‘ए आर अंतुले’ यांची २ डिसेंबर ला ७ वी पुण्यतिथी आहे. २०१४ ला मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. १९८० ते १९८२ दरम्यान ‘ए आर अंतुले’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याच्या बद्दलचे हे प्रसिद्ध किस्से एकदा वाचाच.
महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री.
आणीबाणी नंतर १९७८ ला देशात लोकसभेच्या निवडणूका झाल्या. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. केंद्रात जनता दल आणि इतर काँग्रेस विरोधी पक्षाचं सरकार आलं होत. केंद्रातून काँग्रेस सत्तेबाहेर गेल्याचे परिणाम इतर राज्यांमध्ये पण दिसायला लागले होते. महाराष्ट्रात वसंत दादा पाटीलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच सरकार होतं. वसंतदादा पाटील यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या शरद पवार यांनी जनता दल आणि काँग्रेस विरोधी पक्षांना सोबत घेऊन वसंत दादांचं काँग्रेस सरकार पाडून महाराष्ट्र्रात पुलोदच सरकार आणलं. इंदिरा गांधींना महाराष्ट्रात शरद पवारांनी जबरदस्त धक्का दिला होता.
जनता दलाच्या अंतर्गत कलहामुळे ते सरकार दोनच वर्षात पडले. जनता दलाने बहुमत गमावल्याने १९८० ला लोकसभेच्या निवडणुका परत लागल्या होत्या. इंदिरा गांधींचा वाईट काळ दोनच वर्षातच संपला. इंदिरा गांधी १९८० च्या लोकसभा निवडणुकीत परत बहूमताने केंद्रात सत्तेत आल्या. इंदिरा गांधीनी सत्तेत परत आल्यावर महाराष्ट्रातील शरद पवार यांचे सरकार बरखास्त केले. शरद पवार यांचे सरकार बरखास्त केल्यामुळे काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार शोधत होती. वसंतदादा पाटील आणि इतर काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधींचा विश्वास गमावला होता. तेंव्हा ए. आर. अंतुले यांचे नाव पुढे आले. संजय गांधी यांच्या जवळचे, काँग्रेसचे निष्ठावंत आणि काँग्रेससाठी कोणालाही अंगावर घेण्याची धमक असलेले ए. आर. अंतुले सर्वांच्या पुढे होते. स्वतः संजय गांधींनी ए. आर. अंतुलेंची मुख्यमंत्री पदासाठी शिफारीश केली आणि अंतुले जून १९८० ला महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार पश्चिम महाराष्ट्राचा त्यात तो मराठा असेल तर विचार केला जायचा मात्र ए. आर. अंतुले यांनी सर्वाना मात दिली होती.
संजय गांधी निराधार योजना अंतुलेंनी सुरु केली.
संजय गांधीनी ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्री केले होते. मात्र ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर दोनच महिन्यामध्ये संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. संजय गांधी यांचे निधन झाल्यावर अंतुले यांच्या सरकारने संजय गांधी यांच्या नावे निराधार बालके, अपंग आणि महिलांसाठी योजना आणली. जे लोक महाराष्ट्रात निराधार आहेत त्यांच्या साठी महाराष्ट्रात सरकारने प्रति महिना ६० रुपये सुरु केले. नंतर संजय गांधी योजना केंद्रात आणि इतर राज्यांमध्ये सुरु झाली. अजूनही संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्रात चालू आहे. आता महिन्याला रक्कम ६०० रुपये झाली आहे.
सिमेंटचा घोटाळा
मुख्यमंत्री झाल्यावर ए आर अंतुले यांनी प्रशासनावर चांगली पकड मिळवली होती. महाराष्ट्राचा कारभार अंतुले चांगल्या प्रकारे हाकत होते. मात्र सिमेंट घोटाळ्याने अंतुलेंच्या कारकिर्दीला गालबोट लावलं. १९९१ च्या आर्थिक सुधारणा होण्याअगोदर घर बांधणाऱ्या कंत्राटदारांना सिमेंट सरकार कडून घ्यावे लागायचे. सरकार प्रत्येक कंत्राटदाराचा कोटा ठरवायचे. १९८२ ला मुख्यमंत्री अंतुलेंनी त्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला त्याच्या कोट्यापेक्षा जास्त सिमेंट दिल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. सिमेंट घोटाळ्याच्या आरोपामुळे ए आर अंतुले यांचे मुख्यमंत्री पद गेले.
मुंबई हल्ल्यानंतर अंतुलेंचे वादग्रस्त विधान
२६/११ ला मुंबई मध्ये ताज हॉटेल आणि इतर ठिकाणी दहशदवादी हल्ला झाला. हल्यात २६१ लोक मारले गेले. हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे पण दहशदवाद्यांकडून मारले गेले. ए. आर. अंतुले यांनी मात्र हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्ब केसची चौकशी करत आसल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे विधान केले. अंतुलेंच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती. नंतर संसदेत अंतुलेंनी माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचं खुलासा केला होता.
कडक स्वभावाचे, निडर ‘ए आर अंतुले’ महाराष्ट्राचे दोन वर्षच मुख्यमंत्री होते मात्र त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !