ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे. बाळासाहेबांचा कट्टर माणूस शिवसेनेच्या माणसाला कसं काय मारेल हे शीर्षक वाचून तुम्हाला वाटलं असेलच. पण ज्या लोकांनी आनंद दिघेंना जवळून पाहिलंय त्या लोंकांचे अनुभव ऐकल्यावर कळेल आनंद दिघे जनतेसाठी जगणारा माणूस होता. जिथं जनतेला न्याय तिथं कुणाची खैर नाही, हेच तत्व आनंद दिघेंनी मरेपर्यंत पाळलं. धर्मवीर मु. पो. ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि आनंद दिघेंचा विषय चर्चेला आला. ट्रेलर पहिला नसेल तर लगेच बघा. प्रवीण तरडे यांनी अंगावर काटा येईल असा आनंद दिघे यांचा जीवनपट डोळ्यासमोर उभा केलाय. प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या भूमिकेत आहे. दुश्मनांना थरकाप उडवणारा आणि त्याच वेळेला आपल्या लोंकांसाठी तळमळीने झटणारा आनंद दिघेंचा स्वभाव महाराष्ट्राला परिचित आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा असा आहे जो मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाने स्वतः अनुभवला आहे. त्या वेळेस हा दिग्दर्शक लहान मुलगा होता ज्याच्या समोर आनंद दिघेंनी शिवसेना नगरसेवकाच्या कानाखाली मारली होती.
बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि ७० च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही. स्वतःला त्यांनी जनतेसाठी अर्पण केलंय असं ते म्हणायचे म्हणून ते घरी राहत नसत. जिथं कार्यालय होतं, तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे. शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुलटाईम कार्यकर्ता मिळाला होता. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती.
यादरम्यान दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात ‘जनता दरबार’ भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी ६ वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत म्हटल्यावर ते हात उचलायला मागे पुढे बघत नव्हते. यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला होता.
साधारण १९८९ च्या आसपास आनंद दिघे यांच्याकडे एक महिला तिचा प्रश्न घेऊन आली होती. नुकताच तिचा नवरा मेला होता. नवरा गेल्यांनतर कुटुंब जगवण्यासाठी तिला पिठाची गिरणी टाकायची होती. पिठाची गिरणीसाठी काही परवानग्या महानगरपालिकेकडून पाहिजे होत्या. ही महिला स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करत होती. अनेक ठिकाणी खेटे मारून पण पदरी निराशा असताना या महिलेने शेवटचा पर्याय म्हणून आनंद दिघे यांच्या जनता दरबारात हा प्रश्न मांडला. विधवा महिलेला मदत करायची सोडून त्रास दिला जातोय यावर आनंद दिघेंना राग आला. लगेच त्यांनी ती महिला ज्या भागात राहते तिथल्या स्थानिक नगरसेवकाला बोलावले. नगरसेवकाला सदर महिलेबद्दल विचारले तर नगरसेवक त्या महिलेला ओळखत होता. एवढंच नाही तर घराजवळच राहते असं म्हणाला. हे ऐकून आनंद दिघेंनी नगरसेवकाला जवळ बोलावले. नगरसेवक जसा जवळ आला तशी जोराची कानाखाली लावली. शिवसेनेचा नगरसेवक असूनही आनंद दिघेंनी कसलाच विचार केला नाही. नगरसेवकाला खडसावून सांगितले तुझ्यासाठी ही गोष्ट मोठी नसेल पण त्या बाईसाठी तिच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. हे सगळं चालू असताना त्या महिलेसोबत एक लहान मुलगा होता जो हे सगळं बघत होता. त्याच्या डोळ्यात आनंद दिघे यांच्याबद्दल कमालीचा आदर निर्माण होत होता. हा मुलगा म्हणजे स्ट्रगलर सालाचा दिग्दर्शक विजू माने. विजू माने आज मराठी चित्रपट विश्वात चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याच्या लहानपणी घडलेला हा किस्सा त्याने स्वतः सांगितला आहे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?