कुष्ठरोग हा भारतीय समाजात अतिशय भयंकर मानला गेलेला रोग आहे. पण वास्तव तसं नाही. मनोहर दिवाण कोण होते याआधी कुष्ठरोगाबद्दल थोडक्यात माहिती बघू.
कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या प्रसाराबाबत निरनिराळे गैरसमज रूढ आहेत. कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषधोपचारांमुळे तो पूर्णत: बरा होतो. त्यामुळे समाजाचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी याची योग्य माहिती समजून घेणे, इतरांना देणे आणि गैरसमज, भीती दूर करणे गरजेचे आहे.
कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जंतूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगाची सांसर्गिकता ही शरीरातील कुष्ठजंतूच्या प्रमाणावर अवलंबून असते. दृष्य स्वरूपातील विकृती किंवा विद्रूपतेवर नाही. कुष्ठरोग हा महारोग नसून स्पर्शाने मुळीच पसरत नाही. उपचार न घेतलेल्या संसर्ग झालेल्या कुष्ठरुग्णांकडून जंतूचा प्रसार हवेमार्फत होतो. केवळ औषधोपचोर न घेतलेल्या कुष्ठरुग्णांकडूनच या रोगाच्या जंतूचा प्रसार होतो. कुष्ठजंतूंचा हवेमार्फत शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत: तीन ते पाच वर्षांनंतर प्राथमिक लक्षणे शरीरावर दिसायला लागतात. कुष्ठरोगाचे जंतू मुख्यत्वे चेतातंतू आणि त्वचा यावर आघात करतात. कुष्ट रोग्याच्या हाय पायांवर चट्टा उठून येतात. हळू हळू या भागांची संवेदना संपून जाते. चट्टा उठलेली जागा मोठी होत जाऊन त्या भागावर जखमा दिसायला लागतात. या जखमा वाढत जाऊन तो भाग हळूहळू गाळून पडतो. कधी पहिलं असेल तर लक्षात येईल कि कुष्ठरोग्यांच्या हात पायांची बोटे झडलेली असतात. दिसायला हे चांगलं वाटत नाही म्हणून या आजाराबद्दल अनेक गैरसमज समाजात आहेत. मागच्या जन्मीचे पाप म्हणून हा आजार होतो असा समज पूर्वीच्या लोकांमध्ये होता. पण अशा गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. गेल्या काही वर्षात याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती आली आहे. त्यामुळे या बद्दलचे गैरसमज दूर करून सर्वसाधारण आजारासारखे याकडे बघितले पाहिजे.
कुष्ठरोगाबाबद्दल त्याकाळात अनेक अफवा होत्या या लोकांना मदत करायला कोणी तयार नव्हतं. यांच्या झडलेल्या शरीराकडे बघून लोक यांना वाळीत टाकायचे परिणामी या लोकांना भीक मागितल्याशिवाय काही पर्याय नव्हता. कुष्ठरोगी लोकांना त्यांचा मसिहा लवकर मिळणे गरजेचे होते. अशातच गांधीजींच्या एका सहकाऱ्याला कुष्ठरोग झाला. यामुळे याबद्दल काही तरी केले पाहिजे असं गांधींनी बोलून दाखवले. यातूनच कुष्ठरोग्यांना त्यांचा पहिला मसीहा मिळाला तो म्हणजे मनोहर दिवाण !
कोण होते मनोहर दिवाण
मनोहर दिवाण हे गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यपूर्व काळात मनोहर दिवाण गांधीजींच्या विचाराने खूप भारावलेले होते. मॅट्रिक नंतर सरकारी नोकरी सहज मिळत असताना त्यांनी गांधींबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. देशसेवा अग्रक्रमावर ठेवून त्यांनी शिक्षण सोडले आणि याच कामात स्वतःला वाहून घेतले. याच काळात गांधीजींचे सहकारी परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोगाची लागण झाली. गांधींनी जवळून या रोगाची भीषणता अनुभवली. १९२५ साली गांधींनी कटक येथील कुष्ठरोगी सेवा केंद्राला भेट दिली आणि अजून यावर काम केलं पाहिजे असं सांगितलं. विनोबा आणि महात्मा गांधी मनोहर दिवाण यांच्यासाठी आदर्श होते त्यांनी गांधींच्या शब्दाला प्रमाण मानून १९३६ साली वर्धा जिल्ह्यात पहिले कुष्ठरोग सेवा केंद्र चालू केलं. ‘महारोगी सेवा समिती’ असं या केंद्राचं नाव होतं.
मनोहर दिवाण यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचं व्रत घेतलं म्हणून कुष्ठरोग्यांबद्दल चर्चा आणि सहानुभूती वाढली. या प्रक्रियेत अनके कार्यकर्ते तयार झाले त्यात सगळ्यात मोठं नाव म्हणजे बाबा आमटे ! बाबा आमटे यांचं काम मोठं आहे पण यामागची प्रेरणा सुरु झाली ती मनोहर दिवाण यांच्यापासून. मनोहर दिवाण हे पहिले भारतीय होते ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरुवात केली. १५ फेब्रुवारी १९८० ला मनोहर दिवाण अनंतात विलीन झाले. त्यांच्या स्मृतींना त्यांचे कार्य समजून घेऊन उजाळा देऊ. त्यांच्या कार्यास अभिवादन !
हे पण वाचलं पाहिजे
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?