सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

प्राण खलनायक असूनही अमिताभ पेक्षा दुप्पट जास्त पैसे घ्यायचा.

actor pran story in marathi

पडद्यावर खरा खलनायक तोच असतो जो बघून खरा खुरा राग येतो. मराठीत निळू फुले यांना चित्रपटाबाहेर सुद्धा तिरस्काराला सामोरे जावं लागायचं. यावरून निळू भाऊंच्या अभिनयाचा दर्जा कळेल. हिंदी सिनेमात सुद्धा काही नावं आहेत ज्यांनी खलनायकाच्या भूमिकेला लोकांच्या डोक्यात असं बसवलं कि लोकांना खरंच या लोंकांचा राग यायचा. यात ‘प्राण’ हे नाव नेहमीच आघाडीवर राहील.

१९४० ते १९९० या काळात सिनेविश्वातील खलनायकी नाव असलेले प्राण कृष्ण सिकंदर आजही त्यांच्या दमदार अभिनयासाठी स्मरणात आहेत. त्या काळात अनेक सुपरस्टार आले आणि गेले पण खलनायक म्हणून प्राण हा चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती राहिला. त्यांच्या पात्रांची भीती इतकी होती की लोकांनी त्यांच्या मुलांचे नाव प्राण ठेवणेही बंद केले. अभिनेत्यांच्या गर्दीत यांचं नाव कधी नसायचं चित्रपटाच्या शेवटी सर्व कलाकारांच्या नावानंतर ‘आणि प्राण’ असं त्यांचं नाव यायचं. यावरून समजून घ्या प्राण यांचा त्या काळात दबदबा काय होता. प्राण यांच्याकडे ती क्षमता होती ज्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे खेचला जायचा. पुढे प्राण यांचे चरित्रही याच नावाने आले.

प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी दिल्लीत झाला. २०२२ मध्ये चित्रपट जगत त्यांची १०२ वी जयंती साजरी करत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मोहम्मद वली त्यांच्या ‘यमला जट्ट’ चित्रपटासाठी नायकाच्या शोधात होते. एके दिवशी एका सुपारीच्या दुकानात त्याची नजर प्राणवर पडली. हा तो काळ होता जेव्हा चित्रपट निर्मात्यांना अभिनेत्याची प्रतिभा एका नजरेत लक्षात यायची. हा चित्रपट यशस्वी झाला. देशाची फाळणी झाली तेव्हा प्राण यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेग आला आणि ते लाहोर सोडून मुंबईत आले. मुंबईत त्यांना कारकीर्द पुन्हा उभी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. प्रख्यात चित्रपट पत्रकार फझले गुफ्रान यांनी त्यांच्या ‘मैं हूं खलनायक’ या पुस्तकात लिहिले आहे की प्राण यांचे मुंबईतील पहिले पाच-सहा महिने इतके कठीण गेले की त्यांना हॉटेलमध्ये काम करावे लागले आणि पत्नीचे दागिनेही विकावे लागले.

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्यामुळे त्यांना देव आनंद आणि बॉम्बे टॉकीज निर्मित ‘जिद्दी’ चित्रपट मिळाला. यानंतर ‘आझाद’, ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘राम और श्याम’, ‘मन’, ‘मुनीमजी’, ‘अमरदीप’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘वारदात’ ‘देस परदेस’ सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत प्राण दिसले. प्राण यांनी प्रत्येक भूमिकेतून अभिनयाची छाप सोडली.

७० च्या दशकात प्राण हे हिंदी चित्रपटसृष्टीत इतके मोठे झाले होते की, खलनायकाच्या भूमिकेतही त्यांचे मानधन बॉलीवूडच्या नायकांपेक्षा जास्त होते. त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यापेक्षा जास्त फी प्राण घेत असे. १९७८ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या सुपरहिट चित्रपटासाठी अमिताभ यांना अडीच लाख मिळाले तर प्राण यांनी पाच लाख फी घेतली. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की त्या काळात त्यांचे स्टारडम काय असेल. प्राण यांनीच अमिताभ बच्चन यान्ना प्रकाश मेहरा यांच्यकडे नेले होते त्यामुळेच अमिताभला ‘जंजीर’ हा चित्रपट मिळाला.

प्राण हा केवळ अप्रतिम अभिनेताच नव्हता तर तितकाच जिवंत स्वभावाचा माणूस होता. त्याच्या स्टारडमबद्दल त्याला कधीच श्रेष्ठत्व नव्हते आणि ते लोकांशी अगदी सहजतेने वागायचे. ज्येष्ठ सिनेलेखक रामकृष्ण यांच्या पुस्तकात याबाबत एक किस्सा आहे की, एकदा प्राण यांना एका कार्यक्रमासाठी बोलवायचे ठरले. फोन झाला नाही, म्हणून पत्र पाठवले पण प्राण यांच्या बाजूने काहीच प्रतिसाद न आल्याने आयोजकांनी गैरसमज करून घेतला. ते कार्यक्रमाला येत नाहीत असे गृहीत धरले. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी कोणीतरी येऊन सांगितले की, प्राण सारखी व्यक्ती बाहेर उभी आहे. बाहेर बघितले तर प्राण हजर होते. म्हणाले की ‘तुम्ही निमंत्रण दिलं आणि आलो नाही असं होईल का ? अती व्यस्ततेमुळे मला तुमच्या पत्रांची उत्तरे देता आली नाहीत ही बाब मात्र निश्चितच आहे, पण याचा अर्थ असा नाही की या फिल्मी दुनियेत प्राण नावाची कोणीही व्यक्ती नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.