगा.” हे असे कॉल कधी ना कधी तुम्हाला आले असणार. तुम्ही जाणकार असाल असं मी समजतोय पण असे किती लोक असतील जे या सापळ्यात अडकले आणि मोठं आर्थिक नुकसान करून बसले. हे फोन करणारी पोरं कोण असतात कधी विचार केला का ? याच्या मुळात थोडं जाऊ मग थोडा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नेटफ्लिक्स वर जामताडा नावाची वेब सिरीज बघितली नसेल तर बघायला घ्या. सिरीज एवढी काय दमदार नसली तरी जामताडा मधील अडाणी पोरं चांगल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना कसं गंडवतात हे बघायला मजा येईल. जेव्हा तुम्हाला कळेल कि फक्त वेब सिरीज मध्ये घडलं नाही तर वास्तवात घडलं म्हणून वेब सिरीज मध्ये आलं तर फ्युजा उडतील. जामताडा नकली गाव नाही तर वास्तवात झारखंड मधील हे पोरं जामताडा नावाच्या गावातून हे सगळे कुटाने करतात.
दहा वर्षांपूर्वी जामताडा गाव चर्चेत आलं. या सगळ्या पोरांचा म्होरक्या सीताराम मंडल कामासाठी मुंबईत आला होता. या काळात तो एक मोबाइल दुकानात कामाला राहिला. इथे त्याला सायबर गुन्हेगारीचं ज्ञान आलं. बँक खातेदारांना कसं गंडवता येईल याचं त्याने प्रशिक्षणच घेतलं. खोट्या नावाने सिम कार्ड घ्यायचे. लोकांना बँकेचे मॅनेजर म्हणून कॉल करायचा थोडं फार घाबरवून ATM वरील माहिती मागायची आणि पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे. हे लोक भलतेच हुशार स्वतःच्या खात्यात हे पैसे टाकत नसायचे. त्यामुळे पैसे कोणच्या खात्यात गेले हे जरी शोधलं तरी तो माणूस हे म्हणू शकायचा कि मला याची काही कल्पना नाही
यांचा म्होरक्या पोलिसांच्या हाताला लागला पण पोलिसांना गुन्हा सिद्ध करणे अवघड गेले आणि हा सुटला. सुटल्यानांतर हा गावाला म्हणजे जामताडाला गेला. इथे त्याने बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले. चौथी पाचवी शिकलेले हे पोरं मुलगा मुलगी दोन्ही आवाजात लोकांना गंडवायचे. हे सगळं जंगलात बसून करायचे. चुकून पोलीसांना खबर लागली तर गावातील बायका आधीच माहिती पुरवायच्या. पोलिसांनी पकडलं जरी तर ही सगळी मुलं अठरा वर्षाच्या आतील. आरोप सिद्ध करायचं म्हणलं तर त्यांच्याविरोधात एकही पुरावा नाही. एकदा पोलीस स्टेशन मधून चक्कर मारली कि भीती निघून जाते. दिवसेंदिवस यांचा आत्मविश्वास इतका वाढला कि यांनी मुख्यमंत्र्याच्या बायकोला २३ लाखाला गंडवल.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग याच्या पत्नीला बँकेचा मॅनेजर म्हणून कॉल केला आणि २३ लाख रुपये त्यांच्या खात्यातुन काढले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला फसवायला हे पोरं घाबरत नाही यावरून अंदाज घ्या हे किती लांबवर पोहचले आहेत. सामान्य लोकांना तर यांनी फसवलंच पण अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी सहज गंडवलं. हळू हळू लोक जागृत व्हायला लागले. म्हणून काय यांनी धंदा बंद केला नाही. अस्सल इंग्रजी बोलणाऱ्या मुलींना त्यांनी नोकरीला घेतलं. वेगवेगळ्या राज्यात अनाधिकृत कॉल सेंटर उभे केले. हे अँप टाका ते अँप आलंय असं सांगून लोकांना फसवणं चालूच ठेवलं.
पोलिसांनी ४०० च्या जवळपास मुलांवर नजर ठेवली पण काही विशेष फायदा झाला नाही. ज्या मुलांनी खूप सारी संपत्ती कमी काळात विकत घेतली त्याच्यावर पोलिसांची रडार आहे. ठोस अजून तरी काही हाती लागलं नाही म्हणून तूर्तास तरी यांच्यापासून वाचायचं असेल तर काळजी घ्या अनोळखी नंबरला कसलीच माहिती देऊ नका.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?