सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नोकरीतूनन रिटायर झालेल्या लोकांना आयुष्यातून रिटायर करू नका सांगणारा शर्माजी नमकीन

sharmaji namkeen review in marathi

आयुष्याची तीस चाळीस वर्षे जेलमध्ये काढलेला कैदी सुटून आल्यावर सर्व सामान्य माणसा सारखं जगायचं ठरवतो. चांगली वागणूक म्हणून एक दोन वर्ष आधीच त्याला सोडलं जातं. बाहेर आल्यावर आनंदाने जगता येईल असं त्याला वाटतं. पण तीस चाळीस वर्षे जेलच्या बाहेरच्या दुनियेत काय काय बदल झालाय याची त्याला कल्पना नाही. रस्ता ओलांडताना भरगाव धावणाऱ्या गाड्या बघून त्याला भीती वाटतीये. जेलमध्ये रोज ठराविक काम करताना ठराविक लोकांशी बोलणं व्हायचं आता ते एकदम बदललंय. नवीन माणसांशी बोलताना त्याचा थरकाप उडतोय. ज्या हॉटेलमध्ये काम करतो तिथे थोडी चूक झाली तर ओरडणारा मालक रात्रभर डोळ्यासमोर येतोय. जेलच्या बाहेरच्या दुनियेशी जुळवून घेणं त्याला अवघड जातंय. साठी पार केलेलं वय आता नवीन दुनियेशी कसं जुळवून घेणार? वरून एवढं मोठा काळ जेलमध्ये घालवल्याने जवळचे कोणी मित्र नाहीत. या सगळ्यातून पर्याय निघेल वाटत नाही. शेवटी तो आत्महत्या करतो. The Shwashank Redemption या चित्रपटातील ही घटना काय सांगण्याचा प्रयत्न करते हे शोधण्याचा प्रयत्न करा. याच गोष्टीला थोड्या हलक्या फुलक्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारी गोष्ट म्हणजे शर्माजी नमकीन !

‘शर्माजी नमकीन’ ऋषी कपूरचा हा शेवटचा चित्रपट. ऋषी कपूरला बघून रिटायर होणाऱ्या आई बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा म्हणून कौतुक नाही पण खरंच ऋषी कपूरने जाता जाता नमकीन आठवण दिली. दर दुसऱ्या तिसऱ्या घरात निवृत्त होणारे कर्मचारी बघितले असतील. तरुण असताना काबाड कष्ट करायचं आणि रिटायर झाल्यावर मस्त जगायचं, हे आपल्या बाप लोंकांचं जगण्याचं आद्य धोरण. बाप रिटायर झाल्यावर मुलांना पण वाटतं आता वडिलांनी काम करू नये. घरात तरुण मुलं असताना वयस्कर आई बाप कामाला जातात याला काय अर्थ हे, ही आपली भारतीय समज. आई वडिलांना मुलांचं मन काळत नाही, असे आजवर खूप चित्रपट पहिले असतील. आता यावेळेस उलटा विचार करून बघा. मुलांनी वडिलांचं जगणं समजून घेतलं पाहिजे हे समजून सांगणारा शर्माजी नमकीन !

एका खाजगी कंपनीत असणारे शर्माजी (ऋषी कपूर आणि परेश रावल) रिटायर झालेत. आता दिवसभर घरात बसून काय करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. टीव्ही समोर तरी किती वेळ बसावं. योगा व्यायाम तरी किती वेळ करावा. शर्माजी यांना जेवण बनवायला आवडतं. पण रस्त्यात गाडा टाकून काही तरी विकायचं म्हणजे मुलांना लाज वाटते. अशा प्रसंगात काही करायची धरपड करावी तर मुलं म्हणणार तुम्हाला काय कमी आहे, काम करायची गरज काय ? अशी चित्रपटाची कथा आहे. कथा खूप सहज आणि फील गुड पद्धतीने दाखवली आहे. दिवसभर घरी बसून जमणार नाही म्हणून रिटायर झालेला बाप काहीतरी मार्ग शोधतोय. पोटा पाण्यासाठी कामं करावं लागतं नाहीतर काम करायची गरज काय? हे जरी खरं असलं तरी पोटाचा प्रश्न मिटल्यांनंतर प्रत्येक माणसाला जगण्याचं कारण पाहिजे. शर्माजी नोकरी करत असताना त्यांचा दिवस काही तरी केल्याच्या समाधानात जायचा. नोकरी सुटल्यानंतर एकदम ते थांबलं. मुलं कमवती झाली म्हणजे दोन वेळ खाण्याची सोय झाली पण त्यामुळे वृद्धांच्या जगण्याचा प्रश्न संपला नाही.

अजून एक गोष्ट समजून घ्या घरातील वयस्कर माणसे काम करत असतील म्हणजे ते त्यांच्या जगण्याचा अर्थ पूर्ण करतायेत. घरातील तरुणांना कामामुळे व्यस्त राहण्याची सोय झाली पण वृद्ध लोकांनी त्यांचं मन कशात रमवायचं हा मोठा प्रश्न आहे. अशा वेळेस त्यांनी त्यांची आवड जोपासली तर ते खुश राहतील. इथे तरुणांनी काय काम करावं काय करू नये अशी त्यांच्यावर बंधने आणून त्यांच्या जगण्याला मारू नये. थोडक्यात काय तर तरुण आणि वृद्ध यांनी एकमेकांशी संवाद करून एकमेकांचं मन समजून घेतलं पाहिजे. माणसं नोकरीतून रिटायर होतात आयुष्यातून नाही हे आपण समजून घेतल्याशिवाय एकमेकांच जगणं मान्य होणार नाही.

या चित्रपटातील आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे वडिलांवर लय अन्याय होतोय अशा भाषेत हा चित्रपट नाही. मुलगा आणि वडील हे एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतायेत प्रेम करण्यात कमी पडत नाहीत. हा चित्रपट कुटुंबावर आहे इथे हिरो व्हिलन अशा नजरेतून चित्रपट बघू नका. एका कुटुंबात असणाऱ्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र राहताना काय अडचणी असतात आणि प्रेमाच्या जोरावर त्या कशा सोडवल्या जातात यावर भाष्य करणारा हा नमकीन विषय एकदा बघायला काहीच हरकत नाही.

ऋषी कपूरचा अभिनय खूप गोड आहे. बाकी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. जुही चावलाला नेहमीप्रमाणे बघून प्रसन्न वाटतं. तिच्या भूमिकेनं महिलांचा प्रश्न देखील हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. गोंधळ करणारा हा चित्रपट नाही. आपल्या घरातील माणसे आपल्याशी रोजच्यासारखं बोलतायत असं वाटणारा हा चित्रपट आहे. परेश रावल अभिनयात बाप आहेच. ऋषी कपूरचा राहिलेला शर्माजी परेश रावलने परिपूर्ण साकारला आहे. ऋषी कपूरने साकारलेल्या शेवटच्या भूमिकेला नमकीन केलं पण यानंतर तो गोड चेहरा आपल्यात नसणार ही सल मनात कायम राहील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.