फेब्रुवारी 21, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अधिकारी वानखेडे विरुद्ध मंत्री नवाब मलिक.

समीर वानखेडे हे महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आहेत. २००८ च्या बॅचचे ते IRS अधिकारी आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेंटला असल्यामुळं समीर वानखेडे हे मागच्या दोन-तीन वर्षांपासून मुबई नार्कोटिक ब्युरो मध्ये झोनल कमिशनर या पदावर काम करत आहेत. समीर वानखेडे हे खऱ्या अर्थाने चर्चेत आले मागच्या वर्षी झालेल्या सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर. ड्रुग्स शोधमोहीम त्यांनी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चालवली. त्यात रीया चक्रवर्तीची अटक असेल किंवा त्या नंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण, कॉमेडियन भारती, अभिनेता अर्जुन रामपाल आणि इतर यांच्या चौकश्या झाल्या आणि समीर वानखेडे हे ड्रग रॅकेट करणाऱ्यांसाठी सिंघम बनले आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांची नोंद घेतली गेली. पण आता मात्र समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आडकले आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले आहेत. हे सर्व अभिनेता शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेनंतर झालं. बघता बघता हीरो असलेले समीर वानखेडे हे व्हिलन झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

काय आहेत नवाब मलिक यांचे आरोप ?

अभिनेता शाहरुखं खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या टीम ने दोन ऑक्टोबरला मुंबईत ड्रग प्रकरणात अटक केली. समीर वानखेडे परत प्रकशझोतात आले. आर्यन खानच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांनी अनेक पुरावे त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर केले आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा आरोप हा केला आहे की, समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने अभिनेता शाहरुख खान ह्याच्या कडून खंडणी घेण्यासाठी त्याच्या मुलाला अटक केली आहे. नवाब मलिक असे आरोप करतात की आर्यन खान सोबत जे लोक पार्टी मध्ये होते त्यांना कसलीही विचारपूस न करता सोडण्यात आले. परंतू आर्यन खानला अटक करून त्याची कस्टडी घेण्यात आली. नवाब मालिकांनी पुढे जाऊन समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे की समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत परंतु त्यांनी UPSC (केंद्रीय लोक सेवा आयोग ) मध्ये मागासवर्गीय
वर्गातून नोकरी मिळवली आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे कागदपत्रे प्रसिद्ध केले आहेत. या सर्व आरोपांमुळे समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत.

समीर वानखेडे यांची बाजू काय आहे ?

मंत्री नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे ह्यांनी हे आरोप बिन बुडाचे असल्याचं सांगितलं आहे. नवाब मलिक यांनी त्यांना बदनाम करण्यासाठी हे केल्याचं समीर वानखेडे सांगत आहेत. मालदीव मधील खंडणीच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे समीर वानखेडे म्हणत आहे. कुटुंबासोबत सुट्टी साठी मालदीवला गेलो होतो त्याचा खंडणीशी काही ही संबंध नाही, असा दावा समीर वानखेडेंचा आहे.

समीर वानखेडे हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. पती समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावलं गेल्यामुळे क्रांती स्वतः मैदानात उतरली आहे. क्रांती ही समीर वानखेडे यांची बाजू खंभीरपणे मांडत आहे. समीर वानखेडे यांच्यावर वर हे आरोप हे आकसापोटी केले आहेत, शेवटी सत्याचाच विजय होतो त्यामुळे समीर वानखेडे हे ह्या सगळ्यातून निर्दोष बाहेर पडतील, असा अभिनेत्री क्रांती रेडकरला विश्वास आहे.

समीर वानखेडे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार ?

समीर वानखेडे आरोप प्रकरणामुळे NCB खुप बदनामी झाली आहे. NCB ही केंद्रीय संस्था १९८६ पासून ड्रुग्स रोखण्याचे काम करते आहे. NCB चे काम आजवर कौतुकास्पद आहे परंतु समीर वानखेडे यांच्यामुळे NCB ही संस्था आरोपाच्या भोवऱ्यात आली आहे. लोकांमध्ये NCB ची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास परत मिळवणे NCB ला खूप गरजेचे आहे. अधिकारी समीर वानखेडेवर NCB ने आधीच एक अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. समीर वानखेडे हे दोषी आहेत की नाही, हे पुढे येईलच ! नवाब मालिकांनी केलेले आरोप खरे होते किंवा ते फक्त प्रसिध्दी साठी करत होते हेही सिद्ध होईल. चौकशी मध्ये दूध का दूध होऊन जाईल. परंतु ह्या सगळ्यामध्ये NCB ची प्रतिष्ठा पणाला लागली आहे की ते कसे चौकशी करतात. समीर वानखेडे यांना चौकशी होईपर्यंत सस्पेंड करतात का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आजच न्यायमूर्ती रमाना म्हणाले आहेत, “न्याय होण्यासोबत तो दिसणं देखील महत्त्वाचं आहे.” समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या वादात NCB ची परीक्षा होते आहे. NCB त्यातून बाहेर पडणे देशासाठी महत्त्वाचं आहे. NCB काय करते आहे हे येणारा काळच उत्तर देईल.

-विष्णू बदाले

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.