सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सत्य सरळ आणि शुद्ध नाही हे सांगणारा विद्या बालनचा ‘जलसा’

jalsa-movie-review-in-marathi

न्यूटन चित्रपटात राजकुमार रावला संजय मिश्रा एका प्रसंगात म्हणतो, “तू इमानदार आहेस ही तुझी अडचण नाही इमानदार असल्याचा अहंकार ही तुझी अडचण आहे.” सत्याचा अहंकार सुखावणारा आहे जोपर्यत सत्याची अपेक्षा तुम्ही इतरांकडून करता. वरील या दोन ओळीचा अर्थ शोधणारी कथा म्हणजे ‘जलसा’.

एका डिजिटल माध्यमाची सेलिब्रिटी पत्रकार माया मेनन (विद्या बालन) आणि तिच्या घरात काम करणारी रुकसाना (शेफाली शाह) यांची मुख्य भूमिका असलेला ‘जलसा’ हा चित्रपट. माया आणि रुकसाना समाजाच्या श्रीमंत आणि गरीब या दोन बाजू. दोघीही आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करताय. माया जगण्याचा प्रश्नाच्या पलीकडे गेली आहे. तिच्या चॅनेलवर एखाद्या बेईमान माणसाची चिरफाड करताना तिचा अहंकार सुखावतोय. माया मेनन एका अठरा वर्षाच्या मुलीला रात्री गाडीने उडवते. तिचा हेतू तिला मारण्याचा नव्हता पण स्वतःच्या हातून अपघात झालेला असताना माया तिथून पळ काढते. दुसऱ्याकडून सत्य वदवून घेणारे लोक स्वतःच सत्य नाकारत कसं पुढे चालतात, हे बघायचं असेल तर जलसा एकदा बघायला हरकत नाही. माया मेनन हिचा अंतर्गत कलह विद्या बालनने जय पद्धतीने साकारला आहे ते चित्रपट बघताना नोंद करायला विसरू नका. सुरुवातीच्या अर्ध्या तासात जगाची फिकीर न करणारी माया पुढच्या भागात इतकी असाह्य का वाटते, या प्रश्नांचा उलघडा हा चित्रपटात बघायला मिळतो.

विद्या बालन पेक्षा थोडी का होईना पण जास्त प्रभावी कोण असेल तर रुकसाना साकारणारी शेफाली शाह. शेफाली चित्रपटात खूप कमी बोलताना दाखवली आहे. तिचे हावभाव बघून तिला जे काही सांगायचं ते तुम्हाला कळून जाईल. मुलगी मरणाच्या दारात उभी असताना दवाखान्यात भेटायला येणारी माणसं विचारतात कि एवढ्या रात्री मुलगी बाहेर काय करत होती. मुख्य प्रश्न काय आहे हे आपल्याला कधी कळणार? मुलगी मारणारे मोकाट फिरले तरी चालतील पण ती बाहेर का फिरत होती हे कळणं जास्त महत्वाच ! रुकसाना आई म्हणून अशा वेळेस खंबीर पणे प्रत्येकाला उत्तर देते. शेफाली शाहच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवण्यासाठी जलसा बघा.

मुंबईच्या प्रत्येक चौकात माया मेनन (विद्या बालन) हिचे फ्लेक्स आहेत. ती सेलिब्रिटी पत्रकार आहे. तिच्यासाठी रुकसानाच्या मुलीचं अपघात प्रकरण दाबणे फार अवघड नाही. प्रत्येक घटनेला माणूस त्याच्या सोयीने बघतो. चांगुलपणा टिकावा म्हणून पाप करणारी लोकं पहिली असतील. विद्या बालन ही एकमेव तशी या चित्रपटात नाही. निवृत्त होणारा पोलीस हे प्रकरण का मिटवा म्हणतोय हे बघितलयवर डोक्यात मारून घ्याल. रुकसानाच्या मुलीचा दोष काय होता समजणार नाही पण तरीही तिला न्याय मिळवून देणारे सगळेच न्याय देताना तडजोड का करत होते? जे झालं ते मांडायला माया मेनन सोडली तर बाकीच्यांना काय अडचण असणार ? तरीही या प्रकरणाला वेगळी वळणं मिळतात. अशा कथा पहिल्यादांच पाहताय असं अजिबात नाही पण यावेळेस कथेचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न करा. सत्य सरळ आणि शुद्ध नाही हे सांगण्याचा प्रयत्न करणारा ‘जलसा’ आहे.

कोणाला आवडणार नाही ?

मसाला चित्रपटासारखं खिळवून ठेवणारं मनोरंजन असेल या अपेक्षेने चित्रपट बघू नका. हा चित्रपट थेटरात बघण्यासारखा नाही. संपूर्ण चित्रपटात कुठेही धाडधाड संगीत नाही. पहिला एक तास अतिशय संथ गतीने चित्रपट चालतो. ज्यांना हिरो आणि व्हिलन या दोनच बाजू कळतात त्यांनी तर अजिबात बघू नका. प्रत्येक माणसातला नायक आणि खलनायक शोधायचा असेल तर हा चित्रपट बघा. हा चित्रपट म्हणजे खरे आणि खोटे काय या पुढे जाऊन भावनिक जगण्याचा गुंता सोडवणारा आहे. श्रीमंत असो कि गरीब प्रत्येक स्त्री तिच्या कुटूंबाला विशेषतः मुलांना जे आयुष्य देण्याचा प्रयत्न करते ती भावना सामान असते. गरिबांना अडचणी नक्कीच जास्त आहेत. पण नात्यांची गुंतागुंत सामान धाग्यांची आहे. सन्स्पेन्स किंवा काही तरी वेगळं दाखवलंय असं म्हणता येणार नाही तरीही शेवटचा प्रसंग काळजाचा ठोका चुकवणारा आहे. समोरच्याला तुमचं दुःख समजावून सांगण्याचा मार्ग भयानक असू शकतो पण कुठे थांबायचं हे कळलं तर ‘जलसा’ आवडेल.

Amazon prime वर हा चित्रपट बघायला मिळेल.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.