MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नागराज मंजुळेने समाजाचं जे वास्तव दाखवलं ते बाकीच्यांना का जमलं नाही

nagraj manjule jhund marathi

स्वप्निल जोशी हेलिकॉप्टरने येतो आणि शाहरुखची छपरी नक्कल करून हिरोईनला विचारतो, ‘शिवम सारंगला तू ओळखत नाही? ‘ खेड्यातून येणाऱ्या आमच्या पप्याला शिवम सारंग हे नाव त्याच्या जवळचं कसं काय वाटेल ? पुण्यात फ्लॅटचे भाव किती वाढलेत ना ? गावात पारावर चर्चा करणाऱ्या लोकांना हे असलं ऐकून काय अप्रूप वाटणार ? खेड्यातील सोडा पण शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना चित्रपटातील 4 BHk मध्ये घडणाऱ्या प्रेम कहाण्या बघून त्यांच्या आयुष्याला न्याय दिल्यासारखं वाटेल का ? एक मान्य आहे कि चित्रपट मनोरंजनासाठी असतो समाज प्रबोधन हे त्याचं काम नाही तशी अपेक्षा करणे देखील चुकीचे आहे. तरीही मनोरंजन वास्तवापासून दूर असेल किंवा भावनिक दृष्ट्या ते प्रेक्षकांना आपलेसे वाटत नसेल तर तो चित्रपट समाजाचं खूप मोजकं दर्शन घडवतोय किंवा चित्रपटातील निर्मात्यांना तेवढी समज नाही असं म्हणावं लागेल. लेखक आणि दिग्दर्शक यांना समाजाचं पूर्ण आकलन नसेल तर एक वेळ मान्य करू पण ज्या समाजात आपण रोज आहोत तिथल्या फक्त ठराविक वर्गांच्या कथा पुढे आणून इतरांच्या अस्तित्वाला चित्रपट नाकारत असेल तर हे सरळ सरळ विशिष्ट वर्गाची सांस्कृतिक मक्तेदारी आहे.

शहरात येईपर्यंत बाल गंधर्व मध्ये नाटक चालतात हे आम्हाला माहित नव्हतं. आजही नाटकापेक्षा तमाशा आम्हाला जवळचा वाटतो. पण शहरी कलाकारांनी लोकांच्या डोक्यात नाटक म्हणजे अभिजन आणि तमाशा म्हणजे खालच्या लोकांचा ही प्रतिमा ठसवली. जर कलाकारच उच्च नीच अशी समाजाची व्यवस्था बघत असतील तर साहजिकच निर्माते उच्च समजली जाणारी कथाच लोकांसमोर घेऊन येणार. सर्व समाजातील महापुरुष महान असतात हे बोलायला भारी हे पण मग किती दलित स्त्री पुरुष चित्रपटाचे नायक म्हणून समोर आले. आता कुठे दलित नायक चित्रपटात यायला लागलेत. त्यात स्त्रिया तर अजूनही खूप मागे आहेत. नागराज मंजुळेचा फॅन्ड्री असू दे किंवा सैराट कथा मांडताना समाजातील शेवटच्या घटकाचा नेहमी विचार करतो. पण मग हेच काम गेल्या साठ सत्तर वर्षात इतर लेखक आणि दिग्दर्शकांना का जमलं नाही.

नागराज ज्या हिम्मतीने सिनेमा मांडतो तेवढी हिम्मत इतर दिग्दर्शकांमध्ये नाही हे वास्तव आहे. दुसरं कोट्यवधी रुपये गुंतवणूक असलेल्या चित्रपटाचं गणित बिघडेल जर मुख्य नायक दलित असेल अशी समज सगळ्याच निर्मात्यांची आहे. नागराजने विषय दलितांचे मांडले म्हणून चित्रपट हिट झाले असं नाही. नागराजने कोणताही विषय मांडताना मनोरंजनाशी तडजोड केली नाही. सैराट ज्यांना आवडला ते समाजातील बौद्धिक लोक नाहीत ते सर्वसामान्य प्रेक्षक आहेत. सर्वसामान्य प्रेक्षक हा मनोरंजनाचा भुकेला आहे. लेखक आणि दिग्दर्शक यांचं काम आहे कि विषय लोकांसमोर मनोरंजक पद्धतीने मांडून त्यांचं मत पोहचवणे. याबाबतीत दक्षिणेतील निर्माते जास्त पुढे आहेत. सैराट येण्याच्या आधीपासून त्यांनी वेगळे सिनेमे दिले आहेत जे गरिब आणि दलितांच्या आयुष्यावर आधारित आहेत आणि महत्वाचे सामाजिक संदेश देतात. एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्या सामाजिक आहे म्हणून डोक्याला जड होतील असे चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या वेळेशी खेळून काहीही साध्य होणार नाही उलट प्रेक्षक त्यामुळे नंतरच्या चित्रपटांकडे कायमची पाठ फिरवतील.

दिग्दर्शक वेंट्रीमरनने धनुषची मुख्य भूमिका असलेला असुरण चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बघितला नसेल तर बघा तेव्हा समजेल कि सामाजिक विषय पण मनोरंजक पद्धतीने चांगला मांडता येतो. त्याचबरोबर पेरियुरम पेरुमल, रजनीकांतचा काला, सरपट्टा परंबराई हे सगळे चित्रपट हिरोच्या पारंपरिक कल्पनांना छेद देऊन यशस्वी झाले आहेत. त्यामुळे नागराज मंजुळेने जे प्रयोग केले ते आधीपासून दक्षिणेत सुरु आहेत पण हिंदी आणि मराठी सिनेमांना काही अपवाद सोडले तर अजून तेवढं जमलं नाही. एकतर निर्माते या विषयांवर पैसे लावायला तयार नाहीत हे जेवढं खरं त्यापेक्षा लेखक दिग्दर्शक अशा विषयासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम नाहीत. पैशापेक्षा बौद्धिक गुलामी मोठी आहे. नजरेला सर्वांगीण दृष्टी दिल्याशिवाय गोर गरीब आणि दलितांचे विषय मुख्य प्रवाहात येणार नाहीत.

आंबेडकर चित्रपटाच्या बॅकग्राऊंडला नागराज मुळे येऊ लागले. त्याआधी आंबेडकर किंवा इतर महापुरुष चित्रपटात किती आले हा संशोधनाचा भाग आहे. आपल्या मुख्य प्रवाहातील लेखकांना आंबेडकरांसारखे महापुरुष भारतीय समाजाच्या रोजच्या आयुष्यातील भाग आहेत हे दिसलंच नाही, हे विशेष ! झुंडमध्ये अमिताभच्या पाठीमागे शाहू महाराज, आंबेडकर, फुले आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा दाखवल्या आहेत. हे खरं भारताचं वास्तव आहे. मग वास्तव दाखवायला एवढा वेळ का लागला ? वास्तव दाखवण्यासाठी कलाकाराला वास्तव मान्य करावं लागतं. मान्य नसलेली किंवा दुर्लक्ष केलेली परिस्थिती कलाकाराला पडद्यावर उतरवणे अवघड आहे.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.