सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अस्तित्ववाद जगणारे कवी आणि समाजसेवक होते अनिल अवचट.

डॉ अनिल अवचट एका पेशात जगले नाहीत. ते गरीब लोकांचे प्रश्न मांडणारे पत्रकार होते, लोकांना व्यसनापासून दूर करणारे डॉक्टर होते. मनाची बाजू लिहणारे कवी होते, जगण्याची दिशा स्पष्ट करणारे साहित्यिक होते.

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट बघितली, ‘अनिल अवचट गेले ,माणसांचा मित्र गेला.’

कळायचे ते कळून गेलं. डॉ अनिल अवचटांनी आपला निरोप घेतला आहे. घरी घसरून पडले असल्यामुळे शिवाजी नगरच्या संचेतीमध्ये ऍडमिट होते. डॉक्टर आता बरे आहेत अश्या बातम्या आल्या होत्या. पण आजच्या बातमीने काळजाचा ठोका चुकवला आहे.

डॉक्टर स्वछंदी होते, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात ते कसलीही पर्वा करत नसत. ‘अस्तित्ववादी जगणं’ असं त्याला ते म्हणायचे. युवक क्रांती दलाचे संस्थापकांपैकी अनिल अवचट एक होते. त्यामुळे आंदोनलनाचे नेतृत्व आणि नियोजन करायची जबाबदारी अनिल अवचटांकडे असायची. एकदा युक्रांदने विद्यार्थ्यांचे आंदोलन करायचे ठरवले होते. पुण्याच्या गुड लक चौकात प्रदर्शने करायचे ठरले. सगळे सहकारी जमले होते . पण आंदोलन चालू होत नव्हतं. बऱ्याच लोकांना कळेना काय झालं. सर्व तर आले आहेत मग काय समस्या आहे ? अंदोलन सुरु होत नव्हतं कारण अनिल अवचट पोहचले नव्हते. अनिल कधीही उशीर करायचे नाही पण आज का उशीर करत असतील ? कोणाला कळत नव्हतं. शेवटी अनिल अवचट गुड लक चौकात पोहचले तेंव्हा सहकार्यांनी विचारले डॉक्टर उशीर का झाला ? तर डॉक्टर म्हणाले ,’ मित्रानो मला माफ करा, घरून निघताना पंडित भीमसेन जोशींचा आवाज कानी पडला आणि मी थांबलो. सर्व संगीत ऐकूनच मी निघालो.’ डॉक्टरांचा स्वभाव सर्वाना माहित असल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि आंदोलन झाले. असा स्वछंदी जगणारा माणूस आपल्याला सोडून गेलाय.

डॉक्टर असून पत्रकार होणारे अनिल अवचट पहिलेच असावेत.

पुण्याच्या बाजूलाच असणारे ‘ओतूर’ गावचे डॉक्टर. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण गावातच घेतल्यावर पुण्याच्या मॉडर्न कॉलेज मध्ये आले. तिथूनच पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरकी शिकायला गेले. बीजे मधेच डॉक्टरांची जडघडण झाली. त्यांची बायको सुनंदा पण तिथलीच विद्यार्थिनी. महाराष्ट्र नुकताच स्थापण झाला होता. विकासाचे आणि प्रगतीचे वारे वाहायला लागले होते . ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पत्रकारांचे योगदान मोठे ठरणार होते. पण सध्या जी पुण्या मुंबईची पत्रकार मंडळी आहेत ती गोरगरीब जनतेची प्रश्न मांडतील का याबाबत डॉक्टरांच्या मनात शंका होती. नंतरच्या काळात डॉक्टर स्वतःच पत्रकार झाले. आपण जी भाषा बोलतो ती लिहायची नसते कारण बोलण्याची आणि लिह्ण्याची भाषा वेगेळी असते, पत्रकारांमध्ये असा समज होता. अनिल अवचटांनी तो समज मोडून काढला आणि लोकांना समजेल अश्या भाषेत लिहायला लागले. लोकांचे प्रश्न लोक भाषेतच असायला हवीत अस अनिल अवचटांचं मत होतं आणि त्यांनी शेवटपर्यँत ते पाळलं. डॉक्टर होऊन यशस्वी पत्रकार होणारे अनिल अवचट अजरामर राहतील.

मुक्तांगणच्या माध्यमातून व्यसनमुक्ती साठी काम केलं.

पत्नी सुनंदा, पु. ल. देशपांडे आणि इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन डॉक्टर अनिल अवचटांनी मुक्तांगणची स्थापना केली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मुक्तांगण त्यांना मदत करतं. हजारो लोकांची व्यसने अनिल अवचटांनी सोडवली. लोकांना व्यसनापासून दूर करण्याची त्यांनी पध्दत अनोखी होती. जगभरातल्या अनेक व्यसनमुक्ती केंद्रात मुक्तांगणची पद्धती वापरली जाते. हे डॉक्टर अनिल अवचट आणि मुक्तांगणच यश. अवचटांची मुलगी ‘मुक्ता’ आता मुक्तांगणची जबाबदारी सांभाळते.

डॉ अनिल अवचट एका पेशात जगले नाहीत. ते गरीब लोकांचे प्रश्न मांडणारे पत्रकार होते, लोकांना व्यसनापासून दूर करणारे डॉक्टर होते. मनाची बाजू लिहणारे कवी होते, जगण्याची दिशा स्पष्ट करणारे साहित्यिक होते. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली देणे माझ्या लेखणीला झेपणार नाहीच. आजच्या दिवशी त्यांच्याच कवितेची एक ओळ आठवते,

वारा हलवितो झुला

नभ घाली पांघरून.

पक्षी गाती गाणे

बाळ झोपलं निवांत.

अनिल अवचटांनी त्यांच्या ‘मुक्ता’ साठी कविता लिहली असेल. पण आज अनिल स्वतः निवांत झोपले आहेत. त्यांची काळजी घ्यायला वारा ,नभ ,पक्षी सर्व जण आतुर असतील. स्वछंदी माणूस आणि थोर साहित्यतिक डॉ अनिल अवचटांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.