सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

गावकऱ्यांच्या विरोधामुळे बंद झालेला नाणार प्रकल्प परत चालू होत आहे

केंद्रीय शिक्षण आणि वाणिज्य मंत्री धर्मेंद्र प्रधान लोकसत्ता दैनिकाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी नाणार ऑइल रिफायनरीच्या बाबतीत भाष्य केलं. धर्मेंद्र प्रधान म्हणाले महाविकास आघाडी सरकार नाणार प्रकल्पासाठी तयार आहे. त्यामुळे लवकरच ह्या प्रकल्पाचे काम सुरु होईल. प्रधान यांच्या विधानानंतर कोकणात पुन्हा नाणार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. २०१४ साली सुरु झालेला नाणार प्रकल्प बंद आहे. पण तो का बंद झाला, त्या मागचे कारणे का आहेत ही करणे आपण समजून घेतली पाहिजेत. म्हणजे आपल्याला हा सर्व प्रकार कळेल.

काय आहे नाणार प्रकल्प ?

नाणारचा प्रकल्प हा ऑइल रिफायनरीचा प्रकल्प आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या तीन भारतीय कंपन्यांनी सौदी अरेबियाची सौदी आरामाको नावाच्या कंपनी सोबत भागीदारी करून नाणार मध्ये रिफायनरीचा प्रकल्प आणला आहे. रत्नागिरीच्या नाणार गावात त्यासाठी जागा निवडली आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर आशिया खंडातील सर्वात मोठा ऑइल रिफायनरी प्रकल्प होईल.

ह्या प्रकल्पाचा हेतू काय होता ?

२०१४ साली नवीन आलेल्या भाजप सरकारने मागास कोकण भागाचा विकास करण्यासाठी नाणार प्रकल्प आणला होता. ह्या प्रकल्पातून कोकणात एकूण ३ लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. नाणार पूर्ण झाल्यावर कोकणातील तरुणांना १ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोकणाचा विकास झाला तर विकासाचा अवशेष पूर्ण करता येईल इत्यादी कारणांसाठी भाजप सरकारने नाणारची प्रकल्पासाठी निवड केली होती.

सध्या प्रकल्पाचे काम चालू आहे का ?

२०१४ पासून प्रकल्पाचे काम चालू होते पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकी आधी राज्यातल्या भाजप सरकारने प्रकल्पाचे काम थांबवले. शिवसेना प्रकल्प चालू ठेवावा या मताची नव्हती अश्या बातम्या आल्या होत्या. शिवसेनेला खुश करण्यासाठी आणि राजकीय तोटा होऊ नये म्हणून भाजपने नाणार प्रकल्प मार्च २०१९ ला थांबवला. तेंव्हापासून प्रकल्पाचे काम बंद आहे.

प्रकल्पाला शिवसेनेचा का विरोध आहे ?

कोकण विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकण विभागात शिवसेनेला नेहमीच मते मिळतात. त्यामुळे शिवसेना कोकणच्या मुद्यावरून नेहमीच संवेदनशील होताना दिसते. तर झालं असं, प्रकल्पासाठी एकूण २७००० हेक्टर जमीन हवी होती. मोठ्या प्रमाणात जमीन हवी असल्या कारणाने नाणारच्या आजूबाजूच्या गावची जमीन पण प्रकल्पासाठी पाहिजे होती. नाणार मधील लोक प्रकल्पासाठी राजी होते पण इतर गावांमधले लोक त्यासाठी तयार नव्हते. ह्या प्रकल्पामुळे पर्यावरणाला नुकसान होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. एकूण १७ पैकी १४ गावातल्या ग्रामपंचायतींने प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कोकणातल्या गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रकल्प बंद नाही केला तर युतीतून बाहेर पडू असा इशारा शिवसेनेने दिला होता.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची काय भूमिका आहे ?

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची नाणार बद्दल फारशी काही भूमिका नव्हती. पण वाद निर्माण झाल्यामुळॆ त्यांनी त्यांची भूमिका जनते समोर मांडली. कोकणाचा विकास करण्यासाठी असे प्रकल्प गरजेचे आहेत पण त्या सोबतच पर्यावरणाचा देखील विचार केला पाहिजे अशी दोन्ही काँग्रेसची भूमिका आहे.

भाजपाला हा प्रकल्प का हवा आहे ?

मुळातच ह्या प्रकल्पाचा निर्णय भाजप सत्तेत असताना घेतला होता. त्यामुळे भाजप नाणारचे समर्थन करत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, नाणार प्रकल्प हा आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प होणार आहे. सहा लाख टन ऑइल उत्पादन करण्याची क्षमता नाणार मध्ये आहे. हा प्रकल्प बनला तर कोकणच्या विकासाला चालना मिळेल आणि देशाला फायदा होईल. सौदी अरेबिया आणि भारतीय कंपन्यांनी भागीदारीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता हा प्रकल्प थांबणे सरकारला जमणार नाही. प्रकल्प थांबला तर केंद्रीय सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका सहन करावी लागू शकते. त्यामुळेच भाजप नाणारच्या बाजूने आहे.

राज्य सरकार प्रकल्पासाठी तयार असल्याच्या बातम्या आल्या आहेत मात्र अजून अधिकृत माहिती राज्य सरकारने दिली नाही. मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात कोकणचा दौरा केला आहे. त्यामुळे नाणारचे काम परत चालू होणार ह्या अफवा हवा धरत आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.