सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

देशभक्त सैनिक ते आंतरराष्ट्रीय धावपट्टू शेवटी कसा झाला मोस्ट वॉन्टेड गुंड

सरकार तो चोर है जी।

हे सैन्यात असताना व्यवस्थेबद्दल पानसिंगचं परखड मत. पण या व्यवस्थेपेक्षा लष्कर प्रमाणिक आहे म्हणून तो लष्करात आहे असं सांगतो. सैन्यात आयुष्य गेल्याने व्यवस्थेबद्दल किंवा सरकार बद्दल त्याचं मत बदलत. सरकारी यंत्रणा नागरिकाला मदत करण्यासाठी असते. अन्याय झाला तर सरकारी व्यवस्था या प्रति जबाबदार असते ही त्याची धारणा पक्की होते. म्हणून तर कौटुंबिक वादातील जमिनीचा वाद मिटवण्यासाठी सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार देऊन न्यायासाठी दोन-तीन वर्षे खेटे घालत राहतो.

ती समान गोष्ट म्हणजे ‘ न्याय ‘

कायदा सर्वांसाठी समान असतो ही त्याची श्रद्धा, सरकारी यंत्रणा खोटी ठरवते. काही लोकांसाठी कायदा जास्त समान असतो हा अनुभव यंत्रणा त्याला देत राहिली. एरव्ही व्हीआयपी संस्कृतीच्या पाठीमागे न्याय घेऊन धावणाऱ्या व्यवस्थेत पानसिंग एक राष्ट्रीय खेळाडू व्हीआयपी म्हणून पण गणला जात नव्हता. मग पानसिंग सामान्य नागरिक म्हणून या व्यवस्थेने त्याची काय गणती केली असेल, हा विचार सुद्धा करायला नको. सामान्य नागरिकांची समजा किंवा एका राष्ट्रीय खेळाडूची समजा जर पानसिंगची बाजू न्याय्य होती आणि ती जर गंभीरतेने घेतली गेली असती तर सुप्रसिद्ध खेळाडू कुख्यात गुंड झाला नसता. निवृत्तीनंतर पानसिंगच आयुष्य वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भूमिका बदलत एकाच गोष्टीभोवती फिरतय. ती समान गोष्ट म्हणजे ‘ न्याय ‘.

फूलन देवी सारखा विषय या अगोदर मांडला गेला आहे.

त्यातून हेच सांगायचं आहे की या लोकांना परिस्थितीने हातात बंदूका घ्यायला भाग पाडलं. म्हणून ते स्वतःला गुंड किंवा दरोडेखोर बोलत नाहीत तर बागी बोलतात. अन्यायाविरूद्ध हिंसा ही त्यांची मुख्य प्रेरणा आहे. अन्याय करण्यासाठी हिंसा अशी त्यांची प्रेरणा नाही. तरीही हिंसेचं समर्थन होऊ शकणार नाही. पण याशिवाय वेगळा पर्याय काय असू शकला असता. किंवा तो पर्याय शक्य झाला असता का हा प्रश्न शिल्लक राहतोच. तिग्मांशू धुलिया हे ग्रामीण उत्तर भारतातील परिस्थितीशी चांगली जाण असलेले दिग्दर्शक. संपूर्ण चित्रपटात ग्रामीण जनजीवन, संवाद करण्याची लकब उत्तमरित्या टिपली आहे.

इरफान खानने साकारलेला मुख्य नायक मसाला चित्रपटांप्रमाणे भडक डायलॉगबाजी कुठेच करत नाही.

त्यामुळे या चित्रपटातून किंवा अशा चित्रपटांमधून मानवी अंगाने चित्रपट पाहण्याची सवय लागते. नेहमी लार्जर दॅन लाइफ चित्रपटासारखी आभासी दुनिया तुम्हाला दाखवून खोट्या विश्वात खेळवत नाही. वास्तविक कथेला धरून असणारे चित्रपट मनोरंजनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही असं सर्रास बोललं जातं, पण हा चित्रपट याला अपवाद म्हणावा लागेल. यात सस्पेन्स नाही, हिरो एकावेळेस शंभर लोकांना मारत नाही, भाषेचा बाझ नमुनेदार हिंदी नाही. तरी सुद्धा चित्रपट शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणा होत नाही. चौथी शिकलेला पानसिंगचा राष्ट्रीय खेळाडू ते गुन्हेगार हा प्रवास डोळे विस्फारून टाकणारा रोमांचकारी आहेच. पण या प्रवासादरम्यान पानसिंग जागोजागी तत्वज्ञान सांगत राहतो याकडे कुणाचे लक्ष जात नाही.

जनता के रक्षा की नौकरी है, चिता पे रोटी सेकने की नहीं।

बागी होण्यापूर्वी मदत नाकारणार्या पोलिसाला ‘ जनता के रक्षा की नौकरी है, चिता पे रोटी सेकने की नहीं। ‘ असं रागात बोलतो. बागी झाल्यानंतर याच पोलिसाला तो सहज मारू शकला असता पण पानसिंग त्याला त्याच्या खाकी वर्दीची माफी मागायला लावतो. बेइमानी पानसिंगशी नसून खाकी वर्दीतल्या कर्तव्याशी होती, हे त्याला दाखवून देतो. पानसिंगला पकडण्यासाठी पोलिस मागावर असतात. तेव्हा वृत्तपत्रे आणि रेडिओ सतत पानसिंगच्या बातम्या झळकवत राहतात. त्याच पानसिंगचा राष्ट्रीय पदक मिळाल्यावर एवढा उदोउदो झाला नाही. समाजात आजही गुन्हेगारांची चर्चा जास्त होते. पण त्या बदल्यात एखादं विधायक काम करणाऱ्यांबद्दल तेवढी चर्चा होत नाही. समाज म्हणून आपण कुठल्या मूल्यांना समाजापर्यंत पोहोचवतोय कुणाला भान राहिलेले नाही. आईवर शिवी देऊन सहज बोलणाऱ्या त्यावेळच्या समाजात पानसिंग लगेच प्रशिक्षकावर नाराजी व्यक्त करतो. आजही आपल्या समाजात आईवर शिवी देणे फार गंभीर मानले जात नाही, हे आपलं दुर्दैव. मुलाखत घेणारा पत्रकार लेखक व्हायचं म्हणतो तेव्हा, ‘आराम का काम है’ हा टोला पानसिंग त्याला मारतो.

भूक माणसाला स्वप्न पाहू देत नाही

पानसिंगला मात्र भूक शमवण्याचा शोधात धावताना शर्यतीची धावपट्टी पायाखाली येते. इथून पानसिंग धावपटू म्हणून जगापुढे येतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढच्या दहा पंधरा वर्षातील ही परिस्थिती आजही फारशी बदलली नाही. अनेक क्रीडा प्रकारातील योग्य आणि लायक खेळाडू खर्च झेपत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. मग ऑलिम्पिकमध्ये यावर्षी पदे कमी का मिळालीत याच्या चर्चा वर्षानुवर्षे चालूच राहतील. आणखी एक गंभीर बाब चित्रपटातून मांडली आहे. सरावादरम्यान पानसिंगला बूट घालून सराव करायचा असतो हे कधी जाणवलं सुद्धा नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची इज्जत जायला नको म्हणून अचानक ऐन शर्यतीच्या वेळी बूट घालून धावायला सांगितलं जातं. पानसिंग ही शर्यत हरतो.

ह्या असल्या कारणामुळे भारतीय क्रीडाविश्वातील पानसिंग सारख्या कित्येक खेळाडूंचं किती नुकसान झालं असेल याचा हिशोब मांडणं जमणार नाही. कित्येक पानसिंग स्पर्धेपूर्वीच संपले. एका खेळाडूचा गुन्हेगार होईपर्यंत नाईलाज करणे हा केवळ चित्रपटाचा मुख्य गाभा नाही. त्याबरोबरच क्रीडा विश्वाबद्दल शासन व्यवस्था आणि समाजाचा दृष्टिकोन आजही तसाच जसा पन्नास-साठ वर्षांपूर्वी होता, हाही तितकाच गंभीर प्रश्न आहे. हा विषय चित्रपटात ठळक जाणवत नाही पण दिग्दर्शकाने तो सफाईदारपणे मोजक्या काही संवादातून मांडला आहे. पुरावा म्हणून चित्रपटाच्या शेवटी काही खेळाडूंची नावे येतात. आणि कंसात एका ओळीत त्या खेळाडूंचं शेवटचं आयुष्य कसं गेलं हे सांगितलं आहे.

अनेक राष्ट्रीय खेळाडूंना शेवटच्या काळात जगण्यापुरती सुद्धा साधनं राहिली नाहीत

काही खेळाडू औषधोपचाराला पैसे नाहीत म्हणून मरण पावले. अत्यंत हलाखीत या खेळाडूंना मरण आलं. मग प्रश्न उरतो या लोकांनी ज्या देशासाठी ही पदके आणली त्याला काही महत्त्वच नव्हतं का? ज्या देशाचं हे प्रतिनिधित्व करत होते त्या देशातील नागरिकांना पण त्यांचे आयुष्य दिसले नाही का? क्रीडा विश्वात पण सेलेक्टिव जस्टीस नावाचा प्रकार असावा. म्हणून क्रिकेट सोडून इतर खेळांच्या खेळाडूंना तितकं वैभव लाभलं नाही. एकूण क्रीडा प्रकारांबद्दल शासकीय अनास्था ही मांडलीच आहे. पण नागरिकांची अनास्था पण तेवढीच जबाबदार आहे. आपल्या जनतेने कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचा हे आधीच ठरवले आहे. म्हणून मग अनेक कीर्तिवान खेळाडू आपण जाणून बुजून नजरेआड केले किंवा त्यांच्या प्रतिभेला त्या प्रमाणात महत्त्व दिलं नाही.

सामाजिक कसोटीवर चित्रपट सरस ठरतो

शिवाय इरफानने साकारलेला पानसिंग मनोरंजनात पण कमी पडत नाही. बायकोशी बोलताना खट्याळ आणि हलकेसे चावट संवाद करणारा पानसिंग मनात गुदगुल्या करतो. धावपट्टीवर धावताना आवाहन सहज पार करणारा पानसिंग आत्मविश्वास वाढवतो. आईवर प्रचंड जीव असणारा पानसिंग हळवा वाटतो. बागी होण्यापूर्वी स्वतः आणि इतरांनाही शस्त्र घेऊन न देणारा पानसिंग समंजस नागरिक वाटतो. टोळी मधला एक जण मेल्यावर त्याच्या घरी पैसे पाठवणारा जबाबदार म्होरक्या दिसतो. अभिनयाच्या अशा वेगवेगळ्या छटा इरफानने साकारलेल्या नायकाच्या तुम्हाला प्रेमात पाडतात. म्हणून मग इरफान सारखा अभिनेता सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्यांना चित्रपटात त्यांचं प्रतिबिंब दाखवतो. त्यांना तो आपलाच माणूस वाटतो, आणि हेच कुठल्याही अभिनेत्याचं खरं यश असतं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.