सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

लक्ष्मी दर्जाहीन चित्रपटाची चर्चा करत बसला आणि त्याच वेळेस साऊथ मध्ये ब्लॉकबस्टर आला

सुरराई पोतरु सिंघम स्टार सूर्याचा हा नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. सिम्पली डेक्कन चे संस्थापक जी. आर. गोपीनाथ यांच्या वास्तविक आयुष्यावर हा चित्रपट आहे. सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी विमान सेवा सुरु करण्याचं एक माणूस स्वप्न बघतो आणि त्यासाठी त्याने केलेली धरपड अशी हि कथा आहे.

गेल्या काही वर्षात बायोपिकच जास्तच पीक आलं. पण हा बायोपिक अजिबात निराश करणार नाही. सिंघम स्टार सूर्या बघून असं वाटलं होतं कि यात मसाल्यासाठी थोडीफार ऍक्शन नक्कीच असेल. दक्षिणेचा सिनेमा म्हणलं तर तेवढी खात्री असतेच. पण संपूर्ण चित्रपट अजिबात हि कुठंच अति रंजित काल्पनिक होत नाही. सुरवातीपासून वास्तवाची लय चांगलीच पकडतो. सूर्या बरोबरच हा चित्रपट अपर्णा साठी बघितलाच पाहिजे. अपर्णाची भूमिका इतकी वास्तविक आहे कि यावरून तिने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येईल. सूर्या आणि अपर्णाचा रोमान्स अजिबात टिपिकल दाखवला नाही. काही सिन बघताना आतापर्यंत असं पहिला नाही असं होईल. सूर्याचं अंत यात्रेतील नाचणं असो किंवा पावसात दोघांचं नाचणं एक वेगळा अनुभव वाटेल. तुम्हाला भाषा कळत नसली तरीही गाणी मस्त वाटतील. मुख्य म्हणजे उगीच गाणी टाकली नाहीत. नाहीतर लक्ष्मी मध्ये गाणं टाकायचं म्हणून बळच सिन तयार केले आहेत.

मुख्यतः हि कथा खूप प्रेरणा देईल अशा पद्धतीने मांडली आहे. दिग्दर्शक सुधा कोंगरा आणि तिच्या टीमने पटकथा उत्तम लिहिली आहे. एखादा दुसरा अपवाद वगळता कथा फ्लो सोडत नाही. काही सिन तुम्हाला डोळ्यात पाणी आणतील इतके भावनिक आहेत. अपर्णा आणि सूर्याने भावनिक गोष्टींना न्याय दिला आहे. परेश रावलने निगेटिव्ह शेड भारीच वठवली आहे. पटकथेला अनुसरुन कलाकारांची निवड एकदम साजेशी आहे. उगीच गोरे गोमटे चेहरे शो पीस म्हणून अजिबात कुठेच वापरले नाहीत. सर्व साईड ऍक्टर बघून वास्तविक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात असं वाटतं. भारतात हिंदीला अवाजवी महत्व दिल्याने फक्त उत्तर भारतीय संस्कृती गिरवण्याची सवय आपल्याला लागली, म्हणूनच हिंदी पेक्षा चांगले चित्रपट इतर भाषांमध्ये येतात हे अजून आपल्याला कळलं नाही हे दुर्दैव. मराठी इंडस्ट्रीने तर याची जास्त दाखल घेतली पाहिजे. नेहमी पुण्या मुंबईच्या आतच मराठी सिनेमा खेळात असतो. यावर पुन्हा कधी बोलू तूर्तास हा सुरराई पोतरु हा सिनेमा बघा आणि आपला अभिप्राय कळवा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.