सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार ?

मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला कलिगतुरा चांगलाच रंगताना दिसतोय. पहिल्यांदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी बारामती मध्ये जाऊन जिंकण्याचा मानस बोलवून दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळली. त्यानंतर पवारांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच गाजली, पवार बोलले, ‘नाना भाऊ पटोले हा लहान माणूसआहे ‌त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही’. या सगळ्या प्रकारणातून एक मात्र स्पष्ट झाल की महविकास आघाडी सरकार मध्ये सगळं काही आलबेल नाही आहे.

काँग्रेसच्या गोटात काय चाललंय !

२०१९ च्या विधानसभेत भाजपाला कौल मिळून देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन करण्यात शरद पवारांनी महत्वाची भुमिका निभावली. त्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली. राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, सोबत महत्वाचे खाते पण अर्थ, जलसंपदा, सहकार, ग्रामविकास इत्यादी खाते राष्ट्रवादी पक्षाने स्वताकडे ठेवून घेतली आहेत. ह्या सगळ्या वाटपात काँग्रेसला मात्र फार काही मिळालं नाही. एक विधानसभेचा अध्यक्ष जे नाना पटोले स्वतः होते आणि बाळासाहेब थोरात यांना मिळालेले खाते सोडता काही विशेष काँग्रेसला मिळालं नाही. काँग्रेस नक्कीच या सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे पण या तिघांमध्ये आमदारांचा मोठा फरक नाही आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी ५४ आणि ५६ आमदार आहेत तर काँग्रेसचे ४४ आमदार विधानसभेत आहेत. काँग्रेसच्या गोटात सुरुवातीपासूनच अन्यायाची भावना आहे. त्याला वेगवेगळ्या मार्गाने वाट मिळायची कधी विजय वड्डेटीवार बोलून दाखवतात तर कधी नितीन राऊत. पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वतः पुढाकार घेताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीची भूमिका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच म्हणजे असं आहे ‘तुझ माझं जुळेना आणि तुझ्या वाचून करमेना “.त्या दोघांमध्ये हे असं नात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहे. १९९८ ला पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली आणि वेगळे लढले मात्र नंतर परत काँग्रेस सोबत आघाडी सरकार बनवले. तेंव्हापासून ह्या दोन पक्षांमध्ये हे असे वाद चालू आहेत. मधले पाच वर्ष भाजपा सरकार होते म्हणून हे शितयुद्ध थांबलं होतं. आता परत काँग्रेस सत्तेत आली आणि ही भांडण परत सुरू झाली. अगोदर या भांडणात विलासराव देशमुख काँग्रेसचे नेते असायचे आता मात्र ती जागा नाना पटोले यांनी घेतली आहे. सरकार मध्ये असुन नाना पटोले आघाडीतल्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. ते बहुतेक वेळा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट करताना दिसतात. साहाजिकच राष्ट्रवादी मध्ये नाना भाऊ पटोले यांच्या बद्दल चांगलाच राग आहे. पण राष्ट्रवादी पक्ष हा पवारांच्या आदेशाला अंतिम मानतो व पवार हे सरकार टिकविण्याच्या बाजुने आहेत. पवार ही नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट जाणवत आहे.

शिवसेनेची भुमिका काय आहे ?

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये खुद्द मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत. त्यातच उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहे तरीही महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेनेचे प्रभुत्व फार जाणवत नाही‌. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सोडता शिवसेना मंत्री मंत्रिमंडळात जाणवत नाही. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मध्ये फार काही तानातानी असल्याचे ही जाणवत नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे पक्षाची भुमिका मांडत असतात. राऊत हे नेहमी उघड उघड भुमिका घेतात. मधल्या काळात त्यांनी काँग्रेस अध्यक्षांवर टिप्पणी केली तेंव्हा त्यांना काँग्रेसचा मोठा विरोध सहन करावा लागला होता‌. त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसवर टिका केल्याचं आठवतं नाही.

नाना पटोले सरकार पाडणार का ?

नाना पटोले म्हणजे एकदम धडाकेबाज राजकारणी आहेत. त्यांनी राजकारणाची सुरूवात काँग्रेसमध्ये केली होती पण नंतर ते भाजपा मध्ये गेले. २०१४ मध्ये भाजपाच्या टिकीटावर त्यांनी लोकसभेला राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा गोंदिया मतदार संघात पराभव केला. नाना पटोले यांचा स्वभाव हा अन्याय सहन न करणारा आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर त्यांची आणि पंतप्रधान मोदी यांच्या मध्ये मतभिन्नता आली आणि नानांनी भाजपा सोडली ‌आणि काँग्रेस मध्ये परत आले. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना हा माणूस मोदीला सोडून काँग्रेसची वाट धरतो. २०१९ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मध्ये लोकसभा लढवतो. कोणाला ही न भिणारा, थेट नडणारा माणूस काँग्रेसचा अध्यक्ष आहे. नाना पटोले कधी कुठला निर्णय घेतील सांगणं कठीण आहे. त्यांच्या भाषणातून जाणवतं की नाना “एकला चलो रे” ची तयारी करत आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मानस स्पष्ट होत चालला आहे. राष्ट्रवादीवर टिका करताना अगदीच टोकाची भूमिका घेतात, शिवसेनेच्या संजय राऊत यांना शिंगावर घेतायेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांना ते सारखी जाणीव करुन देत आहेत की “सरकार काँग्रेसमुळे आहे सरकार मुळे काँग्रेस नाही”. या सगळ्या प्रयत्नांमधून नाना पटोले शिवसेना व राष्ट्रवादीला उचकावण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित नाना हे सरकार पाडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा हे नानांच स्वप्न नक्कीचअसणार. तेव्हा नाना काय भुमिका घेतात, हे सरकार पाडणार का ? स्वबळावर सरकार आणतात का? काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.

-विष्णू बदाले
(लेखक सामाजिक आणि राजकीय अभ्यासक आहेत)

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.