सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

श्रीरंग बारणे यांना राज्यसभेवर पाठवून पार्थ पवारांसाठी मावळची जागा

राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात नेहमीच राजकीय कुस्ती होत असते. कधी हे जिंकतात तर कधी हे, पण खरी लढत महाविकास आघाडी मधल्या घटक पक्षांमधे असल्याचं जाणवतं. कधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये खटके उडतात तर कधी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये. ह्या घटक पक्षांचे मतभेद फार काळ टिकत नाहीत पण त्यामाध्यमातून समाज माध्यमांना चघळायला विषय मिळालेला असतो. मावळ लोकसभा मतदार संघावरून राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे प्रचंड मतांनी विजयी झाले

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सर्वांचा सुफडा साफ केला. त्यावेळेला शिवसेना देखील भाजप सोबत युतीत होती. शिवसेना आणि भाजप यांनी मिळून महाराष्ट्रात निवडणूक लढवली होती. मावळ मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडणुकीत होते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षकाडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार होते. पार्थ पवार पहिलीच निवडणूक लढवत होते तर श्रीरंग बारणे २०१४ पासून मावळचे प्रतिनिधित्व करत आहेत.
पवार परिवारातून उमेदवार असल्यामुळे श्रीरंग बारणे यांना निवडणूक जिंकून अवघड जाईल असं राजकीय पंडित सांगत होते. पार्थ पवार यांचा प्रचार देखील श्रीरंग बारणे यांच्या पेक्षा सरस वाटत होता. मावळ मतदार संघात काय होते याची राज्याला उत्सुकता होती. श्रीरंग बारणे यांनी सर्वाना चकित केले जवळ पास २ लाख मतांच्या अंतराने पार्थ पवारांचा त्यांनी पराभव केला. पार्थ पवारांचा पराभव केल्यामुळे श्रीरंग बारणे यांच्या बद्दल राज्यात चर्चा केली जात होती. मावळ मध्ये पार्थ नाही तर अजित पवार पराभूत झाले असल्याचे जाणकार सांगत होते.

२०१९ पासूनच पार्थ २०२४ च्या तयारीला लागलेत

अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी पक्षाला मावळचा पराभव जिव्हारी लागला होता. पण एकदा निवडणूक हरल्यावर तो स्वीकारण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात फारसे सक्रिय दिसले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना कसलीही जबाबदारी दिली नाही. त्यांचे वडील अजित पवार मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पार्थ यांना संघटनेत दुसरी जबाबदारी दिली नाही कारण त्यांना मावळ मध्ये लक्ष देण्याचं सांगितलं असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी पार्थ पवार निवडणूक हरल्यापासून करत असल्याचे मावळ भागात राहणारे मतदार सांगतात.

श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट केला तर रस्ता साफ होईल

लोकसभा निवडणुकीला आणखी दोन वर्ष बाकी आहेत पण मावळ भागात आता पासूनच वातावरण तापत आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना डिवचण्याच काम होत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देशमुख यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहली आहे, श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळची जागा सोडावी त्या बदल्यात त्यांना राज्यसभेवर पाठवावे. देशमुख यांच्या पोस्ट नंतर मावळ मध्ये अश्या पोस्टचा पाऊसच आला. श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांच्या पण त्या विरोधात पोस्ट पडल्या.
राष्ट्रवादीचे समर्थक सांगतात , ‘पार्थ पवार हे मावळ भागात काम करत आहेत म्हणून त्यांना मावळचे खासदार केलं पाहिजे आणि श्रीरंग बारणे यांना राज्यसभेवर पाठवलं तर तालुक्याला दोन खासदार मिळतील.’
शिवसेनेच्या समर्थकांचे मत मात्र वेगेळे आहे ते म्हणतात, ‘पार्थ पवार यांना काहीही करून मावळचा खासदार व्हायचे आहे. पण श्रीरंग बारणे आहेत तोपर्यंत त्यांना ते शक्य नाही कारण श्रीरंग बारणे यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी श्रीरंग बारणे यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे जेणे करून त्यांचा रस्ता साफ होईल.’

शिवसंपर्क अभियानासाठी जालना जिल्यात असलेल्या श्रीरंग बारणे यांना जेंव्हा पत्रकारांनी लोकसभेची जागा सोडण्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले , “ राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र काम केलं पाहिजे. पण शिवसेनेला डिवचण्याचं काम जर महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असेल तर शिवसैनिकांकडून पण तसेच उत्तर मिळेल,”
श्रीरंग बारणे पार्थ पवारसाठी लोकसभेची जागा सोडतात कि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवतात हे आपल्याला २०२४ लाच समजेल. सध्याच्या वातावरणावरून तरी असं दिसतंय कि मावळ मध्ये २०२४ ला पुन्हा श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांचा मुकाबला होईल.

 

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.