सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ : संघर्ष करणाऱ्या सर्वानी वाचावे असे…

१९९०च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकात १८ प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणात १० ते १५ पानांमध्ये दाते यांनी आपल्या जीवनातील विविध घटना कथन केल्या आहेत.
पहिल्या प्रकरणाची सुरुवात दाते यांच्या पोलीस सेवेत प्रवेश करण्यापासून होते. त्यामागील कारणपरंपरा आणि नवोदित पोलीस अधिकारी म्हणून सुरुवातीच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. प्रथम नियुक्ती झाल्यावर रत्नागिरीच्या एसपींनी दिलेली वागणूक अत्यंत विचित्र आणि पूर्वग्रहदूषित होती. तरीही दाते यांनी आत्मविश्वास गमावला नाही. त्यांच्या अधिकारक्षेत्रातील गुन्ह्यांवर कडक कारवाई करून आपल्या कार्यशैलीची झलक दाखवून दिली.

पुढील काही प्रकरणांमध्ये बालपणीचा संघर्ष आणि गरिबीचे अनुभव सांगितले आहेत. तसेच, १९८७ ते ९०मध्ये या काळात खराब शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या विद्यार्थ्यापासून चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत कसा प्रवास झाला आणि तीन परीक्षांमध्ये (B.com, ICWA, UPSC) कसे यश मिळवले, याची कहाणी आहे. दाते यांच्या आयुष्यातील कष्ट, धडपड (ते काही काळ वृत्तपत्रे टाकण्याचेही काम करायचे), विविध शिक्षकांकडून शिकण्याची धडपड आणि पुस्तक वाचण्याचा त्यांचा छंद, हा भाग खऱ्या अर्थाने तरुण पिढीसाठी विशेष प्रेरणादायी आहे.

विनोबा भावे यांच्या ‘ईशावास्य वृत्ती’, ‘स्त्री-प्रज्ञादर्शन’ आणि ‘गीता प्रवचने’ या पुस्तकांचा दाते यांच्यावर खूप प्रभाव पडला. हेरोल्ड कुंज आणि सीरियल ओ’डोनेलच्या वाचनाने त्यांना ‘संघटनात्मक व्यवस्थापन’ कौशल्य सुधारण्यास मदत झाली. या काळात त्यांनी पुस्तक वाचण्याचा आणि त्यातील प्रेरणादायी विचारांचे पालन करण्याचा छंद जोपासला. ‘वेळ व्यवस्थापन’च्या साहाय्याने आपल्या व्यस्त जीवनातही वाचनाचा छंद कसा सुरू ठेवला, हे त्यांनी तपशीलवार सांगितले आहे.

त्यानंतर ते १९९०च्या दशकातील गुन्ह्यांशी संबंधित विविध समस्यांबाबतचे अनुभवांकडे वळतात. विशेषत: वर्धा व अमरावती येथील दारूबंदी व जुगार, नक्षलवाद व भंडारा येथील पोलीस संघटनेतील दारूबंदीचा मुकाबला, डॉ. अभय बंग यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या मदतीने यशस्वीरित्या कसा केला, याविषयी सांगितले आहे. तसेच, तेलगी आणि हर्षद मेहता घोटाळा, यांसारख्या गुन्ह्यांविषयीच्या कथनातून महाराष्ट्रातील १९९०च्या दशकातील पोलिसिंगचे गतिमान स्वरूप दिसून येते. आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस भरतीला कसे प्रभावीपणे हाताळले आणि भ्रष्ट शक्तींना रोखले, याविषयीही प्रांजळपणे सांगितले आहे. येथे त्यांनी या मुद्द्यांचा तपशीलच नाही तर संयम, प्रामाणिकपणा, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणे आणि वरिष्ठांकडून फटकारल्यावरही निराश न होता केलेल्या कामाविषयीही लिहिले आहे.
त्यानंतर झेड सुरक्षेबाबतचा महत्त्वाचा तपशील देणारे एक प्रकरण (१९९९मध्ये तत्कालीन गृहमंत्री श्री. लालकृष्ण अडवाणी मुंबईला आले होते आणि या भेटीदरम्यान अचानक एक गुंतागुंतीचा मुद्दा आला. तो दाते यांनी अतिशय धोरणीपणे हाताळला) आहे. येथे पोलीस दलाचे सामर्थ्य म्हणून अधीनस्थ कर्मचाऱ्यांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन उदाहरणांसह स्पष्ट केला आहे, जो खूप मनोरंजक आहे.

२६/११ची भीषणता, मुंबईतील कामा हॉस्पिटलमधील ओलिसांची सुटका करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका आणि सेवा करताना प्राणापेक्षा कर्तव्याला जास्त मान देण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. २६/११नंतर दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ‘फोर्स-वन’ तयार करण्याचे काम सोपवले गेले. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी आणि तिथल्या अनोख्या कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांबद्दल त्यांनी केलेले एक विश्लेषण महत्त्वाचे आहे. धारावीच्या सामाजिक जीवनाबद्दल आणि अर्थव्यवस्थेबद्दल लिहिताना, त्यांनी केवळ या वस्तीतली केवळ आव्हानेच नमूद केली नाहीत, तर अनेक सकारात्मक गोष्टीही सांगितल्या आहेत. या प्रकरणाचे शीर्षक ‘विरोधाभासाची राजधानी’ खरोखरच भारताच्या आर्थिक राजधानीतील गुंतागुंतीचे जीवन दर्शवते.

मग ते वेगवेगळ्या आपत्ती हाताळण्यासाठी पोलिसांच्या विविध रणनीतींच्या तपशीलाकडे वळवतात. दंगल नियंत्रण, गणपती उत्सवातील बंदोबस्त (विशेषतः लालबागच्या राजाचा अमृतमहोत्सव) यासारख्या समस्यांच्या व्यवस्थापनाची थोडक्यात माहिती देतात. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कायदा व सुव्यवस्था कशी सांभाळली, याचा अनुभवही सांगतात.

‘व्यवस्थेवचे अंतरंग : संघर्ष आणि समन्व्यय’ या प्रकरणात श्री. सूर्यकांत जोग, श्री. संजीव दयाळ, एनपीएमधील डीआयजी रामकृष्णन आणि इतर वरिष्ठ प्रामाणिक अधिकार्‍यांबाबतचे अनुभव आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील खरे पोलिसिंग समजून घेण्यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. नंतर धोतरखेडा गावात १९९५ आणि १९९८-२०००मधील बडी मस्जिद संघर्षाची अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीही कथन केली आहे. त्यांचे ‘भाषा सौम्य पण भूमिका ठाम’ हे तत्त्व अनेक आव्हानांनी भरलेल्या त्यांच्या यशस्वी वाटचालीचे एक उदाहरण आहे.

पोलीस सेवेचा १४ वर्षांचा पुरेसा अनुभव घेतल्यानंतर दाते त्यांचा प्रवास संशोधन आणि विकासाकडे वळवतात. फुलब्राइट प्रोग्राम अंतर्गत हॅन्फ्री फेलोशिप मिळाल्यानंतर ते ‘आर्थिक गुन्हे व संघटित गुन्हे आणि त्यांचे स्वरूप’ यासारखे विषय समजावून घेतात. अमेरिकन विद्यापीठां (मिनेसोटा युनिव्हर्सिटी, कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि हॅन्फ्री स्कूल ऑफ पब्लिक अफेअर्स)मधील त्यांचा अनुभव आणि अमेरिकन पोलिसिंग व न्यायिक व्यवस्थेतील फरकांची विस्तृत माहिती दिली आहे. या प्रकरणातील त्यांचे अमेरिकन समाजाचे विश्लेषण लक्षवेधी झाले आहे. अमेरिकेच्या भौतिक विकासामागील कारण आणि तरीही तो अत्यंत असमाधानी वा दु:खी समाज का आहे, हे सांगताना भारताच्या आदर्श आणि आध्यात्मिक समृद्धीचे महत्त्व सांगायलाही ते विसरले नाहीत.

दाते आपल्या अनुभवातून जीवन जगण्याबाबतचे अनेक धडे देतात. ग्रीक तत्त्ववेत्त्याकडून अंगीकारलेले विचार
अगदी समर्पकपणे देतात –
देव मला शांतता दे,
ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्यासाठी,
मी करू शकतो त्या गोष्टी बदलण्याचे धैर्य,
आणि फरक जाणून घेण्यासाठी शहाणपण.

आयपीएस अधिकारी म्हणून स्वतःपुढे कर्तव्य, धाडस, उत्कृष्टता, इतरांची चिंता, स्वयंशिस्त आणि स्वत:चा विकास ही दाते यांची नैतिक तत्त्वे राहिली आहेत.

पुस्तकाच्या शेवटी, प्रसारमाध्यमांशी व्यवहार करण्याबाबत थोडक्यात, परंतु महत्त्वपूर्ण चर्चा आहे. तसेच पोलीस यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. सुधारणेचा भार केवळ पोलीस यंत्रणेतल्या वरच्या व्यक्तींवर नसून समाज आणि राजकीय व्यवस्थेवरही आहे. पोलीस यंत्रणेकडे नेहमीच लाचखोरीच्या नजरेतून न बघणे आणि पोलिसिंगमध्ये समाजाचे आदर्श मानक लागू करणे, ही मुख्य जबाबदारी समाजाची आहे, हेही नमूद करतात.

थोडक्यात हे पुस्तक प्रेरणादायी, धाडसी आहे. तसेच तो एका नैतिक तत्त्वनिष्ठेचा प्रवासही आहे. पोलीस यंत्रणेतील नवोदितांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचं आहे. विद्यार्थी आणि नवीन पिढीसाठी नैतिक, व्यावहारिक आणि धाडसी जीवनाचा मार्गदर्शक प्रकाश आहे. सर्वसामान्यांना पोलीस यंत्रणेबद्दल वेगळा विचार करायला लावणारे आहे.

‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ – सदानंद दाते
समकालीन प्रकाशन, पुणे
पाने -१४४
मूल्य – २०० रुपये.
लेखक अनिल म्हस्के प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आहेत. तत्पूर्वी ते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये होते.
anilmhaske22@gmail.com

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.