सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

शक्तिमान वाचवायला येईन म्हणून लहान पोरं बिल्डिंग वरून उड्या मारायचे

shaktimaan-interesting-facts-marathi

‘शक्ती शक्ती शक्तिमान…. या टायटल संगीताने शक्तिमानची सुरुवात व्हायची. गाणं ऐकूण अंगात जोश संचारायचा. मग सुरु झाल्यावर शक्तिमान म्हणजे विषय नाही. एक हात वर करून गंगाधर गोल फिरला कि सगळे विषय मिटणार, ही गॅरन्टी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊ वाटायचं नाही कारण मामाच्या घरी शक्तिमान बघायचे नाहीत. आज तुम्ही किती पण इंग्लिश वेब सिरीज बघत असाल पण शक्तिमान वाढलेल्या पिढीबरोबर तुम्ही तुलना करू शकत नाही. लहानपणी आमच्यात भांडण लागली तर आधी गोल फिरायचो मग पुढच्याला मारायचो. शक्तिमान बघायला शाळा बुडवावी लागते शेठ, याच्यापेक्षा मोठा त्याग असू शकत नाही. थेनॉस बिनास हे असले खलनायक सगळे फुसके बार आहेत तम्राज किलविष समोर. ‘अंधेरा कायम रहे’ म्हणलं कि हातभर फाटली पाहिजे आणि डॉक्टर जयकालचा तर नाद करायचा नाय. बॅटमॅनला जोकरने जेवढा त्रास दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास जयकालने शक्तिमानला दिलाय. तरीपण शक्तिमान सगळ्यांना पुरून उरायचा. शक्तीमान नव्वदीच्या पिढीचा आणि भारताचा पहिला सुपर हिरो होता. नंतर स्पायडरमॅन, सुपरमॅन असे लय मॅन आले पण पहिला मान शक्तिमानलचा राहिला. शक्तिमान हा काळजाचा विषय आहे.

शक्तीमान नव्वदच्या दशकातील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका. २००७ पर्यंत शक्तिमान चालू होतं. मुकेश खन्ना या मालिकेचे अभिनेते आणि निर्माते अशी दुहेरी भूमिका पार पाडत होते. दूरदर्शन आणि मुकेश खन्ना यांच्यात शक्तिमानची वेळ आणि पैसे या दोन गोष्टीवरून वाद सुरु झाले आणि त्या नादात शक्तिमान बंद झालं. शक्तिमान बंद झालं असलं तरी एका पिढीवर शक्तिमान इतकी छाप अजून तरी कोणी पाडू शकलं नाही. आताचे सुपर हिरो शहरात जास्त प्रसिद्ध असतात. शक्तिमान हा शहरी ग्रामीण याच्या पुढे गेलेला विषय होता. गावच्या बाजारात शक्तिमानचे कपडे मिळायचे यावरून शक्तिमान कुठं कुठं पोहचला होता याचा अंदाज घ्या. शक्तिमान हा त्या पिढीचा श्वास होता. काही पोरांना खरंच शक्तिमान संकटात मदतीला येईल असं वाटायचं. त्या काळात शक्तिमानच्या दुष्परिणामाच्या बातम्या वाचल्या असतील तर आठवेल कि काही लहान मुलांनी शक्तिमान वाचवायला येतोय या भोळ्या समजुतीत बिल्डिंग वरून उड्या मारल्या होत्या. यातले काही जण मेले तर काही जखमी झाले होते. हे सगळं शक्तिमानच्या लक्षात आलं तेव्हा तो मालिकेच्या शेवटी संदेश द्यायला लागला. शक्तिमान संदेश देतोय म्हणल्यावर पोरं आवर्जून मालिका संपली तरी उठायची नाहीत. एखादा लहान मुलगा फळ न धुता खातोय बघून शक्तिमान कणखर आवाजात म्हणायचा ‘फळ धुऊन खा’. त्याच शेवटचं वाक्य ऐकायला सगळे आम्ही आतुर असायचो. शक्तिमान मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या म्हणजेच आमचा मितवा होता.

शक्तिमानची अजून एक खासियत होती कि शक्तिमान हिंदू संस्कृतीची मूल्ये आणि संस्कार जपायचा. शक्तिमानला शक्ती पंचमहाभूतांपासून मिळाली आहे असं सुरुवातीलाच दाखवलं जायचं. शक्तिमान कसा झाला हे प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीलाच दाखवलं जायचं. ते बघून हा शक्तिमान अस्सल आपल्या मातीतला सुपरहिरो आहे हे मनाला पटायचं. त्यामुळे शक्तिमान जवळचा वाटायचा. शक्तिमान चालू असतानाच मुकेश खन्नाने ‘आर्यमान’ ही मालिका आणली. या मालिकेला देशी फील नव्हता त्यामुळे ही मालिका फार चालली नाही. शक्तिमान हवेत उडताना, खलनायकाला धुताना जे VFX दाखवलं जायचं त्यावेळच्या मानाने ते VFX चांगलं दाखवलं होतं. शक्तिशाली असूनही शक्तिमान गुरुचं सतत ऐकत असतो हे त्यावेळच्या लोकांना लय अप्रूप होतं.

२००७ नंतर मुकेश खन्ना यांना विनंती करण्यात आली होती की शक्तिमान ही मालिका परत सुरू करावी. भारताचा पहिला सुपरहिरो म्हणून त्याला जगप्रसिध्दी मिळावी ही सर्वांची इच्छा होती. शक्तिमानची मागणी आजही आहे म्हणून मुकेश खन्ना यांनी सोनी कंपनीला शक्तिमानचे अधिकार विकले आहेत. १० फेब्रुवारी २०२२ रोजी सोनी पिक्चर इंडियान कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनल वरुन ‘शक्तिमान’ या अनिमेटेड चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध केला ज्यावर अनेक लोकांनी प्रेम दाखवले. सोनी कंपनी जगप्रसिद्ध कंपनी आहे त्यामुळे ग्राफिक्स आणि सिनेमाटोग्राफी मध्ये काहीच अडचण नाही येणार. फक्त पटकथा आणि पात्र तेच असतील की वेगळे असतील याची उत्सुकता सर्वांना आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.