सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मोदींचे खरे विरोधक कोण ?

२००१ ला नरेंद्र मोदींचा राजकीय जीवनात प्रवेश झाला. मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मानून काम पाहायचे. मुख्यमंत्री झाल्यावर एका वर्षातच मोदी यांच्या गुजरात मध्ये २००२ च्या महा दुःखद दंगली झाल्या. गोध्रा आणि इतर दंगली मध्ये हजारो लोक मारले गेले. एकवर्ष अगोदरच मुख्यमंत्री झालेल्या मोदींना ह्या दंगलीसाठी जबाबदार ठरवण्यात आलं. गुजरात सरकारच्या यंत्रणांनी निष्पक्ष काम केलं नसल्याचा आरोप झाला. तेंव्हा पासूनच नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेचे विषय राहिले आहेत. २००२ च्या दंगली नंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःची प्रतिमा बदलली आणि नंतरच्या काळात त्यांनी देशाला गुजरात मॉडेल दिले. गुजरात मॉडेलच्या प्रचार आणि प्रसिद्धीच्या बळावर नरेंद्र मोदी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतांनी पंतप्रधान झाले.

२०१४ नंतर मोदी आणि त्यांचे राजकीय विरोधक.

२०१४ नंतर सुरवातीचे दोन-तीन वर्ष मोदी यांना भारतीय राष्ट्रीय राजकारणात विरोधक उरलेच नव्हते असं वाटत होतं. काँग्रेस पूर्णपणे कोलमडून गेली होती. सतत दहा वर्ष सत्तेत असलेली काँग्रेस लोकसभेत फक्त ४४ खासदार निवडून आणू शकली होती. काँग्रेस लोकसभेत विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी सुद्धा पात्र नव्हती. लोकसभेत विरोधी पक्ष नेता निवडीसाठी विरोधी पक्षा कडे कमीत कमी ५५ खासदार असायला हवेत. काँग्रेसची झालेली केविलवाणी अवस्था आणि प्रादेशिक पक्ष पण मोदींच्या विरोधात उभे राहण्यासाठी सक्षम नव्हते, तेवढी त्यांची ताकद नव्हती. कसलाही राजकीय विरोध नसल्यामुळेच नरेंद्र मोदी २०१६ चा नोटबंदी सारखा निर्णय घेऊ शकले.

२०१९ नंतर मोदी ?

२०१४ पेक्षा मोठ्या मताधिक्यांनी नरेंद्र मोदी २०१९ मध्ये परत सत्तेत आले. पाच वर्षा मध्ये घेतलेल्या सर्व निर्णयांना भारतीय मतदारांनी पसंतीचं दिली होती. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पण काँग्रेस फार चांगले प्रदर्शन करू शकली नाही. बाकीचे प्रादेशिक पक्ष पण त्यांच्या राज्यापुरतेच मर्यादित झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष हरला असला तरी नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत, कच्चे दुवे विरोधी पक्षाला आताशी लक्षात आले आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या बेधडक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २०१९ च्या ऑगस्ट मध्ये त्यांनी काश्मीरचे विशेष अधिकार असलेले कलम ३७० काढून घेतले. त्या वेळेस विरोधी पक्ष मोदी विरोधात काही करू शकला नाही कारण तो पर्यंत मोदी यांना जनतेचा पाठिंबा होता. मात्र CAA -NRC च्या निर्णयापासून मात्र नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. त्या नंतर शेती संबंधी तीन विधेयकांना लोकांमधून भरपूर विरोध होत आहे. नऊ महिने झाले शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. वेळोवेळी झालेल्या सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यातल्या वाटाघाटी आंदोलनाचे समाधान काढू शकल्या नाहीत. शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पश्चिम बंगालच्या विधान सभेच्या निवडणुकीत बसला आहे. पहिल्या कार्यकाळात फार विरोधाचा सामना न करावा लागणाऱ्या मोदी यांचा अजिंक्यपणा हळूहळू कमी झाला आहे.

समर्थकच खरे विरोधक आहेत ?

मोदींनी लोकांच्या मनात रुजवलेली स्वछ प्रतिमा आणि कामाच्या धडाडीमुळे फारसा विरोध होत नव्हता. राजकीय विरोध मोदी सहज मोडून काढतात, पण मोदींचे समर्थकच त्यांचे विरोधक बनून पुढे येत आहेत. CAA -NRC च्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोदी समर्थक हिंसक पद्धतीने सामोरे आले. आंदोलन करणाऱ्या लोकांची गद्दार अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर शेतकरी आंदोलन करणाऱ्या पंजाब मधल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न मोदी समर्थक करताना दिसतात. मोदी यांच्या प्रेमात असलेले त्यांचे समर्थक मोदी याना झालेले विरोध सहन करू शकत नाहीत. लोकशाही मध्ये सत्ता धारीपक्षाला विरोधाची अपेक्षा असायला हवी, पण तो संयम मोदी समर्थकांमध्ये दिसत नाही. आपल्याच देशातल्या नागरिकांना देशद्रोही ठरवणं हे विषय सामान्य लोकांना आवडत नाही. आंदोलन करणाऱ्या लोकांच्या विरोधात वापरली जाणारी भाषा ही सामान्य लोकांना रुचणारी नाही आहे. मोदी समर्थक हे संयम नसलेले कार्यकर्ते आहेत. जनतेची सहानभूती त्यांच्या विरोधात जात आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. राजकीय पक्षांसोबत मोदी यांच्या भूमिका न पटणारे लोक मोदींना विरोध कायम करणार आहेतच, परंतू मोदी यांच्या समर्थकांचे अहंकारी वागणे, सामान्य लोकांना देशद्रोही ठरवणाऱ्या त्यांच्या भूमिका या सर्व प्रकारामुळे मोदींची प्रतिमा नकारात्मक बनत आहे. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे. विरोध सहन करण्याची भूमिका त्यांनी अवलंबली पाहिजे. मोदी समर्थकांनी मोदी याना सत्तेत आणलं, त्यांचा प्रचार केला परंतु आता त्याच समर्थकांनी त्यांची भूमिका बदलली नाही तर मोदी समर्थकच त्यांचे मोठे आणि खरे विरोधक सिद्ध होतील.

-विष्णू बदाले

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.