सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चीन वेगळ्या झरोक्यातून ( चीन चा इतिहास समजून घेताना )

शेतकरीच चीनमध्ये क्रांती करतील या ठाम विश्वासावर माओ इतर कम्युनिष्टांशी वाद घालत होता.

खेड्यात डोंगर कपारीत राहून तो क्रांती पेरत होता. लोक प्रचंड गरिबी, हालअपेष्टा यामुळे त्रस्त होतेच. पुढे जाऊन हेच लोक माओचे लाल सैनिक (रेड आर्मी) झाले. माओचा पहिला प्रयत्न फसला. त्याच्या हजारो कॉम्रेडला शोधून शोधून मारण्यात आलं. माओ ईशान्येच्या डोंगरात काही दिवस लपून राहिला. पुन्हा कामाला लागला. दरम्यान चँग-कै-शेकच्या सैनिकात भ्रष्टाचार माओला पूरक होईल असा वाढला होता. म्हणून शस्त्रांची सोय स्वस्तात झाली. परिणामी एकदाचा १९४९ साली माओ सत्तेवर आला.

चीनसमोर असंख्य प्रश्न होते.

चहा पिकवणारा चीनचा गरीब शेतकरी स्वतः सकाळी फक्त गरम पाणी पिऊन दिवसाची सुरवात करत असायचा. ऐकून खरं वाटणार नाही पण चहा पिणे फक्त श्रीमंतांना झेपणारं पेय होतं. इतक्या टोकाची गरिबी चीन अनुभवत होता. कुटुंब व्यवस्थेत स्त्री पुरुष समानता नव्हती. अशा परिस्थितीत माओने बरेच कार्यक्रम हाती घेतले. त्यातला महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘सांस्कृतिक क्रांती’. हा दहा वर्षाचा कार्यक्रम माओने ठरवला होता. याच्यासाठी अनेक कॉलेज चे तरुण शाळा सोडून माओच्या रेड आर्मीत सामील झाले. प्रस्थापितांची कोणतीच निशाणी शिल्लक ठेवायची नाही या इराद्याने या लोकांनी अनेक बौद्ध मंदिरे पाडली. मोजता येणार नाही इतक्या प्राचीन वास्तू नंगा-नाच करून फोडल्या. माओच्या एका बायकोने (माओला चार बायका होत्या ) या सांस्कृतिक क्रांतीचा सल्ला दिला होता ज्याचे दुष्परिणाम जाणवायला लागले. हा कार्यक्रम बंद केला. माओच्या बायकोला फाशीची शिक्षा झाली. चीन मध्ये चांडाळ चौकडी म्हणून आज पण तिच्या कथा सांगतात.

१९७० नंतर चीनने एक मूल हे धोरण कठोरतेने राबवलं.

साहजिकच ते एक मूल मुलगाच होईल म्हणून लोक नको त्या क्लुप्त्या शोधू लागले. गर्भ तपासणी करून मुली पोटातच मारण्याचा सपाटा चालू झाला. मुलं जुळी झाली तर मात्र कायदा काही करू शकत नाही म्हणून मग लोकांनी शस्त्रक्रिया करून मुले जुळीच पैदा होतील अशी तजवीज करायला लागले. यात श्रीमंत आघाडीवर होते. जवळच्या एका बेटावर जिथे चीनचा कायदा लागू होतं नव्हता तिथे अनेक श्रीमंत लोक मुलाचा जन्म होईपर्यंत तिथेच राहतात. अशा अनेक पळवाटा लोकांनी शोधल्या. तरी पण शहरी भागात या कायद्याचं काटेकोर पालन होईल याची चीन सरकारने पुरेपूर काळजी घेतली. ग्रामीण भागात मात्र तेवढ्या प्रमाणात कठोरतेने या कायद्याचं पालन झालं नाही. लोकसंख्या नियंत्रणात आली पण एकांगी. काही गावात मुलीचं नसायच्या. लग्नासाठी मुलांना मुलगी मिळेना झाल्या. परिणामी मुलींना भरमसाठ हूंडा मिळायला लागला. चीनच्या संस्कृतीत मुलींना हूंडा आधीपासूनच देतात पण या काळात तो हूंडा गरिबांच्या आवाक्याबाहेर गेला.

साम्यवादी विचारधारा सत्तेत आली म्हटल्यावर चीन मध्ये भेदभाव राहिला नसेल हि भाबडी आशा असते.

शांघाय सारख्या शहराचं आपल्याला लै कौतुक असतं. आपले नेते पुण्या मुंबई सारख्या सगळ्या शहरांचं शांघाय करणार असतात. चीनने ठरवून हे शहर झगमगीत केलं. या शहराला झगमगीत करण्यासाठी खेड्यातून कामगार आणले जातात पण त्यांना तिथे कायम राहता येत नाही. शहराच्या कडेला त्यांची राहायची सोय केलेली असते. ठराविक काळानंतर यांना परत आपापल्या गावात जावं लागतं. शहरी नागरिकत्व यांना सहजासहजी मिळत नाही. सार्वजनिक वाहतूक यात तरी साम्यवाद असेल असं वाटतं पण यात सुद्धा गरीब जनतेसाठी वेगळे डबे असतात. जिथं सोयी सुविधांची पार वाट लागलेली असते. बस मधल्या महिला कंडक्टर सिगारेट फुकत तिकीट काढत असतात त्या तुलनेत श्रीमंत लोकांसाठी वेगळी सोय असते. तिथे स्वच्छता, टापटीपपणा असतो. हा कसला साम्यवाद कळत नाही. चीनमधला गरीब टोकाचा गरीब आहे. ग्रामीण भाग भीषण आयुष्य जगतोय पण चीन पहायला आलेल्या लोकांना याच दर्शन होऊ दिलं जात नाही. त्यांना सरकारने ठरवलेल्या ठिकाणीच फिरवलं जातं.

१९९० नंतर भारतासारखच चीनने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं.

परदेशी गुंतवणूक यायला लागली. शहरी भागात पैसा प्रचंड वाढला. चीन जगभरात वस्तू तयार करून स्वस्त दरात पोहचवतो. आपल्याकडे येणाऱ्या चिनी वस्तूंची गॅरंटी नसते आपण विश्वासाने सांगतो. पण चीनने अशी व्यवस्था त्या त्या देशानुसार ठरवली आहे. अँपल सारख्या कंपन्यांना देखील चीन सेवा पुरवतो त्याबाबतीत मात्र क्वालिटीला हयगय करत नाही. असे Customized धोरण चीनने ठेवलं आहे. तंत्रज्ञानात चीनने अफाट प्रगती केली. हे सगळे जाणतोच पण हे तंत्रज्ञान चीनने स्वतःवर उलटं फिरू नये म्हणून बाहेरच तंत्रज्ञान चीनपासून दूर ठेवलं आहे. Google ,Facebook चीनमध्ये चालत नाही. त्याला पर्याय म्हणून चीनने स्वतःचे सर्च इंजिन तयार केले आहे. चीनमधील कसलीच माहिती चीनबाहेर जाणार याची खबरदारी घेतली आहे. याची सुरवात माओने आधीच केली होती. वर्तमानपत्र, न्युज चॅनेल यांना सरकार विरोधात बातम्या देता येत नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती वा संस्था अटक होते, किंवा मारली जाते. माओने पक्षांतर्गत आणि बाहेर दोन्ही विरोधकांना जेल किंवा स्वर्गाचा मार्ग दाखवला आहे. १९८९ साली दहा हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना चीनने निदर्शने केली म्हणून मारून टाकलं आहे. ही बातमी जगासमोर आली पण आशा कित्येक बातम्या चीनने बाहेर येऊ दिल्या नाहीत.

चीन आवर्जून अभ्यास करावा किंवा समजून घ्यावा असं देश आहे.

त्याची सुरवात तुम्ही “अंजली सोमण” यांच्या “चीन एक वेगळ्या झरोक्यातून” केली तर तुम्हाला बरीच मदत होईल हा विषय समजून घ्यायला. या पुस्तकातून मला समजलेला चीन तुमच्यासमोर मांडला आहे. या व्यतिरिक्त आपल्याजवळ चीनची काही माहिती असेल तर ती पण तुम्ही मांडू शकता. या पुस्तकातून तुमचं आकलन कदाचित वेगळं असू शकत. पुस्तक वाचून ते सुद्धा तुम्ही मांडत रहा. शेवटी लेखिका वास्तविक आणि आभासी चीन याचा सारांश एका वाक्यात सांगते, “चीनच्या प्रगतीने भारताने दिपून जायचं कारण नाही.”

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.