सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दारू, गुटख्याची जाहिरात करायला बंदी असली तरी ही आयडिया वापरून जाहिरात केली जाते

Bagpiper च्या जाहिरातीत दारूचा कधी उल्लेख नसतो. Bagpiper जाहिरातीत सोडा विकायच्या बाता करतो

‘प्यार कि राहो मे चलना ऐसे’ हे गाणं बॅकग्राऊंडला आणि शेवटी Men Will be men ही Imperior Blue ची जाहिरात आवडत नाही असा माणूस नाही. जाहिरात बघून कित्येक लोकांना बसायची इच्छा झाली असेलच. जाहिरात दारू प्यायचं बोलत नाही पण लक्षात दारूचं येते. जाहिरातीच्या शेवटी नीट बघा Imperior Blue च्या नावाखाली Superhit Music Com. असं लिहिलंय. ही काय नवीन भानगड आहे. दारू विकणारी कंपनी संगीत कधी पासून विकायला लागली. एवढंच नाही ‘खूब जमेगा रंग’ म्हणलं कि डोळ्यासमोर येणाऱ्या Bagpiper च्या जाहिरातीत दारूचा कधी उल्लेख नसतो. Bagpiper जाहिरातीत सोडा विकायच्या बाता करतो. पण खास Bagpiper चा सोडा पिऊ असा आजपर्यंत एक जण दिसला नाही. नाव लिहायला जागा कमी पडेल इतक्या कंपन्यांनी याच पद्धतीने मार्केटिंग केली आहे. मार्केटिंगची ही एक अशी पद्धत आहे ज्यात अंमली पदार्थाचा उल्लेख न करता जे पाहिजे ते लोकांपर्यंत पोहचवलं जातं. मार्केटिंगच्या भाषेत याला सरोगेट जाहिरात म्हणतात. एकेक मुद्दा समजून घेऊ म्हणजे नेमका विषय कळेल.

सरोगेट जाहिरात म्हणजे काय ?

विदेशातील काही जोडपी त्यांचं मुलं भारतातील गरीब स्त्रियांच्या पोटात वाढवतात, सरोगसीचा हा प्रकार माहित असेलच. थोडाफार फरक सोडला तर याच पद्धतीने एखाद्या मोठ्या ब्रँडला त्यांच्या मुख्य उत्पादनाची जाहिरात करायला कायद्याने परवानगी नाही अशा वेळेस त्यांच्या ब्रँडच्या नावाने नवीन उत्पादन बाजारात आणलं जातं. उदाहरणार्थ बॅगपायपर ही दारू विकणारी कंपनी आहे. या कंपनीला दारूची जाहिरात करायला कायद्यानं परवानगी नाही. म्हणून कंपनीने बॅगपायपर सोडा बाजारात आणला. टीव्हीवरच्या जाहिरातीत सगळीकडे बॅगपायपर सोडा अशी जाहिरात केलेली असते. नावाला सोडा असतो पण एकूण जाहिरातीत सगळीकडे ब्रॅण्डचा लोगो, कलर, दारूच्या बाटलीवर असणारे चित्र हे सगळं जाहिरातीत दाखवलं जातं. जाहिरातीच्या शेवटी लहान अक्षरात किंवा एकदम हळू आवाजात सोडा शब्द वापरला जातो. जाहिरात बघणाऱ्यांना नेमकी जाहिरात कशाची होती विचारलं तर एक सेकंदात सांगतील कि ही दारू विकणाऱ्या कंपनीची जाहिरात आहे. दारू विकणाऱ्या कंपनीचा खरा उद्देश तर तोच आहे. अशा पद्धतीने अनेक मोठमोठ्या दारू विकणाऱ्या कंपन्या मिनरल वॉटर, म्युजिक कॅसेटस, असे पर्यायी उत्पादन तयार करून मुख्य उत्पादन दारूची जाहिरात करतात. हे फक्त दारूच्या बाबतीत नाही तर तंबाखू आणि इतर अंमली पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या जाहिरातीत इलायची दाखवतात आणि वास्तवात गुटखा विकतात. देशभक्त अक्षय कुमारने अजय देवगण आणि शाहरुख सोबत नुकतीच एक जाहिरात केलीये त्यात विमल इलायची असणाऱ्या पुडीची तो जाहिरात करतोय म्हणून चांगला ट्रोल झाला होता. अंमली पदार्थांची जाहिरात करणार नाही असं एका कार्यक्रमात तो बोलला होता पण बहुतेक जास्त पैसे मिळाल्यामुळे बिचारा विमलच्या जाहिरातीला नाही म्हणाला नाही. इलायची आरोग्याला चांगली असते असं अक्षय कुमार सांगून सुद्धा दुकानात विमल द्या म्हणल्यावर टपरीवाला इलायची कधीच देत नाही. सरोगेट जाहिरात हे प्रकरण काय असते हे कळलं असेलच तर आता कायदा काय सांगतो ते बघू.

१९९० च्या दशकानंतर सरोगेट जाहिरात भारतात आली. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, १९९५, अंमलात आल्यानंतर थेट मद्य, तंबाखू आणि सिगारेटच्या जाहिरातींवर बंदी घातली होती. त्यापूर्वी सिगारेट (नियमन) उत्पादन, पुरवठा आणि वितरण) अधिनियम, १९७५ च्या कायदयानुसार सर्व सिगारेट आणि तंबाखू यांच्या पॅकेजेस आणि जाहिरातींवर वैधानिक आरोग्य चेतावणी प्रदर्शित करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सिगारेट आणि तंबाखूच्या पुडीवर तोंड सडल्याचा फोटो दिसतो. विशेषत: नवीन तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या मनावर जाहिरातींचा मोठा प्रभाव आहे. दारू आणि तंबाखूच्या थेट जाहिरातींवर बंदी घालणे म्हणजे ग्राहकांच्या मनावर अंमली पदार्थांचा प्रभाव रोखाने हा उद्देश होता. सरोगेट जाहिरातीने मुख्य उद्देशालाच हरताळ बसला. तंबाखू आणि दारूच्या कंपन्यांनी पर्यायी मार्ग काढला ज्यामुळे कंपनीला दारू आणि इतर अंमली पदार्थांची जाहिरात करायला वेगळी कसरत घ्यावी लागली नाही. कोणत्याही मोठ्या ब्रँडला सतत चर्चेत राहणे गरजेचे आहे त्यावर कंपनीचे बरीचशी गणितं अवलंबून आहे.

त्याच ब्रँड नावाने नवीन उत्पादने लाँच करणे हे ब्रँड विस्तार म्हणून ओळखले जाते आणि ते बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह नाही. पण खरी समस्या कधी येते जेव्हा एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीवर बंदी असताना त्याला पर्याय म्हणून नवीन उत्पादन त्याच ब्रँड नावाने लाँच केले जाते. इथे कायद्याला बगल तर दिलीच जातेच शिवाय बंदीचा मुख्य उद्देशच संपुष्टात येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरातीवर बंदी करण्याची वेळोवेळी मागणी होते.

माजी केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या नावाला आक्षेप घेतला होता. ‘रॉयल चॅलेंजर्स’ जे मद्य ब्रँड “रॉयल चॅलेंज” ची उघड उघड सरोगेट जाहिरात होती. प्रकरण कोर्टात गेलं. यावर सर्वोच्च न्यायालायने असं निरीक्षण नोंदवलं कि रॉयल चॅलेंज हे मद्य ब्रँड आणि रॉयल चॅलेंजर हे संघाचं नाव यात फरक आहे. मद्यपान करणाऱ्या लोकांवर या नावाचा परिणाम होईल पण मद्यपान न करणाऱ्या लोकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा यांनी सरोगेट जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. काही काळांनंतर ही याचिका मागे घेण्यात आली.

बारकाईने नियम बघितला तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दारू, गुटखा यांची जाहिरात करायला परवानगी नाही पण कायद्यातील पळवाटा शोधून आणि मोठ्या आर्थिक दबावातून एक प्रकारे सरोगेट जाहिरातीं सर्रास दाखविल्या जातात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.