जानेवारी 14, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतून मायावती गायब झाल्या आहेत का ?

mayawati

लोकसंख्येने देशात सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काही दिवसात विधानसभेची निवडणूक होत आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी विजय रथ नावाने राज्यभर यात्रा काढली आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी राज्यामध्ये सभा घेत आहेत. महिलांना ४० टक्के उमेदवारी आणि विद्यार्थिनींना स्मार्टफोन तसेच स्कुटी देण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

भाजप देखील निवडणुकीच्या प्रचारात मागे नाही. गेल्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा वेळा उत्तर प्रदेशात येऊन गेले आहेत. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. मात्र बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती निवडणुकीच्या प्रचारातून गायब दिसत आहेत. बहुजन पक्षाने निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली नाही.

मायावती कुठे आहेत ?

२०१७ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन पक्ष १९ जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकावर होता. चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती २०२१ च्या निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाहीत त्यामुळे सर्व जन आश्चर्य व्यक्त करत आहेत. बहुजन पक्षाचे विद्यमान आमदार दुसऱ्या पक्षांमध्ये जात आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर करडी नजर असलेल्या तज्ज्ञांच्या मते मायावती यांची या निवडणुकीतील निष्क्रियता त्यांच्यावर सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळं असू शकते.
“त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असलेल्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी प्रकरणामुळं त्या दबावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळंच त्यांनी विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला गरज वाटली तर भाजपला मदत करेल” असं वक्तव्य ही केलं होतं.

जातीचा फॅक्टर

बहुजन पक्ष आणि मायावतींना दलित मतदारांनी नेहमीच साथ दिली आहे. पण सध्या तसे होताना दिसत नाही. राम मंदिर आंदोलनापासूनच भाजप आणि संघाने दलित मतदार त्यांच्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपाला दलित मतदारांनी चांगली साथ दिली होती. दलित मतदार भाजपाकडे वळल्यामुळे मायावती निवडणुकीत मागे पडत असल्याचं जाणवत आहे. दलित मतदार बहुजन पक्षापासून दूर झाला आहे आणि मायावती दुसऱ्या जातीतील लोकांना पक्षाकडे मोठ्या प्रमाणात घेऊ शकल्या नाहीत. मायावती यांच्या निवडणुकीत जिंकण्याच्या आशा कमी झाल्या असाव्यात. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यावरच मायावतीं प्रचाराला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा आहेत.

दिग्गज नेत्यांनी सोडली मायावतींची साथ

निडणुकीच्या प्रचारातून मायावती गायब असल्यामुळे बहुजन पक्षाचे दिग्गज नेते इंद्रजित सरोज, लालजी वर्मा आणि सुखदेव राजभर यांनी पक्ष सोडला आहे. सुखदेव राजभर बसपाचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. सुखदेव यांनी त्यांच्या मुलाला अखिलेश यादव यांच्या पक्षात पाठवलं होतं. तर नुकतेच हरीशंकर तिवारी यांनीही त्यांची मुलं आणि भाचे यांना सपाच्या सायकलवर स्वार केलं आहे. यामुळं पूर्वांचलच्या राजकारणात आता ओबीसी आणि ब्राह्मण हे दोन चेहरे पक्षातून गेल्यामुळे मायावतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मायावतींचं प्रचारातून गायब असणं कोणाच्या फायद्याचं?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यादव दोघे युती करून भाजपच्या विरोधात लढले होते मात्र तरीही अखिलेश आणि बहुजन पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाले नव्हते . लोकसभेच्या निवडणुकीत युतीचा प्रयोग फसल्यामुळे अखिलेश यादव यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन पक्षासोबत युती करण्यास असमर्थता दाखवली आहे.
मायावती यांच्या बहुजन पक्षाला मतदान करणारा बहुतांश मतदार दलित आणि महिला आहे. दलित मतदार भाजपकडे गेल्यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मायावतींच्या गायब असण्याचा तोटाच होणार आहे कारण जे दलित मतदान बहुजन पक्षाला झाले असते ते भाजपकडे जाईल आणि भाजप राज्यामध्ये आणखी मजबूत होईल.

बहुजन समाज पक्षाला मतदान करणाऱ्या महिला, प्रियांका गांधी सक्रिय आसल्यामुळे काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. प्रियांका यांनी महिलांसाठी उत्तर प्रदेशमध्ये “लडकी हू लड सकती हू” सारख्या घोषणा केल्या आहेत.

मायावतींच्या कामाच्या पद्धतीचा विचार करता त्या नेहमीच निवडणुकीच्या तोंडावरच सभांना सुरुवात करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांना गोळा करतात. बूथ पातळीवर तयारी करतात आणि कोणत्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे ते ठरवतात. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये पण मायावती असेच करतात कि नवीन नीती अवलंबतात बघणे महत्वाचे ठरणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.