MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चांगले पिक्चर पैसे नाही म्हणून ऑस्कर मिळवू शकले नाहीत

why indian films don't win oscar

अमीर खानच्या ‘लगान’ ला ऑस्कर मिळणार म्हणून त्यावेळचे न्यूज चॅनेलवाले जोरजोरात बोंबलत होते. तेव्हा ऑस्कर काय असतंय हे पण कळत नव्हतं. तरी पण वाटायचं लगानला ‘ऑस्कर मिळायला पाहिजे लका.’ लगान शेवटच्या टप्यात बाहेर पडला. ऑस्कर हुकला तरी पण लगान नंतर प्रत्येक वर्षाला न्यूजवाले तसंच बोंबलत राहिले. यावर्षी भारताला ऑस्कर फिक्स आहे असं गेली वीस वर्ष ऐकतोय. अजून तरी ऑस्कर पदरी काय पडला नाय. भारतात एकूण हिशोब केला तर वर्षात कमीत कमी हजारेक पिक्चर तयार होत असतील यात एक ऑस्करच्या लायकीचा नाही असं कसं असेल? थोडा खोलात गेल्यावर कळतंय कि आपल्या पिक्चरला ऑस्कर मिळायला काही अडचण नाही. मग अडतंय कुठं ?

आजच ऑस्करचे विजेते घोषित झाले. विल स्मिथला रिचर्ड किंगसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर जेन कॅम्पिनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला. अजूनही खूप लोकांना पुरस्कार मिळाले. पण नेहमी प्रमाणे एकही भारतीय नाव कानावर पडलं नाही. मदर इंडिया, सलाम बॉंबे, लगान आणि श्वास या चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं पण ऑस्कर काय मिळाला नाही. यामुळे काही लोकांनी असा समज केला कि भारतीय चित्रपटांचा दर्जा कमी आहे. पण तसं अजिबात नाही. सगळेच चित्रपट चांगले असतात असं नाही पण काही चित्रपट खरंच चांगले होते. मग तरी ऑस्कर का मिळाला नाही? हे उत्तर शोधूच पण त्याआधी ऑस्करसाठी चित्रपट कसे निवडले जातात ते पाहू.

Academy of Motion Picture Arts and Sciences, या संस्थेमार्फत दरवर्षी ऑस्कर दिला जातो. विविध देशातील चित्रपटांचे अर्ज संस्थेकडून मागवले जातात. ऑस्कर किंवा अकॅडेमी पुरस्कार हे मुळातच अमेरिकन चित्रपटांसाठी आहेत, म्हणजे मुळात तो चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित व्हावा लागतो. तसा न झाल्यास तो सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट या विभागात मोडतो. ऑस्कर साठी foreign language कॅटेगरी मध्ये विदेशी चित्रपटांसाठी नामांकने स्वीकारली जातात आणि त्यातून ५ चित्रपटात स्पर्धा होते आणि मग त्यातून सर्वोत्तम चित्रपट निवडला जातो.

चित्रपट निवडण्याची प्रक्रिया सोपी वाटत असली तरी तेवढी सोपी. ऑस्करची एक परीक्षक समिती चित्रपटांचं परीक्षण करत असते. चित्रपटाच्या वेगवेगळ्या विभागात काम करणारे लोक या समितीचे सदस्य असतात. आपला चित्रपट निवडला जावा यासाठी तो अधिकाधिक परीक्षकांनी पाहायला पाहिजे. इथेच सगळ्यात मोठी आपल्या चित्रपटांची गोची होते. ऑस्कर अकॅडमी तर्फे परीक्षकांना एकदा चित्रपट दाखवला जातो. पण त्याचवेळेला परीक्षक चित्रपट पाहतील अशी काही खात्री नाही किंवा त्यांच्यावर तसं काही बंधन नाही. परदेशी चित्रपट परीक्षक बऱ्याचवेळा बघतच नाहीत. त्यांनी तो पाहावा म्हणून चार पाच वेळा चित्रपटांचे स्क्रिनिंग करावे लागते. पंच तारांकित हॉटेल मध्ये स्क्रिनिंग करणे कमी बजेटच्या निर्मात्यांना शक्य नाही. चित्रपट कमी परीक्षकांनी बघितला कि सगळा खेळ मग नशिबावर अवलंबून आहे.

ऑस्करसाठी पाठवल्या जाणार्‍या चित्रपटांची निवड करण्याच्या बाबतीत भारत कमी पडत नाही. पण अचूक वेळ भारताला अजूनही साधता आली नाही. आपल्याकडे ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा होईपर्यंत ऑक्टोबर आलेला असतो. अमेरिकेत हा खेळ खूप आधीच सुरू झालेला असतो. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलपासून म्हणजे जानेवारीच्या अखेरीस वितरक चित्रपटाची चर्चा निर्माण करण्यासाठी त्यांचे पीआर किंवा मार्केटिंग करण्यास सुरुवात करतात. मार्केटिंगसाठी खर्च तर करावाच लागेल इथे आपण कमी पडतो. चित्रपट प्रसिद्धी करणाऱ्या कंपन्या साधारण एका चित्रपटाचा प्रसिद्धीचा खर्च ७०-८० लाख रुपये मागतात. ‘श्वास’ सारखा तीस लाखात बनलेला मराठी चित्रपट एवढा खर्च कसा करणार? यासाठी सरकारी पातळीवर किंवा काही संस्थात्मक पातळीवर मदत होणे अपेक्षित आहे.

आपल्याकडे पैसे आणणे हे चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीवर सोडले जाते. त्याच्यासाठी एवढे पैसे गोळा करणे जवळजवळ अशक्य आहे. ज्यांना शक्य त्यांचे मसाला चित्रपट ऑस्कर काय आपल्याकडे पण बघायचे लायकीचे नाहीत. सरकार काहीच मदत करत नाही असं नाही. सरकारी पातळीवर रक्कम काही टप्यात दिली जाते. पात्र होण्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत प्रवेश करावा लागतो. मग पुढील टप्यात अधिक निधी दिला जातो. जेव्हा चित्रपट निर्मात्यांना खरोखरच पैशाची गरज असते तेव्हा सरकारी यंत्रणा पैसे सोडायला तयार नसतात.

भारतात ऑस्करसाठी विक्री एजंट नसतात. अमेरिकेत प्रत्येक चित्रपट निर्माते चित्रपट बनत नाही तोपर्यंतच अशा एजन्टला कामाला लावतात. ऑस्कर मिळवण्याच्या प्रक्रियेत हा खूप महत्वाचा भाग आहे. हे एजन्ट लॉबिंगचे काम करत असतात. ऑस्करचे नामांकन जाहीर होण्याआधीच नियोजनाला सुरुवात करावी लागते. योग्य नियोजन करून चित्रपटाची प्रसिद्धी केली तर ऑस्कर मिळवणे फार अवघड नाही. चर्चा चांगली झाली तर अधिक परीक्षक चित्रपट पाहतील. चित्रपट चांगला का वाईट हे नंतर ठरेल पण त्याआधी तो किमान लोकांपर्यंत पोहचला पाहिजे आणि तेच आपल्या चित्रपट निर्मात्यांना जमत नाही. चित्रपटाचा दर्जा महत्वाचा आहेच पण चित्रपटाची प्रसिद्धी हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. ऑस्कर प्रचाराचा USA मधील सिनेमागृहाच्या वितरणाशी जवळचा संबंध आहे. शिवाय ऑस्करसाठी सर्व मतदारांनी विचाराधीन असलेला प्रत्येक चित्रपट पाहणे अनिवार्य नाही. अशा परिस्थितीत केवळ एकच मार्ग आहे की त्यांचे लक्ष वेधले जाईल अशी प्रसिद्धी करणे.

याबरोबरच अजून एक गोष्ट लक्षत घेणे गरजेचे आहे कि युरोपातील एखाद्या महोत्सवात पुरस्कार मिळाला म्हणजे अमेरिकेतील महोत्सवात चित्रपट कमाल करेल असं अजिबात नाही. युरोपातील परीक्षक वेगळ्या विचारधारेने चित्रपट बघतात तर अमेरिकेचे परीक्षक वेगळ्या नजरेने चित्रपटाचे समीक्षण करतात. त्यामुळे एकच चित्रपट सगळीकडे चालेल असं गृहीत धरणं चुकीचे आहे. भारतीय सिनेमांना अमेरिकेन लोकांचा विचार करुनच ऑस्करसाठी चित्रपट पाठवावे लागतील. थोडक्यात काय तर भारतीय चित्रपटांना ऑस्कर पाहिजे असेल तर एक मोठ्या उद्देशासाठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन ऑस्करसाठी रणनीती अमलात आणली पाहिजे तरच ऑस्कर शक्य आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.