सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आपला टाईम संपला म्हणून घरी गेलेले नरसिंह राव देशाचे पंतप्रधान झाले.

how-narsing-rav-became-pm

देशाचे दहावे पंतप्रधान नरसिंह राव यांची आज २३ डिसेंबरला १३ वी पुण्यतिथी आहे. २००८ साली नरसिंह राव यांचे दिल्लीत निधन झाले. नरसिंह राव देशाचे पंतप्रधान झाले त्या वेळेला देश खूप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत होता. दहा दिवस पुरेल एवढीच विदेशी मुद्रा भारताकडे राहिली होती. अश्या संकटाच्या काळात मनमोहन सिंह यांना सोबत घेऊन नरसिंह राव यांनी देशाला संकटातून बाहेर काढले. १९९१ ला नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा केल्या. त्यामुळेच भारतात जागतिकीकरणाला सुरुवात झाली. भारताची अर्थव्यवस्था नरसिंह राव यांनी जगाच्या बाजारात उघडी केली. नरसिंह राव यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांची फळे देश आज चाखतो आहे. आर्थिक सुधारणा केल्यामुळे देश नरसिंह राव यांची आठवण काढतो. पण नरसिंह राव यांचं पंतप्रधान होणं एक अपघात होता. नरसिंह राव पंतप्रधान होतील याची त्यांना देखील कल्पना नव्हती. खूप झालं राजकारण आता आराम केला पाहिजे म्हणून हैद्राबादच्या घरी गेलेले नरसिंह राव यांना १९९१ ला देशाचे पंतप्रधान पद स्वीकारायला लागले.

आता काय आपल्याला संधी मिळणार नाही म्हणून राजकीय संन्यास

लोकसभेत बहुमत गमावल्यामुळे पंतप्रधान चन्द्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला. लोकसभा बरखास्त केली आणि १९९१ ला दोनच वर्षाच्या अंतराने लोकसभेच्या निवडणुका लागल्या. राजीव गांधी काँग्रेसचे नेतृत्व करत होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस परत सरकार मध्ये येणार असे दिसत होते. सगळे एक्सिट पोल काँग्रेसच्या बाजूने होते. त्यामुळे सरकारमध्ये कोणाला घेणार, कोणाचा पत्ता कटणार फिक्स झालं होतं. राजीव गांधी यांच्या विश्वासू लोकांना संधी मिळणार हे तर पक्के होते मात्र १९८९ ते १९९१ दरम्यान राजीव गांधी यांच्या पासून दूर झालेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नव्हती. नरसिंह राव १९८४ ते १९८९ राजीव गांधी मंत्री मंडळामध्ये मंत्री होते पण नरसिंह राव यांना संधी मिळणार नसल्याचे पक्के झाले होते. राजीव गांधी नरसिंह राव यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत असत.

राजकीय परिस्थिती आपल्या विरोधात गेली आहे आणि आता आपल्याला राष्ट्रीय राजकारणात संधी उरली नसल्याचं नरसिंह राव यांना वाटले. त्यामुळे नरसिंह राव यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. राजकारणातून त्यांनी सन्यास घेतला. १९९१ सालीचं नरसिंह राव दिल्ली सोडून हैद्राबाद मध्ये राहायला गेले.

काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीत परत येण्याची विनंती.

१९९१ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बहुमताने जिंकली मात्र नेतृत्व कोण करणार याचा पेच निर्माण झाला.२१ मे १९९१ ला राजीव गांधी यांची तामिळनाडू मध्ये हत्या करण्यात आली. काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते राजीव गांधी.गांधी परिवारामधून कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी रस्सी खेच सुरु झाली. पण एका नावावर काँग्रेसचे एकमत होत नव्हते. काँग्रेसच्या सर्वोच निवड समिती मध्ये नरसिंह राव यांचे नाव पुढे आले. नरसिंह राव बाकी सगळ्या काँग्रेस नेत्यापैकी अनुभवी होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा त्यांचा अनुभव होता. बाकी नेत्यांपेक्षा नरसिंह राव जेष्ठ पण होते. त्यामुळे नरसिंह राव यांना काँग्रेसने संपर्क केला. तुम्ही दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसचे नेतृत्व करावे असा संदेश नरसिंह राव यांना हैद्राबादला पाठवण्यात आला.
काँग्रेस मधून नेतृत्व करण्यासाठी संपर्क झाल्यावर नरसिंह राव यांनी देशाचे पंतप्रधान पद स्वीकारण्यास होकार दिला आणि १९९१ च्या २१ जूनला नरसिंह राव यांनी देशाची सूत्रे हातात घेतली. गांधी परिवारातील नसून काँग्रेसचे पंतप्रधान होण्याचा मान नरसिंह राव यांना मिळाला. १९९६ ला पंतप्रधान पदाची पाच वर्ष पूर्ण केल्यावर नरसिंह राव यांनी मात्र राजकारणातून संन्यास घेतला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.