सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

शेतकरी ते नोकरदार प्रत्येकाच्या घरी असणारी ऍटलास सायकल कुठे गायब झाली

atlas-cycle-company-history

खुळखुळा झालेली ऍटलास सायकल भिंतीला टेकून गण्याच्या बापाने ठेवली होती. गण्याला जुनी सायकल दिसली कि बापाला म्हणायचा, ‘भंगारात देऊन नवीन सायकल घे. कवर हिला सांभाळायची’. हे ऐकून गण्याचा बाप इमोशनल व्हायचा अन म्हणायचा, “नवीन सायकल काय गाडी पण आता घेईन पण ही माझी लक्ष्मी आहे. मी आहे तवर सायकल विकत नसतो.” ग्रामीण भागात राहणाऱ्यांना माहित असेल जुन्या पिढीसाठी ऍटलास सायकल म्हणजे पहिल्या प्रेमासारखं आहे. ऍटलास सायकलने यांच्या आयुष्यात पहिली पायाला भिंगरी बांधली. आज कितीपण जोरात धावणाऱ्या गाड्या दिसू दे पण सायकलमुळे आयुष्यात पहिली गती मिळाली. नव्वदीच्या आधीच्या पिढ्यानी वस्तूंच्या बाबतीत मालकी गाजवली ती फक्त ऍटलास सायकलवर. सायकलला राखण राहणारं म्हातारं ज्यांनी बघितलं नाही त्यांना हे कळणार नाही.

मागच्या कित्येक पिढयांना पळवणारी ऍटलास सायकल आता कोणाच्या घरासमोर का दिसत नाही. ५०-६० वर्षे भारतीयांच्या जगण्याचा भाग असलेली ऍटलास बदलत्या मार्केटची गती का पकडू शकला नाही. ऍटलासच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास एकदा नजरेखालून घालावा लागेल त्याशिवाय हे समजणार नाही.

सायकलच्या दुकानात सीट बनवायचं काम करणारा एक पोरगा नवीन काही तरी करायचं विचार करतो. फक्त विचार करून थांबत नाही तीन शेडमध्ये तो सायकलची फॅक्टरी चालू करतो. कंपनीला ऍटलास नाव देतो. पहिल्या दहा बारा सायकली तयार झाल्या झाल्या विकल्या जातात. अपेक्षेपेक्षा हा प्रतिसाद जास्त होता. पुढे मागणी इतकी वाढते कि एका वर्षातच तीन शेड मध्ये सुरु झालेली कंपनी २५ एकरच्या मोठ्या फॅक्ट्री मध्ये रूपांतरित होते. हे साल होतं १९५१ आणि ज्या माणसाने हा सगळं खटाटोप केला होता त्याचं नावं होतं, जानकीदास कपूरजी. दिल्लीपासून फक्त ४० किमी अंतरावर सोनिपत येथे जानकीदास यांच्या ऍटलासची फॅक्ट्री ज्या दिमाखात सुरु झाली तो प्रवास भारतातच थांबला नाही तर जगभर पोहचला. भारताच्या वाढत्या लोकसंख्येची गरज ऍटलासने पूर्ण केली. ऍटलास भारतीयांच्या आयुष्यात हळूहळू स्थिरावत होता. दिवसेंदिवस मागणी वाढत होती. त्यातच १९५८ ला काही विदेशी कंपन्यांनी ऍटलासला संपर्क केला. यामुळे ऍटलास भारताच्या बाहेर आफ्रिका आणि इतर देशांमध्ये सायकल विकू लागला. त्याच दरम्यान हिरो सायकल बाजारात आली होती. भारतीय मार्केट मोठं असल्याने या गोष्टीचा ऍटलासवर फारसा फरक पडला नाही. उलट ऍटलासची सायकल बनवण्याची गती कैक पटीने वाढली. १९६१ ला ऍटलासने १० लाख सायकलींचे उत्पादन केले होते. १९६५ पर्यंत सर्वाधिक सायकल बनवणारी कंपनी म्हणून ऍटलासने नाव कमावलं होतं.

ऍटलास यशाच्या शिखरावर होती. साहजिकच उत्पन्न वाढलं होतं. यावर समाधान मानून चालणारं नव्हतं. ऍटलासने वेगवेगळ्या जाहिरातीद्वारे ऍटलास पोहचवायचं ठरवलं. साडीत सायकलवर बसलेली महिला अशी ऍटलासने जाहिरात केली. त्यावेळच्या भारतात ही लहान घटना नव्हती. रुढीप्रिय भारतीय जनमानसात अशी जाहिरात चालेल किंवा याचे काही वाईट परिणाम होतील अशी शंका असताना ऍटलासने कसलाही विचार न करता सायकल चालवणाऱ्या महिला सर्रास जाहिरातीत दाखवल्या. यामुळे महिला स्वतःला सायकल चालवताना कल्पना करू लागल्या. साहजिकच महिलांचा देखील ऍटलासकडे कल वाढला. एकूण ऍटलासची विक्री वाढली. खप वाढला म्हणून ऍटलासने शांत राहण्याची भूमिका घेतली नाही. सायकल संबंधी नवीन गोष्टी त्यांना खुणावू लागल्या.

१९७८ ला रेससाठी विशेष सायकली ऍटलासने तयार केल्या. या सायकली बाजारात चांगल्या चालल्या. इतकंच नाही तर १९८२ च्या एशियन गेम्स मध्ये सगळॆ जबाबदारी ऍटलास सायकलवर टाकण्यात आली होती. ऍटलासने एशियन खेळात त्यांची जबाबदारी उत्तम पार पाडली यामुळे ऍटलास अजूनच चर्चेत आली. यांनतर सुनील शेट्टीसारख्या मोठ्या नटांकडून ऍटलासने जाहिरात करून घेतली. पुढच्या काही दिवसात म्हणजे १९८७ ला दहा गियर असणारी सायकल ऍटलासने बाजरात आणली. या सायकलनेदेखील निराशा केली नाही. १९९० पर्यंत ऍटलाससाठी सुवर्ण काळ होता असं म्हणायला हरकत नाही. गरीब असो श्रीमंत, शेतकरी असो वा नोकरदार प्रत्येक जण ऍटलास वापरत होता. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन हे सुद्धा ऍटलास सायकल वापरायचे. एवढं सगळं असूनही ऍटलासला उतरती का लागली?

२००३ पर्यंत ऍटलास तोट्यात गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या. चांगली चालणारी कंपनी हळू हळू तोट्यात कशी काय गेली हा प्रश्न सगळ्यांना होता. १९९० नंतर अनेक विदेशी कंपन्या भारतात आल्या होत्या. ऍटलासने बदलत्या काळाचा अंदाज घेत सायकल मध्ये बदल केले होते पण ते पुरेसे नव्हते. जाहिरातीचे मार्ग बदलले होते. ऍटलासला या गोष्टीचा अंदाज आलाच नाही. जुन्याच पद्धतीने ऍटलास मार्केट मध्ये सायकल विकत होते. हे एकच कारण नाही. बदलत्या जीवनशैलीने सायकलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्यामुळे सायकलची मागणी घटली होती. पण यावर आवश्यक उपाय करण्यात ऍटलास कमी पडत होती. तरीही ऍटलासचे ४००० स्टोर चालू होते. पण त्यांच्याकडे ऍटलासने पुरेसे लक्ष दिलं नाही. त्यामुळे हळूहळू बरेच स्टोर बंद झाले. कोणत्याही कंपनीच्या विनाशाला एक गोष्ट जबाबदार नसते. ऍटलाससाठी अजूनही काही गोष्टी तोट्याच्या ठरल्या.

ऍटलासची व्यूहरचना कमी पडली आणि त्यातच कौटुंबिक वादाची भर पडली. कौटुंबिक वादात ऍटलासचे तीन भाग पडले. यामुळे ऍटलासचा कारभार चालवणे अवघड झाले. २०२० नंतर लॉकडाउन उघडल्यावर ऍटलासची शेवटची इंडस्ट्री पण बंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सुद्धा कंपनीकडे पैसे शिल्लक राहिले नाही. ऍटलास कंपनीने तशी नोटीस गेटवर लावली. हजारो कुटुंबाना यामुळे रस्त्यावर यावं लागलं. ऍटलास यातून सावरेल असं वाटत नाही पण येणाऱ्या काळाची गरज ओळखली आणि काही सुधारणा झाल्या तर पुन्हा ऍटलास उभा राहू शकते !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.