१) कर्णन
महाभारत दुसऱ्या बाजूने समजून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. धनुषचे फॅन असाल तर मग हा चित्रपट अजिबात चकवू नका. २०२१ मध्ये आलेला हा एक सर्वोत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याची कथा फक्त चित्रपटात दिसते तेवढीच नाही. हा चित्रपट प्रत्येक घटनेतून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात गाढवाचे पाय बांधले आहेत तर घोडा मोकळा आहे पण तो संपूर्ण चित्रपटात धावत नाही. गावातील लोकांची नाव ही महाभारतातील कौरवांच्या गटातील आहेत. या घटनांचा अर्थ तुम्हाला शोधायला जमलं तर कळेल कि हा चित्रपट काय दर्जाचा आहे. ही कथा कोरडं भाष्य करणारी नाही. गावात बस थांबत नाही ही घटना दिसताना लहान वाटेल पण यामुळे एखाद्या समुदायाला आपण प्रगती पासून रोखतो आहे हे आपल्या लक्षात येत नाही. कर्णन हा चित्रपटातील एकटा हिरो नाही. टिपिकल नायक खलनायक यापुढे जाणारा हा सिनेमा आहे. Amazon Prime वर चित्रपट बघायला मिळेल.
२) जय भीम
मास आणि क्लास दोन्हीकडे नावाजलेला हा चित्रपट एकंदरीत भारतीय सिनेमा वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. सिंघम स्टार सूर्याने वकील चंद्रूची भूमिका यात केली आहे. गोर गरीब आदिवासी लोकांच्या हक्कासाठी लढणारा वकील अशी चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात आपला हिरो कुठेच बुक्कीत दहा लोकांना मारत नाही किंवा पायाने वादळ आणत नाही. चित्रपट शेवटपर्यंत कायदेशीर पद्धतीनेच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो. चांगला अभ्यास करून हा चित्रपट बनवला गेला आहे. दिग्दर्शकाने विषय गंभीरतेने आणि अचूक मांडला आहे. अभिनेता सूर्याचे विशेष आभार मानले पाहिजे त्याने असा महत्वाचा विषय लोकांसमोर आणला. २०२१ मध्ये ज्यांनी हा चित्रपट चुकवला त्यांना अजून चांगले चित्रपट कळलेच नाही असं म्हणायला हरकत नाही. सेंगिनीच्या भूमिकेसाठी तर अभिनेत्रीला पुरस्कार दिलाच पाहिजे इतका भारी अभिनय तिने केला आहे. IMDB वर सध्या सर्वाधिक रेटिंग मिळवलेला हा चित्रपट एकदा नक्की बघा. Amazon Prime वर चित्रपट बघायला मिळेल.
३) मंडेला
प्रत्येक खेडे गावात असा माणूस बघायला मिळेल ज्याला स्वतःच असं काही अस्तित्व नसतं. पडेल ते काम करणार, मिळेल ते खाणार. ज्यावेळेस त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल तेव्हा आपल्या व्यवस्थेला या लोकांना न्याय द्यावाच लागेल. मंडेला चित्रपटाच्या नावावरून वाटेल हे नाव का दिलं असेल? चित्रपटाची कथाच तशी आहे. सगळं गाव त्याला टोपण नावाने हाक मारतंय त्याला स्वतःच काय नाव आहे हेच माहित नाही. इथून सुरु होते मंडेलाची कहाणी त्याला हे नाव कसं मिळतं, गावातील पुढारी त्याच्या मागे का पळतात. मग मंडेला यातून पुढे काय चमत्कार करतो हे सगळं मंडेला सिनेमात पहायला मिळेल. अभिनेता योगी बाबूने मंडेला एक नंबर साकारला आहे. रजनीकांत बरोबर विनोदी भूमिका करणारा योगी बाबू मुख्य भूमिकेत बघून मजा येईल. ज्यांना खेड्यातील आयुष्य माहित आहे त्या लोकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल. दक्षिणेचा सिनेमा पुढे चालला आहे त्याच आणखी हे एक उदाहरण. Netflix वर हा चित्रपट बघायला मिळेल.
४) मलिक
मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन समाजातील नात्यांचा कौटुंबिक ते राजकीय संघर्ष म्हणजे हा सिनेमा. मल्याळम अभिनेता फहाद फाज़िल म्हणजे नजरेने अभिनयाची जादू दाखवणारा कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. संपूर्ण भारतात मल्याळम सिनेमा एका वेगळ्या उंचीवर गेला आहे हे मान्य करावं करावं लागेल. संपूर्ण चित्रपटात सगळ्या घटना एकदम वास्तव दाखवल्या आहेत. चित्रपटाच्या सुरवातीला सलग पंधरा मिनिटांचा शॉट घेण्यात आला होता असं या चित्रपटाबद्दल सांगण्यात आलं होतं. चित्रपट पाहताना ते जाणवतं. चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे यात हिरो जरी फहाद वाटत असला तरी तो इतर चित्रपटांसारखा नाही. सगळ्याच ठिकाणी हिरो बरोबर दाखवला नाही. सर्व कलाकार मानवी गुण दोषांसहित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मल्याळम सिनेमा यानिमित्ताने बघायला चालू करा. Amazon Prime वर चित्रपट बघायला मिळेल.
५) सरदार उद्यम सिंग
मागच्या एक दोन महिन्यात विकी कौशल चर्चेत राहिला ते लग्नामुळे. त्यापेक्षा सरदार उद्यम सिंग या चित्रपटाची चर्चा झाली असती तर आपला इतिहास जास्त जवळून बघता आला असता आणि विकी कौशल चांगला अभिनेता आहे हे समजलं असतं. दिग्दर्शक सुजित सिरकार ने जालियनवाला बाग हत्याकांड चित्रपटात ज्या पद्धतीने मांडला आहे ते बघून अंगावर काटे येतील. सरदार उद्यम सिंग आणि भगत सिंग सोबत काम कसे करत होते असे अनेक संदर्भ वास्तववादी दाखवले आहेत. देशभक्तीचे बटबटीत संवाद या चित्रपटात एक सुद्धा नाही. चित्रपट जे झालं तसंच दाखवतो. सुजित सिरकर ने असेच चित्रपट बनवले आहेत . मद्रास कॅफे हा त्याचा उत्तम चित्रपट होता. सरदार उद्यम सिंग त्याचा दर्जाचा चित्रपट आहे. काही चित्रपट म्हणजे अनुभव असतात ते मनोरंजनापलीकडे जाऊन आपल्याशी बोलत असतात सरदार उद्यम सिंग असाच चित्रपट आहे. बघितला नसेल तर हा चित्रपट लगेच बघा. Amazon Prime वर उपलब्ध आहे.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत