मुंबई मध्ये बांद्रा ताज लँडच्या बाहेर गर्दी होती. ट्राफिक नियंत्रणात आणायला अवघड जात होतं. सलमान शाहरुखच्या गाडयांची वर्दळ चालू होती. या कार्यक्रमात सेलिब्रिटी कोणते कपडे घालणार म्हणून पत्रकार आणि फॅन लोकांच्या चर्चा सुरु होत्या. स्वतः आयोजक कोणत्या रूपात येणार याचं सगळ्यांना आकर्षण होतं. ही कोणत्या पार्टीची चर्चा नाही तर बाबा सिद्धीकीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची चर्चा होती. बॉलीवूडच्या पार्ट्यांची जेवढी चर्चा नसते तेवढी चर्चा बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची असते. सलमान पासून सगळे मोठे सेलिब्रिटी इथं दरवर्षी हजेरी लावतात. हे तर काहीच नाही सलमान आणि शाहरुख यांचं भांडण झालं तेव्हा ते कधी मिटणार नाही असं वाटत असताना बाबा सिद्धीकीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सलमान शाहरुख एकमेकांच्या गळ्यात पडले. हे बघून मीडियाला आठवडाभर दुसऱ्या बातम्या करायची गरज पडली नाही. बाबा सिद्धीकीच्या शब्दावर इफ्तारला हजेरी लावणारे सेलिब्रिटी बघून एखाद्याला वाटू शकतं खरा सेलिब्रिटी तर सिद्धीकी आहेत. बरं इथं फक्त बॉलीवूड नाही तर सर्व पक्षीय नेते पण आवर्जून हजर राहतात. यावरून बाबा सिद्धीकी यांचा इतिहास काय हा प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा.
झियाउद्दीन सिद्दिकी ज्यांना बाबा सिद्दीकी म्हणूनही ओळखले जाते. वयाची पन्नाशी गाठलेले बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार इफ्तार पार्ट्या, बांद्रा आणि काँग्रेस हे खूप जुनं समीकरण आहे. सिद्दीकी स्वतःची ओळख बांद्रा बॉय अशी सांगतात. st Anne’s School मधून शालेय शिक्षण तर MMK कॉलेजमधून पदवी पर्यंत बाबा सिद्धीकी यांचं शिक्षण झालंय. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. पक्षात काम करत असताना ते हळूहळू प्रभावी होत गेले. मुस्लिम बहुल भागात तर त्यांचा विशेष दबदबा होता. १९९२ आणि १९९७ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९९ मध्ये आमदार झाले. २००४ आणि २००९ ला पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. २०००-२००४ या कालावधीत महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्ती केली होती. २००४ ते २००८ या कालावधीत अन्न व नागरी पुरवठा, कामगार, FDA आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे.
सलग तीन वेळा आमदार त्याआधी नगरसेवक अशी पंधरा वीस वर्षे कायम सत्तेत असल्याने मोठ्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. बांद्रा इथून निवडून आलेले खासदार सुनील दत्त हे सिद्दीकी यांच्या जवळचे मानले जात. सुनील दत्त यांच्यनांतर मुलगी प्रिया दत्त यांनी ती जागा घेतली. सिद्दीकी आणि दत्त कुटुंब यांचे संबंध अजूनही कायम आहेत. त्यामुळे बाबा सिद्दीकी आणि बॉलीवूड जवळ यायला वेळ लागणार नव्हता. सिद्दीकी राजकीय वापरून सेलेब्रिटी लोकांचे दोस्त कसे झाले हे अजून नीट समजलं नाही. वर्षभर मुंबई सोडून बाबा सिद्दीकी चर्चेत नसतात पण इफ्तार आलं कि बाबा सिद्दीकी हे नाव चर्चेत येतं. बाबा सिद्दीकी म्हणतात कि इफ्तारच्या आधी ईद ए मिलाद चे कार्यक्रम आम्ही घायचो पण पुढे ते बंद झालं. त्यानंतर इफ्तार पार्टी सुरु केली ती अजूनही चालू आहे.
सिद्दीकी यांचा चढता आलेख थांबला गेला तो २०१४ ला. मोदी लाटेत भाजपच्या आशिष शेलार यांनी सिद्दीकी यांची वैजयी घौडदौड थांबवली. सत्ता बदलली कि अडचणी वाढतात तसं सिद्दीकी यांच्या कामाच्या पद्धतींवर शंका घ्यायला सुरुवात झाली. अनके अवैध धंद्यात त्यांचा हात असल्याचं बोललं गेलं. बांद्रा मधील प्रत्येक कामात सिद्दीकी यांची भागीदारी असते असं काहीजण म्हणतात. २०१७ ला ईडीने त्यांच्यावर धाड टाकली होती. सात वेगवगेळ्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकली होती. ४०० कोटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अवैध सावकारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पुढे ठोस काय हाती लागलं, याचा अजून तपशील नाही.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !