सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पाण्यासाठी दोन-तीन लग्न करणारं डेंगणमाळ गाव महाराष्ट्रात आहे

water-wives-in-maharashtra-marathi

“पहिली बायको मुलं सांभाळत होती. दुसरीला पाणी आणायला जा म्हणलं तर ती आजारी होती. म्हणून मला तिसरं लग्न करावं लागलं.” तीन लग्न का केले असं विचारल्यावर डेंगणमाळ गावचा सखाराम भगत सांगत होता. डेंगणमाळ गावातील ही काय फक्त सखाराम भगतची गोष्ट नाही. या गावात जवळपास सगळ्याच घरात एका पुरुषाला किमान दोन बायका आहेत.

लग्नाचा कायदा सांगतो दोन लग्न करू नका पण गावकर्यांना त्याचं काही सोयर सुतक नाही. ते कळणार कसं सततचा दुष्काळ आणि पाण्याची सोय पण नाही हे डेंगणमाळच वास्तव. दोन चार किलोमीटर पायपीट केल्याशिवाय पाणी नजरेला पडत नाही. गावातील सर्व कुटुंबाना पाणी सोन्याच्या भावात मिळाल्यासारखं वापरावं लागतं. पाणी तर सगळ्यांनाच लागत ना पण ते आणणार कोण तर घरच्या स्त्रिया आणि मुलं. आम्ही पण लहान असताना आई सोबत पाणी आणायला जायचो. हा पण डेंगणमाळ गाव सारखे आमच्या गावात कोणाला दोन तीन लग्न करावे लागले नाहीत.

डेंगणमाळ हे गाव मुंबईपासून १५० किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबईसारख्या शहरात एखाद्या दिवशी पाणी नाही आलं तर ती ब्रेकिंग न्यूज असते. पण डेंगणमाळ सारख्या गावात कित्येक वर्ष पाणी नसलं तरी काही बिघडत नाही. उपकार म्हणून सरकारने गावात वीज पोहचवली पण पाणी पोहचवायला अजून एखादी पिढी संपल्याशिवाय काही मुहूर्त लागणार नाही असं दिसतंय. हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या गावाला कोणता पुढारी गंभीर घेणार म्हणून लोकांनी स्वतःच विहीर खोदली. मात्र त्यामुळे समस्या संपली नाही. विहिरीत पाणी भरण्यासाठी दुसऱ्या विहिरीतून आठवड्यातून दोन वेळा पाणी आणावं लागतं, ते पण पिण्यालायक नसतं. हे पाणी घरकामासाठी आणि जनावरांसाठी उपयोगाला येतं. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपत नाही. शुद्ध आणि स्वच्छ पाण्यासाठी पायपीट करावीच लागते. प्रश्न खूप गंभीर बनला होता त्यामुळे गावातील पुरुषांनी एका वेगळाच मार्ग शोधून काढला. गरज ही शोधाची जननी आहे या वाक्याचा अर्थ डेंगणमाळ गावातील तथाकथित संस्कृती रक्षक पुरुषांनी वेगळ्याच पद्धतीने पुढे आणला. पाण्याच्या गरजेच्या नावाखाली पुरुषांनी लग्न करण्याचा सपाटा लावला. पाणी आणायला घरात जास्तीची व्यक्ती म्हणून पुरुष दोन तीन लग्न करायला लागले. पुरुषाचा यात फायदाच आहे त्यामुळे साहजिकच पुरुषांनी या गोष्टीचं समर्थन केलं असणारं पण स्त्रिया अगोदर एक बायको जिवंत असतानाही त्या पुरुषाशी दुसरं लग्न करायला तयार कसं काय झाल्या हा प्रश्न पडतो?

पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मुळाशी गेलं तर लक्षात येईल कि या बायका लग्न झालेलं असतानाही या पुरुषांबरोबर लग्न करायला तयार का होतात. या पुरुषांबरोबर लग्न करणाऱ्या बायका बऱ्यापैकी विधवा आहेत. काही स्त्रियांना घरच्यांनी सोडलं आहे तर काही स्त्रियांच्या त्यांचे नवरे सांभाळायला तयार नाहीत. अशा स्त्रियांना ग्रामीण भागात अनेक आरोपांना सामोरे जावं लागतं. विशेषतः चारित्र्या संबंधी प्रश्न स्त्रियांना समाजात मानाने जगू देत नाहीत. अशावेळी या स्त्रिया लग्न झालेल्या पुरुषांशी सुद्धा सहज लग्न करायला तयार होतात. नाईलाज म्हणून लग्न केले असले तरी खूप स्त्रिया लग्नामुळे आनंदी असल्याचं सांगतात. एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर गावातील लोक आनंद व्यक्त करतात कारण पाणी आणायला मुलगी झाली याचं समाधान त्यांना होतं.

पुरुषाच्या पहिल्या पत्नीनंतरच्या बायका या फक्त औपचारिकता म्हणून लग्न करतात. बऱ्यापैकी या स्त्रियांची घरातच वेगळी राहण्याची सोय केली जाते. काही स्त्रियांना तर त्यांच्या पतीशी संबंध ठेवायला सुद्धा परवानगी नसते. समाजात मानाने जगायला मिळेल आणि चारित्र्यावर डाग लागला जाणार नाही या भावनेने त्या लग्न करतात. पुरुष बऱ्यापैकी आसपासच्या शेतीत मजूर म्हणून काम करतात तर स्त्रिया घरातील काम करतात. घर कामानंतर त्यांचा जास्तीत जास्त वेळ पाणी आणायला वापरतात.

बहुपत्नीत्व भारतात कायदेशीर नाही तरी सुद्धा एक संशोधना नुसार दोन टक्के महिला पहिली पत्नी हयात असणाऱ्या पुरुषांसोबत विवाहबंधनात आहेत. यावरून बहुपत्नीत्व ही खूप रुजलेली आणि समाजमान्य संकल्पना आहे हे लक्षात येईल. एका पुरुषाच्या दोन तीन बायका असतील तर त्यांचे जीवनमान काय दर्जाचे असेल हे विचार करून बघा. या स्त्रिया कितीही म्हणत असतील कि त्या खुश आहेत तर ते तितकं खरं नाही. समाजातील कोणत्याही घटनेचा सगळ्यात जास्त परिणाम स्त्रियांच्या आयुष्यावर होतो. पाण्यासाखी जीवनावश्यक गोष्ट शासन लोकांना उपलब्ध करून देत नसेल तर यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक वेगळी जीवनपद्धती निर्माण होते ज्यात सगळ्यात जास्त शोषण स्त्रियांचं होतं.

महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. सरकारी अंदाजानुसार १९००० हून अधिक गावांना पाणी उपलब्ध नाही. फक्त एका डेंगणमाळ गावातील परिस्थिती आपल्यासमोर आली. अजून कित्येक गावांमध्ये जिथे मूलभूत सुविधा नाहीत तिथे कोण कोणते प्रश्न निर्माण झाले असतील, अंदाज लावणे सुद्धा अवघड आहे.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.