सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आर अश्विन रिटायर्ड आऊट झाला पण हे असं आऊट होणं काय असतं ?

आयपीएलच्या २० व्या मॅच मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय झाला. मात्र, या सामन्यामध्ये आर अश्विन ज्या पद्धतीने आऊट झाला त्याची चर्चा होत आहे. तो बॅटिंग करत असताना ‘रिटायर्ड आऊट’ होऊन पॅव्हेलियन मध्ये परत गेला. पण हे रिटायर्ड आऊट प्रकार नेमका काय आहे ? अश्विनने रिटायर्ड आऊटचा निर्णय का घेतला ? क्रिकेटमध्ये यासाठी काय नियम आहेत ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय आणि आतापर्यंतचा रिटायर्ड आऊटचा इतिहास आढावा घेऊ.

रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय ?

‘रिटायर्ड आऊट’ आणि ‘रिटायर्ड हर्ट’ यामध्ये फरक आहे. रिटायर्ड आऊट हा प्लॅनिंगचा एक भाग असतो. मॅच जिंकायचा असेल तर योग्य बॅट्समनला मैदानात उतरवण्यासाठी रिटायर्ड आऊटचा उपयोग केला जातो. रिटायर्ड आऊट होऊन बॅट्समन पॅव्हेलियन मध्ये परतला तर त्याला परत बॅटिंग करता येत नाही. क्रिकेटच्या नियमानुसार एखादा बॅट्समन अम्पायरच्या परवानगी शिवाय आणि विरोधी संघाच्या कर्णधाराच्या परवानगी शिवाय पॅव्हेलियन मध्ये परतला तर त्याला रिटायर्ड (बाद) ठरवले जाते.
तर दुसरीकडे रिटायर्ड हर्टमध्ये फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंगसाठी मैदानात उतरु शकतो. रिटायर्ड हर्ट सोप्या भाषेत सांगायचे झाले तर खेळाडू जखमी झाल्यावर तो काही वेळासाठी बाहेर बसतो आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू मैदानात येतो. आणि जेंव्हा तो जखमेतून बरा होतो तेंव्हा परत मैदानात येतो. रिटायर्ड आऊट मध्ये मात्र परत खेळायची संधी मिळत नाही.

लखनऊ सोबतच्या मॅचमध्ये अश्विन रिटायर्ड आऊट का झाला ?

लखनऊ सोबतच्या मॅचमध्ये राजस्थानची ६७ धावांवर चार विकेट अशी दयनीय स्थिती झाली होती. अशा बिकट परिस्थितीत अश्विन मैदानात बॅटिंग साठी आला. अश्विनने २३ चेंडूंमध्ये २८ रन्स केल्या. त्यानंतर पुढच्या विकेटसाठी बॅटिंगसाठी येणारा ‘रियान पराग’ अश्विनपेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने खेळू शकेल असा विचार संघाने केला. याच कारणामुळे १९ व्या ओव्हर्सला अश्विन रिटायर्ड आऊट म्हणून पॅव्हेलियन मध्ये परतला.

याआधी बॅट्समन रिटायर्ड आऊट झालेले आहेत का ?

आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊटचा प्रकार पहिल्यांदाच झाला. याआधी आयपीएलमध्ये एकही खेळाडू रिटायर्ड आऊट झालेला नाही. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार अनेक वेळा घडलेला आहे. २०१० मध्ये नॉर्थंट्स विरुद्ध खेळत असताना पाकिस्तानी बॅट्समन ‘शाहीद आफ्रिदी’ रिटायर्ड आऊट झाला होता. त्याने १४ बॉलमध्ये ४२ रन्स केले होते . त्यानंतर २०१९ साली भुतान आणि मालदीव्स यांच्यातील टी-२० मॅचमध्ये सोनम तोबगे हा बॅट्समन रिटायर्ड आऊट झाला होता. त्याने २४ बॉलमध्ये ३५ रन्स केल्या होत्या.
बांगलादेश प्रिमियर लिग २०१९ मध्ये कुमिला वॉरियर्स विरुद्ध चत्तोग्राम चॅलेंजर्स या मॅच मध्ये कुमिला वॉरियर्स संघातील सुंझामुल इस्लाम हा बॅट्समन रिटायर्ड आऊट झाला होता. बीबीएल २०२२ लीगमध्ये सिडनी सिक्सर्सने रिटायर्ड आऊटच्या रणनीतीचा उपयोग केला होता. त्यावेळी जॉर्डन सिक्ल जखमी झाल्यामुळे पॅव्हेलियन मध्ये परतला होता. त्याऐवजी जे लेंटन बॅटिंग आला होता. आयपीएल मध्ये जरी हा प्रकार नवा असला तरी क्रिकेटमध्ये रिटायर्ड आऊटचा उपयोग झाला आहे.

अश्विन रिटायर्ड आऊट झाल्यानंतर राजस्थानने काय स्पष्टीकरण दिलं ?

अश्विन रिटायर्ड आऊट झाल्यानंतर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिली आहे. “अश्विनला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय संघाचा होता. आम्ही वेगवळे प्लॅन करत असतो. मॅच सुरु होण्याआधीच आम्ही रिटायर्ड आऊटबद्दल विचार करत होतो. परिस्थितीनुसार रिटायर्ड आऊटचा निर्णय घ्यायचा आम्ही आधीच विचार केलेला होता. अश्विनला रिटायर्ड आऊट करण्याचा संघाचा निर्णय होता,” असं संजू सॅमसनने म्हटलंय. तर राजस्थान रॉयल्सचे कोच कुमार संगकारा यांनी देखील संजू सॅमसनच्या मताशी सहमती दाखवली आहे. अश्विन आणि संघाने विचार करून हा निर्णय घेतला होता, असं संगकारा यांनी म्हटलंय.

काल हैद्राबाद आणि गुजरात मध्ये झालेल्या मॅच मध्ये हैद्राबाद संघाचा बॅट्समन राहुल त्रिपाठी जखमी झाला होता. राहुल त्रिपाठीला खेळणं शक्य होतं नसल्यामुळे त्याने रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर होणे पसंद केले. काल हैद्राबाद संघला राहुल त्रिपाठीला परत खेळण्यासाठी पाठवण्याची गरज पडली नाही पण जर गरज पडली असती तर राहुल त्रिपाठी परत बॅटिंगला आला असता.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.