सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महिलांमध्ये वाढते कॅन्सरचे प्रमाण

increasing-percentage-of-cancer-in-women

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या काळात महाराष्ट्र शासनाच्या ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ या अभियानांतर्गत १८ वर्षांवरील ४ कोटी महिलांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. त्यात राज्यातील सुमारे ५२ हजारांहून अधिक स्त्रिया कॅन्सरच्या संशयित रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातूनच दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

जागतिक पातळीवर देखील महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. जागतिक पातळीवरील एकूण कॅन्सरच्या प्रकरणात महिलांचे प्रमाण ४८% आहे. भारतात देखील दर एक लाख महिलांमागे १०३ महिलांना कॅन्सर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग या प्रकारचे कर्करोग प्रामुख्याने आढळतात.

कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील स्त्रियांमध्ये अधिक आहे. वेळीच रोगाचे निदान न होणे आणि योग्य उपचाराच्या अभाव ही या मागची प्रमुख करणे आहेत. लॅन्सेट कमिशनच्या ‘वूमन, पॉवर अँड कॅन्सर’ या अहवालानुसार कॅन्सरची वेळेवर तपासणी झाली असती, वेळेवर निदान झाले असते आणि योग्य उपचार मिळाले असते तर भारत साधारण ६३% महिलांचा मृत्यू टाळता आला असतात.

लॅन्सेटच्या या अहवालानुसार महिलांना वेळेवर तसेच योग्य उपचार मिळण्यास उशीर होतो. महिलांकडे आर्थिक तसेच अन्य निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. तसेच उपचारांची घराजवळ सोय नसते. या सर्व कारणांमुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. या सर्व कारणांमुळे कॅन्सरग्रस्त स्त्रियांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.

त्यातही देखील स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचवेळा स्त्रिया या रोगांवर उपचार करण्यासाठी पुरुष डॉक्टरकडे जात नाहीत. परंतु ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध असतील याची शक्यता कमी असते. त्यामुळे आजार बळावल्यानंतर स्त्रिया शहरात जाऊन महिला डॉक्टरकडे उपचार घेतात परंतु या प्रक्रियेत बराच वेळ गेलेला असतो परिणामी रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना यश येत नाही.

अशावेळी महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी शासन अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकते. सर्वात प्रथम स्त्रियांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाला आशा सेविकांनी मदत घेता येऊ शकते. कॅन्सरची सुरवातीची लक्षणे काय असतात, महिलांनी स्वतः आपल्या स्तनाची तपासणी कशी करावी याबाबत शासनाने स्त्रियांना माहिती देणे आवश्यक आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित यासारख्या अभियानातून वेळोवेळी स्त्रियांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे जेणेकरून प्राथमिक स्तरावरच कॅन्सरचे निदान करता येईल. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरांची नियुक्ती केली जावी. कॅन्सरचे उपचार महाग असल्याने बऱ्याच वेळा स्त्रियांना ते उपचार परवडत नाहीत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कॅन्सर उपचारासाठी मोठ्या प्रमाणत अनुदान दिले जावे तसेच यामध्ये महिलांना प्राधान्य दिले जावे. राज्यातील तृतीय स्तरावरील सरकारी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर दर्जेदार उपचार मिळतील यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तसेच एचपीव्ही विषाणूंमुळे महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. आत्ता एचपीव्ही विषाणूंचा हल्ला रोखणारी स्वदेशी बनावटीची लास विकसित करण्यात आली आहे. शासनाद्वारे ७ ते १० वीतील शाळकरी मुलीना ही लास देण्यात यावी. अशाप्रकारे अनेक पातळ्यांवर काम केल्यास स्त्रियांमधील कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यास यश येवू शकते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.