MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत हडप्पा संस्कृती धोलावीरा शहराची निवड का झाली ?

हडप्पा संस्कृती मधील काही महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर धोलावीरा होय. भारतातील गुजरात राज्यात असणाऱ्या धोलावीरा या शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. ४४ व्या जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी भरवण्यात आलेल्या, चीन अध्यक्षस्थानी असणाऱ्या या युनेस्कोच्या ऑनलाइन बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ही बैठक १६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पार पाडण्यात येत आहे. त्यामुळे गुजरात मधील ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळणारे हे चौथे ठिकाण आहे. या आधी राणी कि वाव, चंपानेर तसेच अहमदाबाद शहराला या यादीत स्थान मिळालेले आहे. धोलावीरा याचे वेगळेपण आणि महत्त्व म्हणून या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला, ते वेगळेपण आणि महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.

धोलावीरा काय आहे?

हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये साडेचार हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले हे एक शहर होय. तसेच हडप्पा संस्कृतीतील पाच मोठ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आणि हडप्पा संस्कृतीतील भारतात आढळणाऱ्या दोन मोठ्या नागरी रचनांपैकी एक संरचना. धोलावीराला कोठाडा असेही संबोधले जाते. कोटाडा म्हणजे भव्य किल्ला.

धोलावीरा शहराची रचना कशी होती?

धोलावीरा या शहराची रचना पाहिल्यास ती तीन भागात विभागलेली दिसेल त्यातील,
१) राजमहाल: हा शहराचा सर्वात उंचावर असणारा भाग आहे. सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या या महालाला चार दरवाजे होते.
२) इतर अधिकाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी सुद्धा संरक्षित भिंत बांधलेली आढळते. दोन खोल्यां पासून ते पाच खोल्या असलेल्या घरात ते वास्तव्य करत असल्याचे आढळून आले.
३) सामान्य लोकांची घरे विटांनी बांधलेली असत.

धोलावीराचे महत्व काय आहे?

१९६७-६८ यावेळी करण्यात आलेल्या उत्खननामध्ये धोलावीराचे अवशेष सापडले आहे. तसेच हडप्पा संस्कृतीत असणाऱ्या मोठ्या शहरांपैकी पाचव्या क्रमांकावरील हे शहर आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार धोलावीरा हे व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या स्थानांमधील एक होय. उत्खनना दरम्यान येथे सोने-चांदी, टेरा कोटा पासून बनवलेले अलंकार सापडले आहेत. तसेच संशोधकांच्या मते या ठिकाणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जल संधारण यंत्रणा. ७७ लाख लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणारे तलाव; १६ ताज्या पाण्याचा पुरवठा करणारे जलाशय आणि बाकी विविध पद्धतीचे जलाशयाचे बांधकाम आढळून आले. असेही म्हटले जाते की, ही यंत्रणा जगातल्या अत्यंत आधुनिक पद्धतीच्या संरचना पैकी एक होय.

युनेस्कोच्या बैठकीत चर्चेत असणारी अजून एक बाब म्हणजे दक्षिण आशियातील ही जुन्या काळात( 3rd to 2nd century BC) असणारी सर्वात लक्षणीय आणि संरक्षित अशी नागरी रचना आहे. वरील सर्व बाबी जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या धोलावीराचे महत्त्व अधोरेखित करते परंतु जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या अजूनही काही स्थळे आहेत जसे की याच वर्षी १३ व्या शतकातील काकातिया मंदिर रुद्रेश्वर या मंदिराला ही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. त्याच अनुषंगाने काही जास्तीची माहिती असणे अनिवार्य आहे. जागतिक वारसा स्थानाची मान्यता कधीपासून मिळतेय? का मिळते? कोणाला मिळते? याचा इतिहास आणि प्रक्रिया याची माहिती असणे गरजेचे आहे.

इतिहास काय आहे ?

जागतिक वारसा स्थळाचा दर्जा द्यायला हवा याची सुरुवात झाली ती १९५९ मध्ये. कशी ? संयुक्त राष्ट्राचा भाग असणारा युनोस्को. युनोस्को या संस्थेला इजिप्त या देशाने सद्यस्थितीत धोका असणाऱ्या वास्तु आणि स्थळांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना संवर्धित करण्यासाठी मदत मागितली आणि हीच ती सुरुवात होती जिथे वास्तु आणि स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त व्हायला लागला.

या स्थळांचा समावेश कसा होतो त्याचे मापदंड काय आहेत?

युनोस्को तर्फे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या ठिकाणाला स्थळाला द्यायचा याचा निर्णय घेतला जातो. मात्र, त्यासाठी आपल्या आपल्या देशांना आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा स्थळांचे नाव मान्यतेसाठी सुचित करावे लागते.

मापदंड काय?

मापदंड यांचा विचार करता काही निकषांच्या आधारावर हा निर्णय घेतला जातो. ते खालीप्रमाणे आहेत.
१) मानव निर्मित अलौकिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या स्पष्ट नमुन्याची वास्तु किंवा स्थळ.
२) असे एखादे स्थळ, एखादी वास्तू ,स्मारक जे मागील बऱ्याच वर्षापासून त्याच्या कलाकृतीतून मानवी मूल्यांची देवाणघेवाण करण्यास कारणीभूत ठरते.
३) एखादी संस्कृती अद्वितीय अलौकिक पणाची साक्ष देते.
४) स्मारके वास्तु,स्थळे जी मानवी इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावतात.
५) पारंपारिक मानवी समाज,संस्कृती संरचना तेथील संस्कृतीशी, पर्यावरणाशी नाळ टिकून ठेवण्यास कारणीभूत ठरतात.
६) जागतिक स्तरावर महत्वपूर्ण ठरणारे कलात्मक, वाड्मयीन कलाकृती वस्तुतः लोकांच्या भावनांशी श्रद्धेशी निगडित आहे.
७) अप्रतिम सौंदर्यानुभवाचा जिथे अनुभव घेता येतो.
८) तसेच नैसर्गिक पर्यावरणीय जैविक उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे घटक.
९) जैविक विविधता जी धोक्यात आहे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून काढण्यात येणाऱ्या अनुमानातून त्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो.

बरं ! हे सर्व ठीक आहे पण एक प्रश्न सामान्यांच्या मनात कायम येतो की, जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा तर मिळाला पण याचा फायदा काय?

१) पर्यटन- कोणत्याही गोष्टीचा बोलबाला झाला की त्या ठिकाणाला, घटनेला भेट देणाऱ्यांची गर्दी जमते. तसेच इथे होते विशिष्ट बाबीला मिळणारा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा त्या जागेला पर्यटनाच्या दृष्टीने जास्त महत्त्व मिळवून देतो. ज्याचा परिणाम आर्थिक स्तरावर पाहायला मिळतो आणि एकूणच आर्थिक स्तर उंचावला की लोकांचा सामाजिक स्तर उंचावतो.
२) निधी- कोणत्याही स्थळाची देखरेख ही पैशाअभावी दुर्लक्षित केली जाते. परंतु जागतिक वारसा त्याचा दर्जा मिळाल्यानंतर त्या सुनिश्चित स्थळाला त्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी निधी मिळतो.
३) युद्धाच्या काळात मिळणारे विशेष संरक्षण- विशिष्ट गोष्टीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मिळालेले स्थान त्याला युद्धाच्या काळात विशेष संरक्षणाचा दर्जाही मिळवून देतो. जिनेव्हा कन्वेंशन नुसार त्या वास्तु स्मारके स्थळ यांच्यावर विरोधी देशाला हल्ला चढवता येत नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.