सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कोविडच्या काळात वरदान ठरलेल्या जम्बो हॉस्पिटलचा उगम ब्रिटिशांच्या काळात झालाय

Jumbo Hospitals’ that British set up in Pune during the bubonic plague

संचेती हॉस्पिटल कडून डेक्कनला जाताना CoEP हॉस्टेल समोर जम्बो कोविड सेंटर नजरेला पडलं असेलच. सेंटरच्या बाहेर नातेवाईकांची गर्दी बघून काही जणांना धसका पण बसला असेल. मागचे दोन तीन महिने सोडले तर जम्बो हॉस्पिटलचं नाव ऐकलं नाही, असा एकही दिवस गेला नसेल. एकूणच आरोग्य व्यवस्थेचं धिंडवडे उडालेले असताना जम्बो हॉस्पिटमुळे शहरात कोरोना रुग्णांना धीर मिळत होता. मुंबई आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जम्बो हॉस्पिटल वरदान ठरलं. काही तक्रारी सोडल्या तर जम्बोचं काम खरचं चांगलं होतं. यामुळे हजारो नागरिकांना जीवदान मिळालं. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आहे त्या दवाखान्यात उपचार देऊन रुग्णांना न्याय मिळणं अवघड होतं. त्यात हा संसर्गजन्य आजार ! मग कोविड रुग्णांची वेगळी सोय केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातूनच जम्बोची कल्पना पुढे आली. याअगोदर असं काही ऐकलं नव्हतं म्हणून एखाद्याला वाटेल कि असे प्रकारचे जम्बो हॉस्पिटल पहिल्यादाच निर्माण केले गेले आहेत. तर मित्रानो हा इतिहासात पहिलाच प्रयोग नाही. १८९० साली प्लेगच्या साथीत स्वतंत्र जम्बो हॉस्पिटल उभारलं गेलं होतं तेही पुण्यातच !

ऑक्टोबर १८९६ मध्ये जेव्हा शहरात प्लेगची पहिली काही प्रकरणे नोंदवली गेली. तेव्हा रुग्णांना ससून सामान्य रुग्णालयात (१८६७ मध्ये बांधलेले) त्याच्या सांसर्गिक रोग वार्डात उपचारासाठी नेण्यात आले. इतर रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून मुख्य इमारतीच्या बाहेर उभारलेल्या शेडमध्ये रुग्णांना ठेवण्यात आले. रूग्णांची संख्या वाढत असताना अधिकार्‍यांनी मोठ्या जागेवर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ग्रँड पेनिन्सुलर रेल्वे (GIP) च्या मालकीच्या भूखंडावर प्लेगच्या रुग्णांना स्थलांतरित केले. परंतु रेल्वे कर्मचार्‍यांनी प्लेगच्या रूग्णांवर त्यांच्या जागेवर उपचार करण्यास विरोध केला. यामुळे परिस्थिती अजून बिघडली आणि अधिकाऱ्यांना जागा पुन्हा हलवावी लागली. त्यानंतर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी संगम (मुठा आणि मुळा नद्यांचे संगम) जवळ ‘प्लेग हॉस्पिटल’ बांधण्याचा निर्णय घेतला.

हे तात्पुरते रुग्णालय १५ एकर आणि दोन गुंठे परिसरात बांधले गेले. पुणे शहर आणि निम्नशहरी नगरपालिका आणि पूना कॅन्टोन्मेंट यांच्या संयुक्त खर्चाने जम्बो हॉस्पिटल बांधले गेले. ५ फेब्रुवारी १८९७ पासून ‘प्लेग हॉस्पिटल’ कार्यन्वित झाले. जम्बो हॉस्पिटल मध्ये कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी निवासस्थान होते. शिवाय मृत रुग्णांसाठी दफनभूमीची वेगळी सोय केली होती. या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आणि नर्स मिळून १०४ जण होते तर ५९ सुरक्षा कर्मचारी होते. एवढयावरच ब्रिटिश सरकार थांबले नाही. १८९० च्या दशकाच्या उत्तरार्धात पुणे शहर बुबोनिक प्लेगने उद्ध्वस्त झाले होते. पुणे शहरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आधीच तोकडी होती. तेव्हा ब्रिटीश सरकारने आताच्या जम्बो सारखी रणनीती अवलंबली आणि पीडितांवर उपचार करण्यासाठी पुण्यात तब्बल चार ‘प्लेग रुग्णालये’ स्थापन केली होते.

जम्बो हॉस्पिटल उभे केले खरे पण लोक जायला तयार नव्हते

ब्रिटीश सरकारच्या साथीच्या रोगाविरूद्धच्या लढ्यात ‘प्लेग रुग्णालये’ हे एक प्रमुख धोरण होतं. ब्रिटिश सरकारने धोरण तर चांगलं ठरवलं पण भारतीय माणसाच्या मनातील अफवा काही कुठल्या गोष्टीला बदनाम करतील याची काय खात्री नाही. ‘पूना प्लेग कमिटी’ने प्लेगवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्यात केलेल्या इतर उपाययोजनांप्रमाणेच रुग्णालयांकडेही स्थानिक लोक संशयाच्या नजरेने पाहू लागले. रुग्णालयांबद्दलच्या अफवा अशा विचित्र पद्धतीने पसरल्या कि एकाने दावा केला की या रुग्णालयात भारतीय लोकांची हत्या करून त्यांची किडनी आणि यकृत काढून गोऱ्या लोकांचा उपचार केला जातो. अशा अफवांमुळे परिस्थिती आणखी वाईट झाली. त्यातच भर म्हणून भारतीय आणि ब्रिटिश उच्चभ्रूंच्या काही सदस्यांनी रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर आणि सुविधांच्या अभावाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. आताच्या जम्बो सेंटरवर पण असेच काहीसे आरोप झाले होते.

हिंदू, मुस्लिम आणि पारशींसाठी स्वतंत्र प्लेग रुग्णालये

एखादी अफवा डोक्यातून घालवणे सोपे आहे पण जात घालणे प्रचंड अवघड आहे. ब्रिटिश सरकारने प्लेगची साथ नियंत्रणात आणण्यासाठी दवाखाने उभारले पण इथं सुद्धा ज्याने त्याने आपला जात धर्म शोधला. नवीन उभारलेल्या दवाखान्यात जात बाटायची भीती असणऱ्यानी जायला नकार दिला. युरोपियन रुग्णांवर ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची विशेष सोय होती. प्रश्न होता तो भारतीयांचा, यावर उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने त्या त्या समुदायाच्या समित्या स्थापना केल्या. सामान्य रूग्णालयात “जातीच्या समस्येचे निराकरण” करण्यासाठी, प्रत्येक समुदायातील व्यक्तींद्वारे व्यवस्थापित आणि ब्रिटिश वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र रुग्णालये स्थापन केली.

लकडी पुलजवळ उभारण्यात आलेले हिंदू प्लेग हॉस्पिटल, एका समितीद्वारे व्यवस्थापित केले जात होते आणि ते “निम्न जातीतील सदस्य वगळता सर्व हिंदूंसाठी” खुले होते. त्यामुळे ठरविक जातीच्या लोकांना याचा फायदा झाला. प्लेग केंद्रात प्रवेश घेतलेल्या व्यक्तींना देखभाल शुल्काव्यतिरिक्त १० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागत असे. अशा प्रकारे या केंद्राचा कारभार चालत असे.

८ मार्च १८९७ रोजी कार्यरत झालेले ‘महोमेदन प्लेग रुग्णालय’ पुण्यातील प्रमुख मुस्लिमांनी बांधले आणि त्याची देखभाल केली, जिथे मुस्लिमांवर मोफत उपचार केले जात असत. गंमत म्हणजे इथे रुग्णांवर पाश्चिमात्य पद्धतीने उपचार करण्याचा पर्याय असूनही रुग्ण पारंपरिक उपचार करण्याचा पर्याय निवडायचे. ऐनुद्दीन नावाचा हकीम(वैद्य) या रुग्णांवर पारंपारिक उपचार करत असे.

‘पारसी प्लेग हॉस्पिटल’ जुन्या सातारा रोडच्या बाजूला रायफल रेंजजवळ होते. पारशी समाजाने स्वखर्चाने त्याची उभारणी केली होती. तीन सामुदायिक रुग्णालयांपैकी हे रुग्णालय सर्वात सुसज्ज आणि सुविधायुक्त होते.

सर्व दवाखान्यातील सुविधा कमी अधिक प्रमाणात होत्या पण काही का होईना त्यावेळच्या प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी मदत करत होत्या. प्लेगची साथ संपली पण हा इतिहास अजूनही जिवंत आहे. आताच्या जम्बो सेंटरची संकल्पना १२० वर्षा पेक्षा जुनी आहे, एवढंच सांगण्यासाठी हा लेखप्रपंच !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.