सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

घरच्यांनी धर्मगुरू होण्यासाठी पाठवला, पोरगा झाला केंद्रीय संरक्षणमंत्री (Former defence minister George Fernandes)

स्वातंत्र्य पूर्व भारतातील मंगलोर इथून या माणसाचा प्रवास सुरु होतो. हे मंगलोर आता कर्नाटकात राज्यात आहे. ३ जून १९३० रोजी जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचा जन्म झाला. कौटुंबिक पार्श्वभूमी जास्तच धार्मिक असल्याने घरच्या लोकांना हा मुलगा पुढे जाऊन धर्मगुरू बनावं वाटत होतं. पण जॉर्जच्या आयुष्यात नियतीने वेगळंच काही तरी ठरवलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी जॉर्ज यांना चर्चमध्ये धर्मगुरू (प्रिस्ट) बनवण्यासाठी पाठवलं. जॉर्ज फर्नांडिस यांचं मन तिथे काही रमलं नाही. जॉर्ज तिथून पळाले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मंगलोर इथून कामगार संघटना बांधणी सुरु केली. ही त्यांची सुरवात होती सामाजिक आणि राजकीय एका नव्या पर्वाची.

१९४९ साली जॉर्ज कामासाठी मुंबईमध्ये आले. त्याचे मुंबई मधील दिवस अतिशय खडतर गेले. फूटपाथवर झोपायला सुद्धा मुंबईमध्ये जागा मिळवणे अवघड आहे. जॉर्ज साठी हे सगळं भयानक होतं. दरम्यान जॉर्ज यांच्या जीवनात राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण असे लोक आले. कामगार नेते डिमेलो यांच्या सानिध्यात राहिल्याने पुढील दिशा स्पष्ट होत गेली. कामगार नेत्यापसून सुरु झालेला प्रवास अनेक टप्पे ओलांडून पुढे चालूच राहिला.

कामगार नेते म्हणून जॉर्ज यांना मान्यता मिळाली. मुंबई मध्ये त्यांची प्रसिद्धी अफाट वाढली.

१९६७ ला त्यांनी काँग्रेसचे मात्तबर उमेदवार स. का. पाटील यांना पराभूत केले

१९७१ ला मात्र ते हरले. जॉर्ज फर्नांडिस यांचं आयुष्य इथून पुढे तर अधिक रोमांचकारी आहे. १९७५ ला आणीबाणी लागल्यानंतर जॉर्जने आणीबाणीला कडाडून विरोध सुरु केला. आणीबाणी च्या काळात लाखो कार्यकर्त्यांना जेल मध्ये जावं लागलं. मिसा(मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) सारखा गंभीर कायदा अमलात आणला गेला. चौकशीशिवाय अटक केले जाऊ लागले. या परिस्थितीत भूमिगत राहून आणीबाणीला विरोध करायचं जॉर्ज फर्नांडिस यांनी ठरवलं. विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी देशाला हादरवेल असं गंभीर पाऊल उचललं.

सुरुंगचा वापर करून स्फोट घडवून आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सुरुंगाचा स्फोट घडविण्यापाठीमागे हिंसा किंवा कोणाला मारण्याचा त्यांचा हेतू नव्हता. सरकारला जाग आणणे हा उद्देश हा होता. जीवित हानी होणार नाही अशी ताकीद त्यांनी इतर कार्यकर्त्यांना दिली होती. बडोदा येथील एका खाणीत सुरुंग मिळण्याची शक्यता असल्याची माहिती जॉर्ज यांना मिळाली. हे सुरुंग कसे काम करतात यासाठी त्यांनी स्वतः बडोदा खाणीत जाऊन पाहणी केली. यातून त्यांना सुरुंगाच्या परिणामाची तीव्रता लक्षात आली. याच खाणीतून सुरुंगाच्या मोठ्या कांड्या मिळवण्यात आल्या. सुरुंग पेटवण्यासाठी डिटोनेटर्स आणि फ्युज वायर्स वासुदेव अँड कंपनी कडून मिळवण्यात आले. सुरुंगाची सोय झाल्यानंतर गुप्तपणे हे मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार आणि देशाच्या इतर भागात पाठवण्यात आले. साधारण पन्नास एक ठिकाणी ठिकाणी वर्षभरात त्यांनी स्फोट घडवून आणले. यांनतर जॉर्ज आणि त्यांच्या साथीदारांची धरपकड सुरु झाली. त्यांच्या अनेक सहकार्यांना पकडण्यात आले. कोणीतरी बातमी दिल्याने जॉर्जला कोलकात्याला पकडण्यात आले. जॉर्ज विरुद्ध तीन हजार पानांचे आरोपपत्र मांडले गेले.

जेलमधून निवडणूक.

१९७७ ला इंदिरा गांधी यांनी निवडणूक जाहीर केली. जय प्रकाश नारायण यांनी जॉर्जला निवडणुकीला उभे राहायला सांगितले. जेलमधूनच जॉर्ज यांनी निवडणूक लढवली. या निडणुकीत जार्ज यांचा हातकडी असलेला फोटो प्रचारात वापरला गेला. “ही हातकडी तुम्ही तोडू शकता” असे म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केले. जॉर्ज ही निवडणूक जिंकले. जनता पक्षाच्या या सरकारमध्ये ते उद्योग मंत्री झाले.

एकूण राजकीय कारकीर्द कशी होती ?

मंगलोर लोकसभा मतदार संघात १९८४ मध्ये ते हरले. यांनतर बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी इथून पुढे दोनदा १९८९ आणि १९९१ जनता दलाच्या तिकिटावर विजय मिळवला. व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांना रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांनी अनेक काम मार्गी लावले. कोकण रेल्वेची गती याच काळात वाढली म्हणून हा प्रकल्प लवकर झाला.

मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी मिळून समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची १९९४ मध्ये स्थापना केली. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर १९९६ मध्ये युती केली. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती पक्ष या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा एक नवीन पक्ष अस्तित्वात आला. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.