सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

माणसांच्या रक्तात प्लास्टिक, लोक प्लास्टिक खात आहेत का ?

घर असो, जंगल, वाळवंट, पर्यावरण असो की समुद्र… दुर्दैवाने एकही कोपरा असा नाही जिथे प्लास्टिक पोहोचलेले नाही. प्लास्टिकने मानवी जगण्याला व्यापून टाकलेआहे . प्लास्टिकला पर्याय नाही ह्या कारणामुळे प्लास्टिक हटवण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फेल ठरले आहेत. आता तर नवीनच धोका निर्माण झाला आहे. माणसांच्या रक्तातही प्लास्टिकचे मायक्रोपार्टिकल्स आढळल्याचे नेदरलॅंडमधील एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन नेमके काय आहे, मानवी रक्तात प्लास्टिक पोहोचले कसे आणि त्याचे काय दुष्परिणाम माणसांना भोगावे लागणार आहेत याचा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

संशोधन नेमके काय आहे ? 

मायक्रोप्लास्टिक कणांनी आपले सर्व पर्यावरण व्यापले आहे.पर्यावरणापर्यंत ठीक होत त्याचे थेट असे काही परिणाम आपल्याला जाणवत नव्हते पण आता माणसांच्या शरीरात पण प्लास्टिक आढळत आहे. नेदरलॅंडमधील संशोधकांनी २२ अज्ञात माणसांच्या रक्ताच्या नमुन्यांवर केलेल्या संशोधनात २२ पैकी १७ जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. हे सगळे प्लास्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरले जाणारे असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. तपासण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ७०० नॅनोमीटर (०.०००७ मिलीमीटर) प्लास्टिक आढळले आहे.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय ?

पर्यावरणात दिसणाऱ्या विविध प्रकारच्या प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण मायक्रोप्लास्टिक असतात. मायक्रोप्लास्टिकची अशी विशेष व्याख्या केलेली नाही. यूएस नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमोस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि युरोपिअन केमिकल एजन्सी यांनी केलेल्या व्याख्येनुसार ५ मिलिमीटरपेक्षा कमी लांबीचे प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक असतं. या संशोधनासाठी मात्र मानवी शरीराच्या त्वचेच्या आतील स्तरातून प्रवास करू शकणाऱ्या आकाराचे प्लास्टिक हा एकमेव निकष वापरण्यात आला आहे. या संशोधनात जगात सर्वत्र आढळून येणारे प्लास्टिक पॅालिमर – बाटल्यांसाठी वापरले जाणारे पॅालिथिलिन टेट्राफ्टॅलेट, पिशव्यांसाठी वापरले जाणारे पॅालिथिलिन, अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॅालिमर स्टायरिन या प्रकारांतील प्लास्टिकचे सूक्ष्मकण आढळले आहेत.

संशोधनातील निष्कर्ष काय ? 

संशोधनासाठी २२ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. २२ पैकी १७ जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. ५० टक्के नमुन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाणाऱ्या पॅालिथिलिन टेट्राफ्टॅलेट, ३६ टक्के नमुन्यांमध्ये पॅालिस्टरिन, २३ टक्के पॅालिथिलिन तर पाच टक्के नमुन्यांमध्ये मिथाइल मेथिलायक्रेट प्रकारातील मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. प्रत्येक रक्तदात्याच्या नमुन्यात सुमारे १.६ मायक्रोग्रॅम मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.

संशोधनाचे महत्त्व काय ? 

प्लास्टिकचे वर्णन नेहमी भस्मासुर असा केला जातो. त्यामुळे मानवी शरीर आणि आरोग्यावर होणारा परिणाम यांचा अभ्यास होणे गरजेचं आहे. मात्र, त्याबाबत संशोधनाची कमी आहे. त्या दृष्टीने संशोधन होणे आवश्यक आहे. मानवी शरीरात असलेल्या मायक्रोप्लास्टिकपेक्षा कितीतरी पटीने सूक्ष्म प्लास्टिक कणांची तपासणी करणारी यंत्रणाच उपलब्ध नाहीत. तशा चाचण्या आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.

माणसांच्या आरोग्याला प्लस्टिक पासून धोका  

रक्तात आढळलेले मायक्रोप्लास्टिक आरोग्यावर नेमका काय दुष्परिणाम करतात याबाबत संशोधन झाले नाही. मात्र, उंदरावर केलेल्या संशोधनात उंदरांच्या फुप्फुसांना २० नॅनोमीटर मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आणले असता कालांतराने गर्भात आणि गर्भातील ऊतींमध्ये त्यांचे अस्तित्व आढळल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ उंदरांमध्ये मायक्रोप्लास्टिक तोंडावाटे गेल्याने यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये ते जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मानवी शरीरातही त्या मायक्रोप्लास्टिकचे स्थलांतर शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मायक्रोप्लास्टिक हे वातावरणात म्हणजे समुद्र, पर्यावरण यांच्या माध्यमातून आता मानवी शरीरातही शिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्लास्टिक रक्तात आढळल्याने आपल्या आरोग्याला किती धोका आहे कळेलच. मात्र, तातडीने प्लास्टिकला रिप्लेसमेंट शोधण्याची गरज आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, खाद्यपदार्थांची कव्हर्स स्वरूपात प्लास्टिक आपल्या आयुष्याचा भाग झाले आहे. प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक कमी करणे आणि त्याचबरोबर वापरलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रियेचे पर्याय शोेधणे ही काळाची गरज ठरणार आहे.

प्लास्टिकच्या संशोधनाने जगभरात खळबळ उडवली आहे. भारतात मात्र फारशी चर्चा या विषयावर होताना दिसतं नाहीये. न जाणे किती भारतीयांच्या रक्तात प्लास्टिक गेले असेल. न जाणे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आपण मात्र सावध राहिलं पाहिजे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.