सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत

king-richard-movie-review-in-marathi

विल स्मिथच्या कानफाडीने यावर्षीचा ऑस्कर गाजला. कोणत्या चांगल्या चित्रपटाला काय पुरस्कार मिळाला या चर्चेने ऑस्कर खरं तर गाजायला पाहिजे पण विल स्मिथने थोड्या सबुरीने विषय हाताळला नाही आणि नको ते कांड घडलं. पण या सगळ्या नादात विल स्मिथला ज्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला तो ‘किंग रिचर्ड’ चित्रपट बघायला उशीर झाला. पण उशिरा का होईना Amazon Prime वर चित्रपट बघितला आणि वाटलं पोरी जगात नाव करतील फक्त विश्वास ठेवणारा बाप पाठीशी पाहिजे.

विल स्मिथच्या अभिनयाने साकारलेला बाप प्रत्येकाच्या नशिबी असावा एवढंच चित्रपट संपल्यावर डोक्यात आलं. परिस्थिती चांगली वाईट असू शकते पण विश्वास ठेवणारा एक हात पाठीशी पाहिजे. फक्त कोरडा विश्वास ठेऊन जमणार नाही तर आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांच्या स्वप्नासोबत जगावं लागेल. आज जगात टेनिसपटू म्हणून ज्या दोन विल्यम्स बहिणींचा दबदबा आहे त्यात मोठा वाटा त्यांच्या बापाचा आहे. हा बाप मुलींना त्यांच स्वप्न पाहायला शिकवतो. स्वप्न दाखवून जबाबदारी झटकणारा हा बाप नाही. स्वप्न सत्यात उतरावं म्हणून तो योजना आखतोय. ठरल्यानुसार तो त्याच्या योजनेला न्याय देतोय. हे सगळं दिसतं तसं सोपं नाही या प्रवासात असंख्य अडचणी आहेत. आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मुलींना खेळायला स्वतंत्र टेनिस कोर्ट नाही. प्रत्येक दिवसाला जे टेनिस कोर्ट मोकळं असेल तिथे बाप त्यांना घेऊन जातोय. प्रशिक्षक आणि बाप अशा दोन्ही जबाबदारी तो पार पाडतॊय. मुलींना आत्मविश्वास देतोय कि त्या जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. आई बाप मुलाचं कौतुक करतात पण तेच कौतुक जगासमोर ठामपणे सिद्ध करणे प्रत्येकाला जमत नाही. हा सगळा संघर्ष दुःखाचं भांडवल न करता चित्रपटात वास्तव मांडणारा किंग रिचर्ड बघण्यासारखा आहे.

सेरेना आणि व्हिनस या दोन बहिणींना जागतिक दजाच्या टेनिसपटू बनवणाऱ्या त्याच्या वडिलांच्या म्हणजेच रिचर्ड विल्यम्स यांच्या वास्तव आयुष्यावर आधारित किंग रिचर्ड हा चित्रपट आहे. किंग रिचर्ड हा सिनेमा पुढच्या काळात एक बाप कसा असावा याच उदाहरण म्हणून दिलं जाईल इतका भावणारा हा चित्रपट आहे. मुलींना टेनिसपटू बनवले म्हणजे प्रश्न मिटला असा हा चित्रपट नाही. टेनिसपटू होत असताना माणूस म्हणून पण त्यांची चांगली प्रगती झाली पाहिजे हे रिचर्ड बघत असतो. एखाद्या ठिकाणी जास्त पैसे मिळतायेत म्हणून तो कधी न मिळाल्यासारखं पैसे पैसे करत नाही. इथे एक गोष्ट लक्षत घ्या ज्या माणसाकडे पुरेसे पैसे नाहीत त्यांच्यासाठी पैसे सर्वस्व असताना तो पैसे नाकारतो कारण त्यामुळे सेरेना आणि व्हिनस या दोन मुलींच्या मुख्य ध्येयावर परिणाम व्हायला नको. विचारांची एवढी स्पष्टता असली पाहिजे कि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित झालं नाही पाहिजे. खेळाडू खेळाशी प्रामाणिक पाहिजे यात वाद नाही पण तोच माणूस वैयक्तिक आयुष्यात तितकाच प्रमाणिक पाहिजे. सेरेना आणि व्हिनस टेनिसपटू होणे ही इतर टेनिसपटू होण्याइतकी साधी बाब नाही. त्या काळात अमेरिकेत काळा गोरा हा वाद टोकाचा होता. त्यामुळे कृष्णूवर्णीय समाजातून एखादी मुलगी टेनिस मध्ये यश मिळवेल तर संपूर्ण समाजासाठी ती प्रेरणादायी गोष्ट असणार होती. रिचर्ड हे जाणतो म्हणून मुलीच्या टेनिस प्रवासात तो कुठेच तडजोड करत नाही. एका ठिकाणी त्याला काही टपोरी पोरं मारतात पण रिचर्ड यामुळे मुलींच्या आयुष्यावर परिणाम होईल म्हणून त्या मुलांना उलट मारायला जात नाही. मसाला पिक्चरसारखा हा बाप नाही. अहंकारापेक्षा मुलांचा भविष्य त्याच्यासाठी महत्वाचं आहे. चित्रपटाला नाव किंग रिचर्ड का ठेवलं असेल यावरून अंदाज घ्या.

हा चित्रपट खूप सरळ आहे. बळेच भावनिक वातावरण तयार केलं नाही. लय दुःख आहे आयुष्यात हे सतत गिरवलं नाही. मुलींना यश मिळालं म्हणून आभाळाकडे बघून कोणी रडत नाही. हा चित्रपट कुटुंबाचा आहे. कुटुंबात घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांना वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाप हा कथेचा मुख्य गाभा आहे पण म्हणून इतर पात्रांना कमजोर दाखवलं नाही. दोन्ही मुलींची आई काही प्रसंगातून तिचं अस्तिव दाखवते. एका सीनमध्ये नवऱ्याला हे खडसावून सांगते कि तिचं बलिदान ही बापा एवढंच आहे फक्त ती अपेक्षा न करता तीच काम करते. बाप कुटुंब प्रमुख आहे म्हणून सगळं मनमानी पद्धतीने तो निर्णय घेत असेल तर त्याला आरसा दाखवणारी त्याची पत्नी आहे. ही कथा बापाची असली तरी हिरो दरवेळेस बरोबर असतो हे सतत दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. आई-बाप भाग्यविधाते आहेत हे खरंय पण मुलांना त्यांचा निर्णय घेऊन दिला पाहिजे, हे सुद्धा चित्रपटात हलक्या पद्धतीने दाखवून चांगला संदेश दिला आहे.

वास्तवात डॅशिंग दिसणारा विल स्मिथ या चित्रपटात बापाची करुणा, प्रेम, मुलींसाठी धरपड हे सगळे भाव चेहऱ्यावर आणण्यात यशस्वी होतो. विल स्मिथला या भूमिकेसाठी ऑस्कर मिळणे म्हणजे योग्य निवड आहे. लहान सेरेना आणि व्हिनस यांच्या भूमिका साकारलेल्या दोन्ही बाल कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. नमुनेदार मनोरंजन करणारा हा चित्रपट नाही. मानवी आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा टिपण्याचा प्रयत्न करा चित्रपटाची त्याशिवाय मजा येणार नाही. आमिरच्या दंगल मध्ये अशीच कथा वेगळ्या रूपात पहिली असेल तरीही किंग रिचर्ड एकदा बघाच. अमीर आणि विल स्मिथने साकारलेला बाप थोडा वेगळा आहे. पण मुलींसाठी त्यांची धरपड समान आहे. कुटुंबासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. रिचर्डची तयारी मात्र भावनिक आणि वास्तविक दोन्ही पातळीवर आहे. नक्की बघा आणि आपला अभिप्राय सांगा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.