सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

युक्रेनच्या युद्धात पुतीन भयंकर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर करत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा जोर वाढतच जात आहे. या युद्धात आत्तापर्यंत 498 सैनिकांचा मृत्यू झाला असून 1597 सैनिक जखमी झाले आहेत.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यात दोन हजारांहून अधिक युक्रेनियन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युक्रेनमधील ‘मारियुपोल’ या शहरासह इतर शहरांमध्ये दोन्ही देशांची सैन्यदलं भयंकर युद्ध लढत आहेत. युक्रेन कडून रशियाने थर्मोबेरिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे. या अस्त्राला ‘व्हॅक्यूम बॉम्ब’ असंही संबोधलं जातं. जगभरात व्हॅक्यूम बॉम्बचा वापर वादग्रस्त मानला गेलेला आहे. सर्वसामान्य बॉम्बच्याच आकाराचा हा बॉम्ब असला तरी त्याची विध्वंसक क्षमता खूप जास्त असते.

व्हॅक्यूम बॉम्ब कसा वापरला जातो ?

व्हॅक्यूम बॉम्बला एओरोसोल बॉम्ब किंवा फ्यूएल एअर विस्फोटक असंही म्हटलं जातं. या बॉम्बमध्ये इंधनासाठीचा एक कंटेनर असतो, त्यात दोन वेगवेगळे स्फोटक चार्ज लावलेले असतात. रॉकेटमधून किंवा विमानातून इतर बॉम्बप्रमाणेच हा बॉम्ब टाकला जातो. निश्चित लक्ष्य असणाऱ्या ठिकाणावर हा बॉम्ब पडला की आधी इंधनाचा कंटनेर उघडतो आणि इंधन पसरून वातावरणात त्याचा ढग निर्माण होतो .ढग पूर्णतः बंदिस्त नसलेल्या कोणत्याही इमारतीत घुसू शकतो. त्यानंतर बॉम्बचा दुसऱ्यांदा स्फोट होतो आणि या ढगाला आग लागते, त्यातून आगीचा मोठा लोट निर्माण होतो. त्यानंतर एक मोठी स्फोटक लाट उसळते आणि आसपासचा सर्व ऑक्सिजन त्यात शोषून घेतला जातो. या बॉम्बस्फोटात सैनिक साधन सामग्रीसोबतच मजबुत बांधकाम असणाऱ्या इमारती कोसळू शकतात आणि मानवी जीवितहानीसुद्धा होऊ शकते. हे अस्त्र वेगवेगळ्या उद्देशाने वापरलं जातं, त्याचा आकारही वेगवेगळा असतो. सैनिकांकडून हाताने फेकता येईल अशा ग्रेनेडच्या रूपात किंवा खांद्यावर ठेवून रॉकेट लाँचरद्वारे डागता येईल अशा आकारात व्हॅक्यूम बॉम्ब तयार केले जातात.

व्हॅक्यूम बॉम्बच्या वापरासंबंधीचे नियम काय आहेत ?

या बॉम्बच्या वापरासंदर्भात अजूनपर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा करण्यात आलेला नाही. परंतु, एखाद्या देशाने निवासी भागांमध्ये, शाळांच्या ठिकाणी किंवा रुग्णालयांमध्ये याचा वापर केला, तर 1899 व 1907 सालच्या ‘हेग नियमावली’नुसार असं कृत्य युद्ध गुन्हा मानलं जातं आणि त्यावर केस चालवता येऊ शकते .

याआधी व्हॅक्यूम बॉम्बचा वापर कुठे झाला आहे ?

व्हॅक्यूम बॉम्बचा वापर पहिल्यांदा जर्मन सैन्याने दुसऱ्या महायुद्धावेळी केला होता. परंतु, 1960 सालापर्यंत या बॉम्बचा पूर्ण विकास झाला नव्हता. त्यानंतर अमेरिकेने व्हिएतनाममध्ये हे बॉम्ब वापरले. अफगाणिस्तानात 2001 साली तोरा बोरा डोंगरभागांमध्ये लपलेल्या अल-कायदाच्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी आणि 2017 साली इस्लामिक स्टेटच्या दलांविरोधात अमेरिकेने हे बॉम्ब वापरले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.