सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जय भीम – व्यापक अर्थाने केलेली क्रांतिकारी घोषणा

आतापर्यंत मसाला चित्रपटात दक्षिणेच्या सिनेमाचा हातकंडा आहेच. पण त्याच बरोबर वास्तविक आणि संवेदनशील विषयांना मनोरंजक पद्धतीने मांडून बुद्धिमान आणि सामान्य प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्याची जादू या सिनेमात आहे. मराठी आणि हिंदी सिनेमाला अजून मुख्य प्रवाहातील विषयांना सुद्धा नीट मांडता येईना. काही अपवाद सोडले तर मराठी आणि हिंदी मध्ये तोच तोच पणा ठासून भरला आहे.
खरं तर जय भीम नावाने चित्रपट काढणे हेच आपल्या कित्येक कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक यांना रुचलं नसतं. सुदैवाने सगळीकडे परिस्थिती सारखी नसते. सामाजिक विषयांवर मुख्य प्रवाहातील अभिनेते चित्रपट करत आहेत यात दक्षिण भारत आघाडीवर आहे ही मोठी आशादायक बाब आहे.

‘जय भीम’ घोषेणाचा खरा अर्थ काय ?

एका सीनमध्ये कैद्यांना सोडवताना त्यांची जात विचारली जाते आणि ते जर खालच्या जातीतील असतील तर त्यांना परत खोट्या केसमध्ये आत टाकलं जातं. त्यांचा गुन्हा एकच असतो कि ते न्यायासाठी भांडू शकत नाही किंवा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तेवढे सक्षम नाहीत. अशा वेळेस कायदा ‘कुठे’ समान असतो हा प्रश्न पडतो. तेव्हा जय भीम ही घोषणा आठवून करून देते समान न्यायाची. चित्रपटात जय भीम घोषणा कुठेच नाही असं काही लोकांनी आक्षेप घेतला होता पण एक गोष्ट समजून घ्या चित्रपटात वकील चंद्रू यांना काही लोक हार घालायला येतात तेव्हा वकील चंद्रू आंबेडकरांचा पाटीवर लिहिलेला विचार लोकांना वाचायला सांगतात आणि निघून जातात. हा विचार काय आहे तो चित्रपटात नक्की बघा. थोडक्यात काय तर जय भीम ही मानवी मूल्यांसाठी, न्यायासाठी झगडणारी संकल्पना आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट घोषणेत अडकणारा नाही तर जय भीम घोषणेच्या व्यापक अर्थाने मांडलेला आहे.

खरा हिरो कोण आहे?

मुख्य नायक वकील चंद्रुची भूमिका साकारलेला सूर्या वाटत असला तरी ही कथा ही सेंगणि या गरोदर महिलेची आहे. हतबल आणि हताश सेंगणि नवऱ्याला शोधण्यासाठी गरोदर असतानाही लढायला पुढे येते. वकील चंद्रूचा कायदेशीर लढा नक्कीच महत्वाचा आहे पण सेंगणीचा लढा त्यापेक्षा खूप वेगळा आहे. तिला कायदा समजत नाही. गरीब, अशिक्षित आहे. तिचं विश्व लहान आहे. नवरा हा तिचा एकमेव आधार आहे. तिच्यासाठी लढाई सोपी नाही. अनेक प्रसंगातून हे बघायला मिळेल कि आता सेंगणि खचेल आणि पुढे जाणार नाही, परिस्थतीशी जुळवून घेऊन ती तिचा लढा थांबवेल. पण चित्रपटात सेंगणि ज्या पद्धतीने प्रत्येक प्रसंगाला हाताळते ते पाहून सेंगणि बद्दल कमालीचा आदर निर्माण होतो. ज्या सेंगिणीला पोलीस सुरवातीला उभे करत नाही आणि नंतर काही दिवसांनी त्याच सेंगिणीला घरी सोडवतो म्हणून मागे लागतात तो प्रसंग खूप काही सांगून जातो.

मनोरंजनापलीकडचा खिळवून ठेवणारा सिनेमा.

दिग्दर्शक सिनेमात कुठेही अवास्तव परिस्थिती दाखवत नाही राग आला म्हणून हिरो कुणाचा गळा दाबत नाही. प्रत्येक प्रश्नाला तो अभ्यास करून उत्तर देतो. सेंगिणी मदतीला चंद्रूकडे येते तेव्हा चंद्रू जे झालं ते सगळं खरं सांग म्हणतो यावरून एक लक्षात घ्या चंद्रूचा लढा अहंकार सिद्ध करण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे. शेवटपर्यंत अहंकार आणि न्याय या दोन गोष्टी चंद्रू एकत्र करत नाही. म्हणूनच सूर्याचा अभिनय वास्तविक चंद्रू सारखाच असेल असं वाटतं. राजकन्नु ही सेंगिणीच्या नवऱ्याची भूमिका करणारा अभिनेता सुद्धा कमालीचा आहे. काही ठिकाणी त्याला बघताना त्रास होईल आणि व्यवस्थेवर शिव्या निघतील इतकं सगळं वास्तविक दाखवलं आहे. ‘न केलेल्या गुन्ह्याची कबुली कशी देऊ’ हा राजकन्नूचा संवाद हृदय पिळवटून टाकतो. पोलीस आणि इतर सह कलाकारांनी सुद्धा भूमिका अतिशय उत्तम साकारल्या आहेत. चित्रपट सामाजिक विषय असला तरी चित्रपट कुठेही थांबल्यासारखा किंवा कंटाळवाणा वाटत नाही. तर्कहीन एकही प्रसंग नाही. कोर्टातील नाट्यमय प्रसंग खूप संशोधन आणि मेहनतीने बनवलेले आहेत. चित्रपटात असे अनेक प्रसंग आहे ज्यात खूप सुप्त अर्थ लपला आहे. खरं तर प्रत्येक प्रसंगाचा बारकाव्याने अर्थ शोधावा इतका हा चित्रपट वेगळा आहे. शेवटचा एक प्रसंग ज्यात लहान मुलगी हातात वर्तमान पत्र वाचायला घेते. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेच्या दोन फ्रेम मध्ये दोन विरुद्ध विचारांच्या माणसांचं संभाषण, अशा अनेक ठिकाणी प्रतीकांचा योग्य वापर केला आहे.

हा प्रश्न फक्त दलित किंवा आदिवासी लोकांचा म्हणून चित्रपट बघण्याचा दृष्टिकोन संकुचित अजिबात करू नका. चित्रपटातील प्रश्न खूप गंभीर आणि मानव जातीला लाज वाटणारा आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळत नसेल तो समाज कधीच आदर्शवादी नसतो. या चित्रपटाचा मुख्य आशय त्याच्या कथेपासून शेवटपर्यंत दूर जात नाही. चित्रपट नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.