सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

शरद पवार राष्ट्रपती होणार ?

महाराष्ट्र असो नाहीतर भारत असो, जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा शरद पवार चर्चेत नाहीत, असं कधी होतच नाही. कधी संजय राऊत बोलले तर राजकीय विश्लेषक म्हणतात पवार साहेबांनी बोलायला सांगितले असेल तर कधी भाजपा वाले पवार यांच्यावर बोलले तर हे पण पवारांच्या सांगण्यावरून केलं असणार अश्याच वावड्या उठत असतात. पवार नावाचं अजब रसायन महाराष्ट्र आणि देश मागच्या पाच दशकांपासून अनुभवतो आहे. त्याला कारणं ही तशीच आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांना आपला गुरु म्हणून जाहीर मान्यता देताता. विरोधी पक्षाचे पण लोक पवारांच्या राजकारणाचे जरी विरोध करत असले तरी ते स्वतः पवारांच्या विरोधात आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही. असे हे विविध अंगी प्रसिद्ध असलेले शरद पवार आता पुन्हा नव्याने चर्चेत आहेत. पवार राष्ट्रपती होणार म्हणून दिल्ली पासून गल्ली पर्यंत चर्चा होत आहे. आता ही चर्चा आपसुक होत आहे की पवारच करवत आहेत हे स्वतः पवारच सांगू शकतील.

शरद पवारांचा इतिहास

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नजरेनं शोधलेला हिरा म्हणजे शरद पवार होय. यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्त्व हे राजकारणात हिमालयाच्या उंचीच होत. जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब भारत चीन युद्धानंतर दिल्लीच्या राजकारणात गेले तेव्हा वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांनी सह्याद्री हिमायलाच्या संरक्षणासाठी गेल्याच विश्लेषण केलं होतं. अश्या या हिमालयीन उंचीच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने यशवंतराव चव्हाण साहेबांनी शोधलेला हा सह्याद्रीचा वारसदार शरद पवार पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या जनतेवर राज्य करतो आहे. शरद पवार यांच्या घरी शेतकारी कामगार पक्षाच वातावरण होतं, शेतकरी कामगार पक्षाला मानणारे घरचे सदस्य होते. स्वतः त्यांच्या आई शारदा बाई पवार ह्या शेतकरी कामगार पक्षांकडून लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. घरी शेतकरी कामगार पक्षाचे वातावरण असून देखील पवार यांनी स्वतःसाठी वेगळा मार्ग अवलंबला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या विचारांच्या काँग्रेस पक्षात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली.

अंगी असलेली नेतृत्व शैली, निडरपणा आणि प्रचंड राजकीय समज शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांच्या जवळ घेऊन गेली. नंतर शरद पवार यशवंतराव चव्हाण साहेबांचे लाडके शिष्यच झाले व खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकिय, संसदीय जीवनाची सुरुवात झाली ती आजतागायत चालू आहे. १९६७ ला आमदार झालेले शरद पवार दहाच वर्षामध्ये आपलेच पुलोद सरकार जे वेगवेगळ्या विचारांचे होते पाडून देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. दोन वर्षा नंतर ते सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यावर शरद पवार समाजवादी काँग्रेस हा स्वतःचा स्वंतत्र पक्ष सुरू करतात. १९८६ नंतर परत आपला पक्ष काँग्रेस मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली विलीन करतात आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. राजीव गांधींच्या मुत्यूनंतर पवार पंतप्रधान पदासाठी दावेदार होतात पण त्यांना पंतप्रधान पद मिळवणं शक्य झालं नाही. पी व्ही नरसिंह राव यांनी पवारांना बाजूला ठेवत स्वतः पंतप्रधान झाले. शरद पवार मग तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवार नेहमीच पंतप्रधान पदासाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतू १९९८ ला जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता काँग्रेस मध्ये काही होणार नाही तेंव्हा परत एकदा स्वतःचा नवीन राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काढला. राष्ट्रवादी हा देशातला एकमेव पक्ष होता जो स्थापनेपासुनच सत्तेत होता, तेही सलग १५ वर्षे. पवार पुढे केंद्रीय कृषिमंत्री झाले. २०१९ च्या आधीपासून जेव्हा राजकीय विश्लेषक पवारांच राजकारण आता संपल आहे अश्या वावड्या उठवायचे, पवार आता परत सत्तेत येणार नाहीत, असंच समजत होते तेव्हा पवारांनी फिनिक्स पक्षासारखं आपल राजकीय पटलावर स्थान प्रस्थापित केलं. भाजपा देशभर काँग्रेस आणि बाकी पक्षाचे सरकार पाडत होते. अमित शहा चाणक्य म्हणून देशभर प्रचलित होत होते. त्यावेळेस त्या सगळ्यांना भाजपा, नरेंद्र मोदी, आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात चेकमेट करून शरद पवारांनी महाराष्ट्रात महा्विकास आघाडीच सरकार स्थापन करून दाखवलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री करून काँग्रेसलाही सत्तेत आणलं. असे हे शरद पवार जे राष्ट्रपती होण्यासाठी प्रयत्न करत असतील तर राष्ट्रपती होणार नाहीत हे ज्याला राजकारण समजत नाही तोच म्हणू शकेल.

शरद पवार राष्ट्रपती पद स्वीकारतील का ?

शरद पवार हे अर्धवेळ राजकारणी नाहीत, त्यांनी आपलं पूर्ण आयुष्यभर राजकारण केलं आहे. तेव्हा साहजिकच ते राष्ट्रपती होतील का यापेक्षा त्यांना खरं स्वतः साठी राष्ट्रपती होण न्यायिक वाटेल का हा प्रश्न उरतो. पण सगळ्यांची उत्तरे फक्त शरद पवारांकडेच आहेत बाकी कोणीही अंदाज नाही काढू शकत. राज्यपाल हे जसं राजकारण संपल्यावर राजकारण्यांच्या पेन्शन सारखं वापरतात, जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्ती घरी पण बसवायचे नसते व राजकारणात ही ठेवायचं नसते, तश्या राजकारण्यांना राज्यपाल केलं जातं. राजभवनामध्ये त्यांची सोय केली जाते. राजकीय अधिकार मात्र शुन्यच असतात. तसच काही राष्ट्रपती यांचं पण आहे. ते देशाचे प्रथम नागरिक असतात. देशाचे पंतप्रधान व सरकार निर्णय घेतात पण सगळं अगोदरच ठरलेलं असतं, फक्त राष्ट्रपती यांच्या हातून केलं जातं तेवढंच काय तो आनंद. राष्ट्रपती हे नामदारच असतात. कारण सगळे अधिकार हे पंतप्रधान यांच्याकडेच असतात. तेव्हा सर्व राजकारण जेव्हा संपत, आता आपण पंतप्रधान होवू शकणार नाहीत तेव्हा राजकारणी राष्ट्रपती या पदासाठी विचार करतात. जसे २०१२ ला प्रणव मुखर्जी यांच्या लक्षात आलं की आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीतुन बाहेर पडलो आहोत तेव्हा त्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली होती आणि नंतर राष्ट्रपती झाले देखील. पण शरद पवार हे काही प्रणव मुखर्जी नाही आहेत. आता जरी त्यांचं वय झालं असल्याचे वाटत असल़ तरी ते प्रचंड काम करतात, तरूणांना लाजवेल अशी त्यांची उर्जा असते, शरद पवारांचा पिंड हा राजकारण आहे तेव्हा शरद पवार राष्ट्रपती पदासाठी स्वतःच नाव पुढे करतील अशी शक्यता वाटत नाही. राष्ट्रपती होऊन शरद पवार आपल्या राजकीय आयुष्यला पुर्णविराम देतील असं अजिबात वाटत नाही‌‌.

दिल्लीमध्ये त्यांनी प्रसिद्ध राजकीय रचनाकार प्रशांत किशोर यांच्या सोबत बैठक केली व त्याच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या सोबत बैठक केली तेव्हा पासून शरद पवार हे राष्ट्रपती होणार अश्या बातम्या येत आहेत. प्रशांत किशोर यांच्या मार्फत पवार विरोधकांची मोट बांधत आहेत अश्या चर्चा आहेत. खर काय आहे येणार काळ सांगेलच. शरद पवारांच्या मनाचा अंदाज आजपर्यंत कोणाला लावता आला नाही. एकदा नितिन गडकरी म्हणाले होते, “शरद पवार जर दिल्लीला जातो म्हटले तर त्याच विमान उठेपर्यंत सांगता येणार नाही कारण ते दिल्लीला सांगून कोलकत्यात भेटू शकतात”. त्यामुळे आज शरद पवार म्हणत असतील त्यांना राष्ट्रपती होण्यात रस नाही. तेव्हा नाही मध्ये एक राजकीय संदेश असण्याची शक्यता नाकारता येत‌ नाही. पवार पंतप्रधान झाले नाहीत हे सर्व मराठी माणसाचं दुःख आहे. ते पंतप्रधान झाले असते तर मराठी माणसाचा उर भरून आला असता. पण जर शरद पवार राष्ट्रपती झाले तेव्हा पण महाराष्ट्र आनंदी होणार आहे. दिल्रीच्या तख्तावर जेव्हा मराठी माणुस बसतो ,”तेव्हा दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” ह्या वाक्याला एक वजन प्राप्त होईल. शरद पवार पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हावेत ही समस्त महाराष्ट्राची इच्छा. पवारांनी दिल्लीचे तख्त राखावे ही आशा आहे.

-विष्णू बदाले
(लेखक सामाजिक राजकीय अभ्यासक आहेत)

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.