सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

KGF 2 चा विषय पहिल्यापेक्षा जास्त खोल आहे, थेटरात गेल्याशिवाय कळणार नाय

kgf-chapter-2-movie-review

साडे तीन वर्षांनंतर KGF चा दुसरा भाग आला. रॉकीचा swag बघून भारावलेली जनता साडे तीन वर्षांपासून प्रतीक्षेत होती. कोरोनामुळे थोडा उशीर झाला पण म्हणून KGF ला काही तोटा झाला नाही. RRR पेक्षा KGF ची जास्त चर्चा होती. KGF च्या पहिल्या भागाने एक प्रामाणिक प्रेक्षक तयार झाला होता. सकाळच्या पहिल्या शोला झालेली तुफान गर्दी KGF साठी किती आतुर होती हे दिसत होतं. चला तर मग KGF 2 ने प्रेक्षकांना न्याय दिलाय का हे थोडं खोलात जाऊन बघू.

भारी वाटलेल्या गोष्टी

रॉकी पहिल्यापेक्षा आता जास्त शक्तिशाली झालाय. त्यामुळे जास्त ताकतवर माणसाला दुश्मन पण जास्त आहेत. पण टेन्शन नाय रॉकी सगळ्यांना पुरून उरतोय. रॉकीच्या प्रत्येक एंट्रीला टाळ्या शिट्या वाजवणाऱ्या पब्लिकला चित्रपटगृहात जाण्याआधीच हे माहित होतं. लोक ज्या अपेक्षेने थेटरात बसले होते त्यापेक्षा जास्त खुश होऊन बाहेर पडत होते. यावेळेस रॉकीची प्रत्येक एंट्री पहिल्या पेक्षा larger than life दाखवली आहे. एक दोन ठिकाणी अपवाद सोडला तर रॉकीच्या पारड्यात सगळीकडे झुकतं माप आहे. रॉकी सोडून बाकीचे कलाकार पण भारी आहेत. संजय दत्त आणि रविना टंडन दोघांची दहशत जबरदस्त दाखवली आहे. संजय दत्तची स्टाईल ते डायलॉग बाजी दरारा निर्माण करणारी आहे.

KGF ची खासियत आहे कि कथा लय दमदार आहे. यावेळेस थोडी शंका होती. पण लेखक दिग्दर्शक प्रशांत नील याने कथा मांडताना कुठेच हयगय केली नाही. पहिले दोन तास एक मिनिट पण उठणार नाही इतक्या भारी पद्धतीने त्याने पटकथा लिहिली आहे. मसाला चित्रपटाच्या कथा फार इंटरेस्टिंग नसतात. KGF ने मात्र हा नियम मोडला. एक चांगली कथा घेऊन मसाला चित्रपट तोही मूळ कन्नड भाषेतला भारतभर यशस्वी होतोय कौतुक करावं तेवढं कमी आहे. सलमान सारखया मोठ्या हिरोला घेऊन चित्रपट बनवताना कथेशी सतत तडजोड केली जाते. इथे मात्र कथा बाप आहे. मोठ्या पडद्यावर KGF चं विश्व बघताना डोळ्याची पारणं फिटतात.

सहसा दुसऱ्या चित्रपटात पहिल्या एक तासांनंतर चित्रपटाचा Climax समजतो पण KGF च्या बाबतीत दर दहा मिनिटाला स्टोरी वेगळं वळण घेतीये असं वाटतं. प्रत्येक सीन Climax कडे जातोय असं वाटतं. हॉलिवूडच्या चित्रपटात अशा पद्धतीची मांडणी असते ते KGF च्या निर्मात्यांना चांगलं जमलंय. अजूनही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एखाद्या पात्राची ताकत दाखवण्यासाठी चिन्ह वापरले आहेत. उदा. रॉकीच्या गाडीचा नंबर 8055 आहे. रॉकी येतो तेव्हा डेंजरचा बोर्ड दाखवला आहे यावरून रॉकी आणि इतर पात्रांची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

अजून एक महत्वाची आवडलेली गोष्ट म्हणजे भव्य दिव्य दिसणारे सेट. KGF ची दुनिया एकीकडे भयाण आहे आणि दुसरीकडे सोन्याची लंका आहे. या दोन गोष्टींचा ताळमेळ ठेवून डोळे दिपून टाकणारे सेट तयार केलेत. कॅमेरा हे सेट दाखवताना त्याची भव्यता अशी दाखवतो कि रॉकीची ताकत त्यातून दिसते. रॉकीच्या अगोदर गरुडाची ताकत दाखवताना पण सेटची मोठी भूमिका होती. कथेला अनुसरुन भव्यता दाखवण्यासाठी सेट उत्तम डिझायन केले आहेत. म्हणूनच KGF ची दहशत शेवटपर्यंत नजरेसमोरून जात नाही. याचं श्रेयं जातं ते फक्त सेट डिझायनरला.

खटकलेल्या गोष्टी

रॉकी एका बुक्कीत वादळ आणतोय हे मान्य करू शकतो किंवा एकटा शंभर लोकांना मारू शकतो यात काय विशेष नाही. मसाला चित्रपटात हे अपेक्षित असतंच. पण रॉकी कितीही मोठा डॉन असला तरी वाटेल तेव्हा पंतप्रधान कार्यालयात नाही जाऊ शकत. एकदा सोडून दोन वेळा रॉकी पंतप्रधान कार्यालय जातो तेही कोणत्याही अडथळ्याशिवाय. पंतप्रधान कार्यालयात जाताना त्याला साधा शिपाई अडवत नाही. दुसऱ्या वेळेस तर तो संसदेत जाऊन गोळीबार करतो. हे थोडं पचण्यासारखं नव्हतं. पण हरकत नाही. जे वास्तवात होत नाही तेच चित्रपटात बघून खुश व्हायचं असतंय, असं मानून पुढे चालू.

दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे अभिनेत्रीचा रोल काय होता हा मोठा संशोधनाचा विषय आहे. चित्रपटाच्या दोन्ही भागात हिरोईन नावालाच आहे. एक गाणं आहे ते पण काही खास नाही. हिरोला हिरोईन पाहिजे हा अलिखित नियम पाळावा लागतो म्हणून कुठे तरी थोडी जागा करून हिरोईनला संधी मिळते नाहीतर आपल्या चित्रपटांना अजून स्त्रियांना अभिनयाच्या अंगाने बघताच आलं नाही.

KGF च्या दोन्ही भागात ऍक्शन चांगली आहे पण काही ठिकाणी काय होतंय हेच कळात नाही. स्क्रीन फक्त हलताना दिसते. KGF च्या पहिल्या भागात तर हे जास्त होतं आणि दुसऱ्या भागात यात थोडीफार सुधारणा झाली आहे. पुष्पा मधील ऍक्शन खूप स्पष्ट होती. जे काही घडतंय ते एकदम स्पष्ट समजत होतं. KGF च्या या भागात ऍक्शनमध्ये अजून सुधारणा करता आली असती पण तरीही एकूण ऍक्शन चांगली आहे. शेवटची एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे रॉकीचा हिंदी आवाज. या भागात रॉकीला थोडं विनोदी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रॉकी गंभीर असतो तेव्हा एक swag असतो पण तेच विनोदी बोलताना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

काही गोष्टी खटकतील पण चित्रपटाच्या गतीत ते लक्षात येणार नाही. बुद्धीला पटत नसलं तरी मनाला खुश करण्यात KGF कुठेच कमी पडत नाही. पिक्चर बघावा लागतोय OTT वर येईल म्हणून वाट बघू नका . थेटरात बघितल्याशिवाय मजा नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.