१९५८ ते १९६२ या काळात माओच्या नेतृत्वात चीनने असे अनेक निर्णय घेतले जे इतिहासात डोकावून पाहिल्यावर कळेल कि हे निर्णय म्हणजे ऐतिहासिक चूक होती. राज्यकर्ते बऱ्याच वेळा असे निर्णय घेतात ज्यात लोकांचं मनोरंजन असतं पण त्यात लोकांचं भलं नसतं. माओने सामाजिक आणि आर्थिक क्रांतीच्या नावाखाली असे अनेक निर्णय घेतले ज्यात तत्कालीन चिनी जनता भरडली गेली. माओला सांस्कृतिक क्रांतीचा निर्णय नंतर बदलावा लागला पण तोपर्यंत किती नुकसान झालं याचा हिशोब अजून चालू आहे. यातलाच एक निर्णय ज्याला अनेक पर्यावरणवादी ऐतिहासिक चूक मानतात तो प्रयोग म्हणजे ‘फोर पेस्ट्स कॅम्पेन. सामाजिक स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी माओने ही मोहीम सुरु केली होती. फॉर पेस्ट कॅम्पेन मध्ये चार उपद्रवी कीटकांचा नाश सामूहिक पद्धतीने करण्याची योजना आखली.
६० च्या दशकात चीन सरकारने शेतकऱ्यांना उपद्रव होतो ह्या सबबीखाली देशातील सर्व चिमण्यांना मारण्याचा निर्णय घेतला. माओने जनतेला उंदीर, डास, माश्या आणि चिमण्या मारायचं आव्हान केलं. हे मोहीम चिमणी हटाव मोहीम म्हणून पण चीन मध्ये आजही प्रसिद्ध आहे. सरकारचे असे म्हणणे होते की उंदीर, डास आणि माश्या हे अनुक्रमे प्लेग, मलेरिया आणि टायफॉईड रोगांस कारणीभूत असल्यामुळे खूप नुकसान करतात. चिमण्या शेतातील धान्य आणि फळे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय म्हणून त्यांना पण ह्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. फोर पेस्ट कॅम्पेनच्या प्रचार प्रसारासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या. शाळा, महाविद्यालयांत अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर अनेक जनजागृती मोहीमा हाती घेण्यात आल्या. अगदी थोड्याच दिवसात ह्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. सामूहिकरित्या चिमण्या मारायला तेव्हाच्या जनतेला काय हुरूप आला असेल हे कल्पना करून बघा.
चिनी लोक सापळे लावून चिमण्या पकडू लागले. बंदुकीने, गोफणीने चिमण्यांची शिकार करू लागले. त्यांचे घरटे उध्वस्त करू लागले. ढोल, वाद्ये ह्यांच्या साहाय्याने मोठमोठे आवाज काढुन चिमण्यांना पिटाळू लागले. गरीब बिचाऱ्या चिमण्या ह्या त्रासाने वैतागून दमून खाली पडू लागल्या आणि क्रूरपणे मारल्या जाऊ लागल्या. अनेक जंगलात चिमण्या लपून राहायचा प्रयत्न करू लागल्या पण लोक तिथं पण पोहचून ढोल वाजवून चिमण्यांना हाकलून लावत. अक्षरशः चिमण्या थकून मरू लागल्या. या काळात अंदाजे १०० कोटी चिमण्या, १५० कोटी उंदीर, करोडो माश्या आणि डास मारण्यात आले. एकंदरीत चिनी सरकारचा उपक्रम यशस्वी झाल्यात जमा होता. चिनी सरकारने असा विचित्र निर्णय घेऊन निसर्गाच्या चक्राला बिघडवलं ज्याचा परिणाम इतका भयंकर होता कि पुढं चिमण्यांचा बदला माणसांचे जीव घेऊन निसर्गाने घेतला.
निसर्गावर केलेल्या ह्या आक्रमणाचा जबरदस्त तडाखा चीनला सोसावा लागणार होताच. चिमण्यांच्या बेसुमार कत्तलीमुळे शेतीचा नाश करणाऱ्या अनेक कीटकांची (टोळ, नाकतोडे, इ.) संख्या अनियंत्रितपणे वाढू लागली. ह्या कीटकांचा फडशा पाडून शेतीचे रक्षण करणाऱ्या चिमण्याच नसल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी घट होऊ लागली. सुरुवातीला १५ टक्के असणारी ही घट ७० टक्के पर्यंत पोहचली.
सामान्य जनतेवर ह्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला. अन्नधान्याच्या तुटवड्याची आणि निसर्गाचा समतोल बिघडवल्याची परिणीती दुष्काळात झाली. पुढील काही वर्षात भयंकर उपासमारीने चीन मध्ये थैमान घातले. ज्यात अंदाजे २ ते ४ कोटी लोक मृत्युमुखी पडले. चिनी सरकारला आपली चूक समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. पुढे काही वर्षांनी त्यांनी फोर पेस्ट कॅम्पेनमधून चिमणीला वगळले आणि त्याजागी ढेकूणांची भरती केली होती. पण त्याने जास्त काही फरक पडला नाही. ह्या सर्व खटाटोपामध्ये चीनमध्ये चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊन पोचली.
चीन सरकारच्या ह्या विचित्र निर्णयाला एक मोठी आणि अक्षम्य चूक नक्कीच म्हटले जाऊ शकते
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?