सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

फक्त अल्लु अर्जुनच नाही तर तत्वांसाठी जाहिरात नाकारणारे साऊथला बरेच आहेत

south-celebrities-who-rejected-big-brand-endorsements-worth-crores

एखाद्या मुलाखतीत लय सामाजिक रान हाणायचं अन पैसे थोडे वाढून भेटले कि दारू असू दे नाहीतर गुटखा लगेच जाहिरातीत झळकायचं, यात बॉलीवूड नेहमीच आघाडीवर असतं. काही महान देशभक्त चित्र पट अभिनेते सामाजिक असल्याच्या तोऱ्यात बसता उठता ज्ञान पाजळत असतात. पैशापुढे भूत नाचतंय असं म्हणतात मग ही तर साधी माणसं आहेत. बॉलीवूड अभिनेते इतके आत्मकेंद्री आहेत कि एखादी जाहिरात केल्याने समाजावर काय परिणाम होईल याची त्यांना अजिबात काळजी नाही. काही अपवाद वगळले तर सगळेच पान मसाला, गुटखा, दारू याची जाहिरात करत असतात. साऊथचे काही अभिनेते मात्र अतिशय जबाबदारीने जाहिराती संबंधी निर्णय घेतात. अक्षय कुमार ने पान मसाल्याची जाहिरात केली तेव्हा थोडं खोलात जाऊन बघितलं कि अजून कोणी अशा जाहिराती केल्यात का? अशा जाहिराती करणारे खूप सापडले पण नाकारणारे खूप कमी होते. त्यात पण जाहिराती नाकारणाऱ्या अभिनेत्यांमध्ये साऊथचे अभिनेते आघाडीवर होते. कोणत्या कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीने जाहिराती नाकारल्या आणि का नाकारल्या ते बघू.

झुकेगा नही साला म्हणत पुष्पा स्टार अल्लू अर्जुन इथं पण झुकला नाही. तंबाखू उत्पादक कंपनीने तंबाखूच्या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला विचारले होते. अल्लू अर्जुनने स्पष्ट शब्दात नकार दिला. पैसे वाढवून मिळावे म्हणून नकार दिलाय असा कंपनीचा समज झाला म्हणून त्यांनी रक्कम वाढवून देण्याचा प्रस्ताव अल्लू अर्जुन समोर ठेवला. तरीही अल्लू अर्जुनने स्पष्ट नकार कंपनीला कळवला. ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्यामुळे कदाचित काही जणांना माहित असेल. पण अजूनही दक्षिणेतील खूप असे कलाकार आहेत ज्यांनी चांगले पैसे मिळत असूनही जाहिरात नाकारली होती.

फेअर अँड लव्हलीची दोन कोटीची जाहिरात नाकारणारी साई पल्लवी

मल्याळम अभिनेत्री साई पल्लवी ही उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आईच पण त्याचबरोबर तिची सामाजिक प्रगल्भता वेळोवेळी तिच्या चाहत्यांना जाणवली आहे. फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीत बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्रींनी काम केलंय. मल्याळम अभिनेत्री साई पल्लवीने मात्र फेअर अँड लव्हली सारख्या मोठ्या ब्रॅण्डची सहज जाहिरात नाकारली तेव्हा मोठा चर्चेचा विषय झाला होता. सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्या कंपन्या गोरं झालं म्हणजे आयुष्याचे सगळे प्रश्न मिटले या पद्धतीने जाहिरात करतात. यांच्यामुळे कित्येक मुलं मुली गोरे दिसण्याच्या नादात नको नको ते उपाय करतात. मुलींना तर रंग गोरा नाही म्हणून न्यूनगंड येतो. साई पल्लवींने म्हणूनच फेअर अँड लव्हलीची दोन कोटींची जाहिरात नाकारली. तिचं म्हणणं होतं कि आफ्रिकेत सगळ्यांचा रंग काळा आहे म्हणजे ते सुंदर नाहीत असं नाही. सौंदर्य म्हणजे गोरा रंग हे चुकीचे आहे. साई पल्लवीची ही भूमिका खूप रास्त होती. सेलिब्रिटी जाहिरात करताना सामाजिक भान जपू लागली तर सामान्य माणसं सौंदर्याच्या मागे लागून स्वतःची फरपट करून घेणार नाहीत.

लोकप्रिय ज्येष्ठ तेलुगु अभिनेता नंदामुरी बालकृष्ण हा अशा काही तेलगू अभिनेत्यांपैकी एक आहे जो कधीही कोणत्याही टीव्ही किंवा प्रिंट जाहिरातीत दिसला नाही. नंदामुरी यांनी सोशल मीडियावर कधीही कोणत्याही ब्रँडची जाहिरात केलेली नाही. त्याला याबद्दल कारण विचारलं तर तो म्हणतो माझ्या वडिलांनी हे तत्व आम्हाला शिकवलंय. आमचं काम आहे चित्रपटातून लोकांना मनोरंजन देणे आहे. जाहिराती केल्याने आमच्या फॅनबेसवर त्याचा परिणाम होतो. आमचे चाहते मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे बघत असतात. आपल्या नावाचा उपयोग करून ब्रॅण्डच्या जाहिराती स्वीकारून पैसे कमावणे आम्हाला आवडत नाही, असं नंदामुरी म्हणतो.

तेलुगू आणि तामिळ मधील अनेक अभिनेत्यांनी थेट न पटणाऱ्या जाहिरातींना विरोध केला आहे. बाहुबली फेम अनुष्का शेट्टी, मोहन बाबू, नंदामुरी कल्याण राम, गौतमी, हिम विष्णू, मंचू मनोज कुमार, अल्लारी नरेश, साई धरम तेज आणि अशा अनेक अभिनेत्यांनी जाहिराती नाकारल्या आहेत.

दक्षिणेला अभिनेते आणि नेते एकच असतात. दक्षिणेची चित्रपट संस्कृती हा एक वेगळा विषय आहे. दक्षिणेकडे हिरो सामाजिक प्रतिमेला तडा जातील अशा गोष्टींपासून चार हात लांब असतात. त्याला अनेक कारणे आहेत. असं नाही कि बॉलीवूड मध्ये हिरो प्रतिमा संवर्धन करत नाहीत. एका शालेय कार्यक्रमात एका लहान मुलीने अमिताभ बच्चनला प्रश्न विचारला कि आमच्या शाळेत शिक्षक तर सांगतात कि शीत पेय पिणे हे विष पिल्यासारखं आहे मग तुम्ही शीत पेयांची जाहिरात का करता. प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभला लाजल्यासारखं झालं. यानंतर अमिताभने शीत पेयांची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेते कुठलेही असो त्यांना प्रश्न करणारे चाहते मिळाले तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.