झोपडपट्टीतील भारत आणि झोपडपट्टीबाहेरचा भारत यामध्ये मोठी भिंत आहे. झोपडपट्टीतील लोकांना ही भिंत पार करून जाणे अवघड आहे. झोपड्पट्टीबाहेरच्या लोकांनी ही भिंत तोडली तरच झोपडपट्टीतील लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न कळेल. नागपूरच्या विजय बारसे या माणसाने ही भिंत ओलांडली म्हणून झोपडपट्टीतील मुलांना नवीन आयुष्य मिळालं.
आता प्रश्न आहे प्रेक्षकांना ती भिंत ओलांडायला जमतंय का? नसेल जमत तर नागराजचा सिनेमा म्हणजे एका झुंडीची दुसऱ्या झुंडीला प्रतिक्रिया वाटेल
झुंड बघताना कोणत्याही झुंडीचा भाग बनून चित्रपट बघणार असाल तर गफलत होईल. हा झुंडीचा नाही तर माणसांचा विषय आहे.
मोठं मोठ्या बिल्डिंग शेजारी कोणत्याही शहरात झोपडपट्या असतात. लोक कष्ट करत नाहीत म्हणून गरीब आहेत हे एकविसाव्या मजल्यावरून झोपडीकडे पाहणाऱ्या श्रीमंताच्या डोक्यात निर्माण झालेलं सगळ्यात फालतू तत्त्वज्ञान आहे. गरिबाला गरीब करण्यात श्रीमंतांचा वाटा मोठा असतो हे अजून त्याला मान्य नाही. गरिबाला कष्ट करा आणि मोठे व्हा, हे सांगणं सोपं आहे. पण त्याला तेवढे संसाधने आणि संधी देण्याची जबाबदारी कोणाची ? नागराज मंजुळे झुंड चित्रपटात हे बोलून सांगत नाही तर वास्तवात दाखवतो. ‘झुंड’ मध्ये बटबटीत डायलॉग मारून झोपडपट्टीतील गरिबी दाखवली नाही. चित्रपटात मुलं घरातून बाहेर पडताना गटार ओलांडताना दिसतील. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टर नसलेल्या घरांसमोर प्लॅस्टिकच्या बरणीचा फ़ुटबाँल खेळताना दिसतील. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर नागराजच्या झुंडीतील माणसांच्या आयुष्याचा थोडाफार अर्थ सापडेल.
फॅन्ड्रीमध्ये अस्तित्व शोधणारा जब्या झुंड मध्ये अस्तित्व निर्माण करतोय
नागराज मंजुळे चित्रपटात प्रस्थापित नियम मोडतो अशी नागराजची प्रतिमा आहे. यामुळे नागराजला समजून घेताना काही जणांना अडचण होणार हे नक्की. नागराजच्या चित्रपटात हिरोला मोठं दाखवलं जात नाही. कारण यामुळे मुख्य विषयांना बगल मिळते आणि हिरोची चर्चा जास्त होते. नागराज विषयाला धरून असतो त्यामुळे अमिताभ सारखा महानायक चित्रपटात मुख्य भूमिकेत असूनही हिरो एखादी गोष्ट पसंद पडली नाही म्हणून शंभर लोकांचा भुगा करत नाही. प्रत्येक घटना इतकी वास्तविक दाखवली आहे कि संपूर्ण चित्रपटात थोडी सुद्धा शंका येणार नाही. अमिताभ चित्रपटाचा नायक वाटत असला तरी कथा अमिताभ भोवती फिरत नाही. चित्रपटाची खासियतच ही आहे कि हिरो कोणी नाही. अँग्री यंग मॅन अमिताभ संपूर्ण चित्रपटात एकदाही रागावला नाही. अमिताभने साकारलेली विजय बारसे यांची भूमिका अहंकारात गुरफटणारी नाही. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलच्या मार्फत सुधरवणे हा मुख्य हेतू आहे. कोर्टातील प्रसंगात सुद्धा अमिताभ झोपटपट्टीतील मुलांची बाजू मांडताना अतिशय नम्र आणि तळमळीने बाजू मांडतोय. बोलण्यातील आक्रमकता अमिताभ पूर्णपणे गुंडाळून संवाद करतोय. विजय बारसे या माणसाचा हेतू स्पष्ट आहे त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीवर गरज नसताना मत व्यक्त करत नाही.
त्याचपद्धतीने इतर कलाकार आमच्यावर लय अन्याय झाला हे सतत रडगाणं गात नाही. प्रत्येक पात्र त्याचं रोजचं जगणं त्याच्या हावभावातून मांडतोय. आहे त्या परिस्थितीत जगण्यापूरतं तत्त्वज्ञान प्रत्येकाकडे आहे. एक गोष्ट अजून नमूद करण्यासारखी आहे ते म्हणजे पात्रांची ओळख अर्धा चित्रपट संपल्यावर केली गेली आहे. सहसा चित्रपटात पात्रांची ओळख पहिल्या दहा मिनिटात सांगितली जाते. नागराजने पात्रांच्या चालण्या बोलण्याच्या पद्धतीवर इतक्या बारकाव्याने लक्ष दिले आहे कि एखाद्या पात्राचं नाव काय आहे हे माहित नसतं पण तरी तो डोक्यातून जात नाही. यासाठी नागराजने चांगलीच मेहनत घेतली आहे. चित्रपटाबद्दल काही मत असू देत तरी चित्रपटातील प्रत्येक पात्र तुम्हाला आवडेल इतका वास्तविक अभिनय प्रत्येकाने केला आहे. नागराज नवीन कलाकारांना शोधून अस्सल टॅलेंट समोर आणतोय त्याबद्दल नागराजचे विशेष कौतुक केले पाहिजे.
चित्रपटाची कथा ट्रेलर बघून समजली असेलच पण कथेच्या माध्यमातून नागराजला काय सांगायचं आहे ते जास्त समजून घ्या. झोपडपट्टीतील एक मुलगा मरतो तेव्हा बॅकग्राऊंडला ‘सारे जहाँसे अच्छा…’ ही टोन वाजते. देशासाठी योगदान दिलेल्या लोकांसाठी ही अशी गाणी आजवर बॅकग्राऊंडला वाजली. पण झोपडपट्टीत हलाखीत जगणाऱ्या माणसाचं या देशासाठी काहीच महत्व नाही का? हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. या देशात जगणाऱ्या प्रत्येक माणसाचं या देशासाठी योगदान आहे पण काहीच लोकांचं महत्व अधोरेखित केलं जातं. इंग्लिश शाळेच्या गेटवर वॉचमन फ़ुटबाँल खेळतो तेव्हा क्रीडा शिक्षक त्याला खवळतो आणि ‘सांगितलं ते काम कर’ असा दम देऊन फ़ुटबाँल हिसकावून घेऊन जातो. झोपडपट्टीतील मुलांनी स्वप्न पाहायची नाहीत हे आधीच ठरवलं असेल तर त्यांना संधी मिळण्याची खात्रीच उरत नाही. मुलं चोऱ्या करतात, दारू पितात म्हणून वाया गेली आहेत हे बोलून समाज जबाबदरी झटकतो, पण यापेक्षा वेगळं आयुष्य असतं हे त्यांना कोण सांगणार? आणि वेगळ्या आयुष्यसाठी त्यांना तयार कोण करणार? शाळेतील मुलांचा आणि झोपडपट्टीतील मुलांचा फुटबॉल सामना होण्यापूर्वी समाजाच्या दोन वर्गातील भिंत किती मोठी आहे हे जवळून अनुभव घ्यायचा असेल तर झुंड बघाच.
३२ वर्षे लागली आंबेडकरांना चित्रपटाच्या फ्रेम मध्ये यायला
श्रीमंत घरातील मुलगी झोपडपट्टीतील मुलाच्या प्रेमात कसं काय पडते? ही बाब काही लोकांना खटकली. आजवर चित्रपटात रंगवलेल्या खूप प्रेम कथा समाजातील विषमतेचे सतत प्रदर्शन करतात. निळू फुले म्हणाले का खात्रीने सांगता येणार नाही पण त्यांच्या नावाने एकदा वाचण्यात आलं होतं कि प्रेम ही भांडवली कल्पना आहे कारण मुलींच्या स्वप्नात राजकुमार येतो कामगार कधीच येत नाही. प्रेमासारखी सुंदर कल्पना सुद्धा हिशोब करून ठरवणार असेल तर अवघड आहे. फॅन्ड्री असू दे कि सैराट नागराज या कल्पनांना छेद देतोय. चित्रपटांचा नायक समाजाच्या प्रत्येक घटकात लपला आहे. नागराजने त्या नायकांना मुख्य प्रवाहात चर्चेला आणलं, हे नागराजचं मोठं योगदान मानावं लागेल.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ३२ वर्षे लागली आंबेडकरांना चित्रपटाच्या फ्रेम मध्ये यायला. जब्बार पटेलांनी चित्रपटात आंबेडकरांच्या फ्रेम वापरण्याचा खरा पाया रोवला. नागराज आज या पायावर कळस चढवतोय. मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांना आंबेडकर एवढे का झोंबत होते कळायला मार्ग नाही. बॉलीवूडला इतक्या वर्षात जे जमलं नाही ते दक्षिणेतील काही दिग्दर्शकांनी आंबडेकर चित्रपटाच्या फ्रेम मध्ये आत्मविश्वासाने दाखवले. रजनीकांत सारख्या मोठ्या अभिनेत्याला घेऊन त्यांनी चित्रपट बनवले.
सौंदर्याच्या कल्पना बदला सांगणारा चित्रपट
राम मनोहर लोहिया म्हणायचे जे लोक तुमच्यावर राज्य करतात ते लोक सौंदर्याचा मापदंड ठरवतात. आफ्रिकेतील एखाद्या देशाने भारतावर राज्य केलं असतं तर गोऱ्या रंगाचं भारतीय लोकांना एवढं आकर्षण राहिलं नसतं. नायक-नायिका अभिनयात कसेही असो गोरे असले पाहिजेत ही आपल्या चित्रपटांची मुख्य गरज ! नागराजच्या चित्रपटातील नायक नायिका हे अस्सल भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. झुंड मध्ये झोपडपट्टीतील मुलं आपल्या खूप जवळची वाटतात. त्यांच्या वेषभूशा केशभूषा बघून सगळी जवळची माणसं वाटतात. नागराजच्या सिनेमात कोणतंही पात्र वास्तवापासून दूर गेलेलं नसतं. चेहऱ्यावर ओरखडे असतील किंवा अपंग असेल यात नकलीपना नसतो. झुंड ही कथा मला माझ्या जवळच्या माणसांची वाटते.
चित्रपट फक्त मनोरंजनासाठी असतात पण त्याचबरोबर प्रेक्षकांना चांगल्या कलाकृतीसाठी शहाणं करत राहणं ही पण चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी असते. बॉलीवूडने मसाला चित्रपटाच्या नावाखाली चित्रपटांचं खूप नुकसान केलं आहे. अशा वेळेस झुंड आशा निर्माण करतोय. ‘झुंड’ झुंडीने बघायला लागतोय.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत