सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सरस्वती देवीच्या श्रद्धेपोटी विजापूरचे नामांतर करणारा आदिलशहा.

सरस्वती देवीच्या श्रद्धेपोटी विजापूरचे नामांतर करणारा आदिलशहा.

मुस्लिम राज्यकर्ता म्हटला कि त्याची जुलूम, अन्याय करणारा, हिंदू द्वेषी अशी प्रतिमा रंगवली जाते. मात्र प्रजेत जगतगुरु बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेला आदिलशाही मधील एक बादशहा ह्या सर्व पूर्वग्रहांना छेद देणारा होता, तो म्हणजे विजापूरचा इब्राहिम आदिलशहा दुसरा.

भाका न्यारी भाव एक

कहा तुर्क कहा ब्राम्हण

(एक भिन्न भाषा किंवा भावना असलेला तुर्क (मुस्लिम) किंवा ब्राम्हण सामान आहे. )

नौरस सूर जुगा जोती

आणि सरोगुनी युसात सरसुती माता

इब्राहिम परसादा भायी दुनी

(हे सरस्वती माता तुझा आशीर्वाद लाभलेले इब्राहिमचे नौरस (पुस्तकाचे नाव) हे चिरंतर राहील.) इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या ‘किताब ए नौरस ची सुरवात हि सरस्वती देवीच्या उल्लेखाने होते. बादशाहवर शिव पार्वती व इतर हिंदू देवतांचा आणि रामायण महाभारतसारख्या पुराणांचा खोलवर परिणाम आहे ते याच पुस्तकामुळे समजते.

बादशाहने स्वतःचा धर्म इस्लाम मधील सुन्नी पंथ जरी मान्य केला असला तरी इतर धर्मांबाबत राजाचे आचरण कमालीचे उदार होते. त्याच्या काळातील एका चित्रामध्ये त्याचा उल्लेख असा आहे, ‘याचे वडील गुरु गणपती आणि आई ही देवी सरस्वती आहे.’ एकवेळ तर बादशाहने सरस्वती देवीच्या श्रद्धेपोटी विजापूरचे नामांतर विद्यापुर करून टाकले होते. बादशहाचे हे वर्तन बघून दरबारींना बादशाह गुप्तपणे हिंदू धर्माचे पालन करीत आहे, अशीच शंका होती.

बादशहाचे मराठी, संस्कृत, कन्नड या तिन्ही भाषांवर प्रभुत्व होते. त्याच्या दरबारात फारशी ऐवजी दख्खनी ही प्रमुख भाषा होती. यामुळे अनेक मराठी सरदारांना दरबारात मानाची पदे मिळवणे सोपे झाले. इब्राहिम आदिलशहा दुसरा नाण्यांवर संस्कृतमध्ये स्वतःचा उल्लेख ‘अबला बली’ म्हणजेच गरिबांचा मित्र असा करत होता. बादशहाच्या दरबारातील मराठी भाषेचा उपयोग पाहून मुघल दुतही चांगलाच गडबडला होता. मराठी ब्राह्मणाचा दरबारात चांगलाच दबदबा होता. महाराष्ट्रीयन नर्तिका रंभा ही बादशाहच्या हरम मधील सर्वात आवडती नर्तिका होती.

नखांना लाल रंगाचे नेलपॉलिश लावणे असू दे वा संगीतातली विशेष रुची बादशहाचे वागणे जनतेला अचंबित करणारे होते. मात्र राज्यकारभार चालवण्यात इब्राहिम आदिलशाह दुसरा हा तेवढाच तरबेज होता. त्याचा राज्यकाळ हा आदिलशाहीतील सर्वात संपन्न काळ मानला जातो. विजयनगरच्या लुटीतून त्याने विजापूरचे रुपडेच पालटले. नौरसपूर ही अदिलहाशीची नवीन समृद्ध राजधानी त्याचीच देण होती.

जन्मभर सुन्नी पंथ आचरणात असणाऱ्या इब्राहिमच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्मनिष्ठेवर अनेक शंका उपस्थित केल्या आणि यामुळेच त्याच्या थडग्यावर लिहावे लागले कि, ‘नाही, खरोखर इब्राहिम यहुदी नव्हता किंवा ख्रिश्चन नव्हता; पण तो मुसलमान होता आणि विश्वासाने शुद्ध होता; तो कधीही मूर्तिपूजक नव्हता.

-शिवप्रसाद ढगे

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.