पंजाबमध्ये थैमान घालणाऱ्या हिंसाचाराला पायबंद
घालण्याचे काम ज्याच्याकडे आहे,
तो एक कडक ख्रिस्ती आहे.
जो रस्त्यावरून जाताना जवळ बंदूक बाळगत नाही
आणि ज्याने स्थानिक भाषाही आत्मसात केलेली नाही.
भारतीय वृत्तपत्रे त्याला सुपरकॉप म्हणतात.
त्याच्या हाताखालच्या माणसांना तो हीरो वाटतो
आणि त्याचे शत्रूही नाखुशीने का होईना त्याच्या आदर करतात.
१ जून १९८७ ला अशी बातमी आपल्या एका पोलीस अधिकाऱ्याबद्दल छापून आली. पण यात काय विशेष अशा बातम्या रोज किती तरी येतात. इथे विशेष हे होतं कि हि बातमी अमेरिकेच्या ‘शिकागो ट्रिब्युन’ मध्ये छापून आली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल हि बातमी होती त्याच नाव होतं ‘ज्युलिओ रिबेइरो’.
सध्या पंजाब सीमेवर शेतकरी आंदोलन चालू आहे, त्यात नेहमीच खलिस्तानी अतिरेक्यांचा चळवळीचा उल्लेख होतो. या चळवळीची मुळे स्वातंत्र्यानंतरची आहेत आणि 1980 च्या दशकात तर देशाच्या एकतेला या चळवळीने आव्हान दिले होते. ज्युलिओ रिबेइरो यांनी खलिस्तानी चळवळ जोम धरत असताना पंजाबमध्ये शांतता राहण्यासाठी बरेच कष्ट घेतले. याचा परिणाम म्हणून १९८६ ला त्यांच्यावर हल्ला पण झाला होता. ज्युलिओ रिबेइरो यांची कारकीर्द बरीच रोमांचकारी आहे. म्हणूनच ऐशीच्या दशकात हे नाव चांगलंच गाजलं.
सचिन वाझे प्रकरणात ज्युलिओ रिबेइरो हे नाव चर्चेला आलं
महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरण गाजत आहे. सरकार आणि विरोधी पक्षातर्फे एकमेकांवर जोरदार चिखलफेक होत आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. त्यात त्यांनी ज्युलिओ रिबेइरो यांच्याकडून तपास करण्याची मागणी केली. रिबेइरो यांनी वाढत्या वयाच कारण देत याकरिता नकार दिला. पण खुद्द शरद पवारांनी ज्युलिओ रिबेइरो यांचं नाव सुचवलं यावरून हा माणूस काहीतरी विशेष आहे याची आपण कल्पना करू शकतो.
Bullet for Bullet: My Life as a Police Officer
आपण त्यांच्या सुप्रसिद्ध “Bullet for Bullet: My Life as a Police Officer”. या पुस्तकाबद्दल माहिती घेऊ. त्यांच्या 36 वर्षाच्या पोलिस कारकीर्दीचा परामर्श त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या नियुक्तीपासून ते भारतीय उपायुक्त पर्यंतचा प्रवास यात विस्तृतपणे आहे. त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त, CRPF चे महासंचालक, पंजाब मधील अशांततेचा काळ, त्यांच्यावर झालेले दोन जीवघेणे हल्ले या सर्वांचा पुस्तकात उल्लेख आहे. ज्युलिओ रिबेइरो यांची ओळख संपूर्ण कारकीर्दीत सुपरकॉप अशीच होती, त्यांच जनतेत सहज मिसळणे, पत्रकारांना नेहमीच उपलब्ध असणे. अंतर्गत राजकारणापासून दुर असणे, आता गुप्तता हीच सरकारी धोरणाचा भाग झाली असताना पारदर्शकता ठेवणे, अपवादात्मक परिस्थिती सोडून सोबत कधीही शस्त्र न बाळगणे, या गोष्टीचं विशेष कौतुक झालं आहे.
त्यांची कारकीर्द ते तत्कालीन राजकारण या दोन्ही गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतात. महाराष्ट्रातील गिरणी कामगारांचे लढे त्यांचे नेते उदा. डॉ. दत्ता सामंत यांचे प्रकरण वाचनीय आहे. तसेच शिवसेनेसोबत त्यांचा पोलिस अधिकारी म्हणुन आलेला संबंध व त्याकाळातील महाराष्ट्राचं राजकारण यांची माहिती वाचकांना मिळते. हे पुस्तक म्हणजे भारतीय अंतर्गत सुरक्षेचा एका अधिकाऱ्याच्या नजरेतून घेतलेला आढावा आहे. पोलिस दलाचे राजकारणी लोकांशी आलेला सबंध, त्यांचे हेवेदावे, त्यांची अभद्र युती, पोलिस दलामधील अंतर्गत संघर्ष यांचा एक दस्तऐवज आहे. पंजाब मधील अशांतता, त्याला पाकिस्तानची फुस, कॅनडा मधील शीख लोकांचा त्याला पाठिंबा आणि त्याची राजकिय, भावनिक आणि मानसिक या सर्व कारणाचा उल्लेख या पुस्तकात आहे. उच्च पातळीवर निर्णय कशा पद्धतीने होतात याची माहिती सहसा सामान्य माणसाला नसते, तो निर्णय घेण्याआधी विविध कंगोरे तपासल्या जातात. तत्कालीन राजकारण, अधिकारी लोकांमधील स्पर्धा या सर्वांचा त्या निर्णय प्रक्रियेवरवर प्रभाव पडतो.
प्रशासनात जाऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचायला हवं.
भारतातले प्रशासन अजूनही इंग्रजी वळणाचे आहे, त्यांचा साहेबी थाट जाता जात नाही. IAS, IPS यांचे संबंध, त्यांच्यातले मानापमान या सर्व घडामोडी या पुस्तकात आहेत. माणसाच्या स्वभावाचा त्यांच्या कार्यावर होणारा प्रभाव, त्यांचे सहकारी, त्यांचे प्रतिस्पर्धी या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आलेला आहे. भारतीय आत्मचरित्रात सहसा आढळणारा आत्मप्रौढीचा दोष या पण पुस्तकात आहे. बहुतेक दोन पानानंतर मीडिया मध्ये छापुन आलेले कौतुकाचे उतारे जसेच्या तसे पुस्तकात आहेत. प्रतिस्पर्धी अधिकाऱ्याच्या मताबद्दल लेखकाने सहिष्णू असायला हवे होते, पण पुस्तक वाचून ते जाणवत नाही. शेवटी सर्व माणसामध्ये गुणदोष सारखेच असतात. उदा. कोणत्या अधिकार्यांनी लेखकाला जेवायला बोलावलं नाही तर लेखक त्याला स्वतःचा अनादर समजतात.
(20 वर्षाआधीची शुल्लक गोष्ट)
शेवटी काहीही असलं तरीही ज्युलिओ रिबेइरो त्यांच्या काळातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक होते. यात शंका नाही.त्यांनी पोलीस सुधारणा, पोलिसांचे राजकीयकरण या गोष्टीवर खूप मोलाच्या सूचना केल्या आहेत. त्या नक्कीच वाचनीय आहेत. एक विशेष बाब म्हणजे त्यांनी Bullet for Bullet हे वाक्य कधीच वापरल नाही, तरी एका पत्रकाराच्या माध्यमातून ते सर्वदूर पोहोचलं आणि त्याचा पोलिसाच्या मनोधैर्यावर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी हे शीर्षक पुस्तकात वापरलं. एकंदरीत पुस्तक वाचनीय आहे, आणि त्याचा मराठी अनुवाद चिनार प्रकाशनने केला आहे.
हे खास आपल्यासाठी
‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ : संघर्ष करणाऱ्या सर्वानी वाचावे असे…
मुंबईच सुखाचं आयुष्य सोडून बिहारच्या खेड्यात या डॉक्टरने गरिबांची सेवा केली.
अर्थाच्या शोधात – डॉ. विजया बापट