सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बाळासाहेब मंत्री पद द्यायला तयार होते पण दादा फक्त शिवसैनिक म्हणून जगले

दादा कोंडके म्हंटल कि मला तर पळवापळवी आठवतो. त्यांचा हा चित्रपट माझा फेव्हरेट आहे. किती तरी वेळा मी आणि माझ्या मित्रांनी पळवापळवी बघितला असेल. दादांचे बाकी चित्रपट देखील खूप प्रसिद्ध आहेत लोकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिलं. दादा कोंडके फक्त चित्रपटापुरते मर्यादित नव्हते. वेळो वेळी त्यांनी सामाजिक भूमिका घेतल्या. कधी त्यांना त्या भूमिकांचं फायदा झाला तर बऱ्याच वेळेस ते वादात पण अडकले. दादा कोंडके मोठे दिलदार माणूस होते. १९९५ ला शिवसेना भाजपचं युती सरकार आल्यावर दादांनी मंत्री नाकारलं आणि फक्त शिवसैनिक म्हणून वावरले. आजच्या परिस्थिती मध्ये अस होणे म्हणजे अशक्य वाटेल.

सोंगाड्या दाखवायला थेटर मालकांनी नकार दिला होता.

दादा कोंडकेंच्या अनेक चित्रपटांच्या वेळी काही ना काही वाद झाले. दादांचं पडद्यावरचं पदार्पण भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या सिनेमातून झालं पण त्यांचा पहिला मोठा सिनेमा होता ‘सोंगाड्या’. दादांनी स्वतःच या सिनेमाची निर्मिती केली होती. ‘सोंगाड्या’च्या प्रदर्शनावेळीही वाद झाला. मुंबईतल्या ‘कोहिनूर’ थिएटरने हा सिनेमा लावायला नकार दिला आणि मग थिएटरबाहेरच निदर्शनं सुरू झाली. दादांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदतीची विनंती केली. मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून शिवसेनेनेही थिएटर मालकाविरुद्ध दादांची बाजू घेतली.
“बाळासाहेबांनी यात स्वतः लक्ष घातलं आणि सगळे शिवसैनिक त्यात सहभागी झाले. हा चित्रपट थिएटरमध्ये लागावा यासाठी मोठं आंदोलन झालं.” “सेनेच्या आंदोलनामुळे अखेर थिएटर मालकाला ऐकावं लागलं आणि ‘सोंगाड्या’ कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भरपूर चालला. दादांच्या स्टारडममध्ये बाळासाहेबांकडून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मौल्यवान मदतीचा मोठा हात होता असं दादा कोंडके नेहमीच त्यांचा भाषणांमध्ये उल्लेख करायचे.

दादा त्यांच्या जन्माचा किस्सा नेहमी सांगायचे.

दादांची प्रत्येक गोष्ट नाट्यमय होती, असं म्हटलं तरी हरकत नाही. कृष्णाष्टमीला जन्माला आले म्हणून दादांचं नाव कृष्णा ठेवलं गेलं. पण त्यांना सगळे ‘दादा’च म्हणत असत. त्यांच्या जन्माची कथाही थोडी गमतीशीरच आहे. दादांच्या आधी जन्माला आलेली काही भावंडं दगावली होती आणि दादांचीही प्रकृती जन्मतः नाजूक होती. त्यामुळे सगळ्यांना त्यांची काळजी होती. जन्मानंतर दवाखान्यात असतानाच त्यांचे मामा त्यांना आणि त्यांच्या आईला भेटायला दवाखान्यात आले. मामा आले म्हणून संध्याकाळी घरी लवकर, या असा निरोप दादांच्या वडिलांकडे मिलमध्ये पाठवण्यात आला. पण वडिलांना निरोप मिळाला तो फक्त “घरी लवकर बोलवलंय” एवढाच. हे ऐकून त्यांचा समज झाला की मूल वारलं. दादांचे वडील आणि चुलते दोघं मिलमधून आले, त्यांच्याबरोबर दोन-अडीचशे कामगारसुद्धा आले. हे पाहून हॉस्पिटलचे कर्मचारी चक्रावले ! दादांच्या वडिलांनी जेव्हा विचारणा केली की “मूल कधी गेलं?” तेव्हा कळलं की मुलाला काहीही झालेलं नाही. बाळाचा मृत्यू झाला आहे असच त्यांचा वडिलांचा समज झाला होता.

बँड पार्टी पासून सुरुवात करून सिल्व्हर स्क्रीन पोहचले.

दादांचा कलेशी संबंध आला तो एका बँडमार्फत. मुंबईत असताना काही मित्रांसोबत दादा एका बँडमध्ये होते. तरुणपणी दादा काँग्रेस सेवा दलाचंही काम करायचे. इथून त्यांचा नाटकांशी संबंध आला. दादा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने रंगभूमीवर आले ते ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकामधून. लेखक वसंत सबनीस यांनी दादांच्या विनंतीवरून ‘विच्छा…’ लिहिलं आणि ते झपाट्याने लोकप्रिय झालं. महाराष्ट्र आणि गोव्यात ‘विच्छा’चे दीड हजार प्रयोग झाले. प्रेक्षकांना ‘विच्छा’ने वेड लावलं होत. ‘विच्छा…’प्रयोगानंतर दादा महारष्ट्रात पोहचले होते.

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावाने शिवसैनिक झाले.

राजकारणाशी दादांचा पहिला संबंध आला तो काँग्रेस सेवा दलातून. पण दादांची भविष्यात कधी काँग्रेस पक्षाशी जुळलं नाही. काँग्रेस पक्षाशी त्यांचे नेहेमीच मतभेद राहिले. काँग्रेसवर घणाघाती टीका करत महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार करणारे दादा कोंडके जुन्या वयस्कर लोकांच्या लक्षात असतील. मी स्वतः शिवसेनेच्या अधिवेशनातील दादा कोंडकेच भाषण इंटरनेटवरून ऐकलं आहे. कोल्हापूरच्या अधिवेशनात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना त्या अधिवेशनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. कॉम्रेड डांगेंनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या भाषणानंतर दादा बोलायला उभे राहिले. दादांनी केलेल्या भाषणाने शिवसैनिकांना भारावून सोडलं. त्यांनी कॉम्रेड डांगेचं भाषण झाकून टाकलं होत.
‘एकटा जीव’ मध्ये बाळासाहेबांचा आणि दादांचा एक विशेष किस्सा आहे. 1995 साली सेना-भाजप युतीचं बहुमत आल्यानंतर मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीसाठी बाळासाहेबांनी दादांना बोलावलं होतं. या बैठकीत बाळासाहेबांनी दादांना विचारलं की ” दादा, तुम्हाला कोणती जागा (मंत्रिपद) पाहिजे ?” यावर दादांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला आणि विचारलं ते कोणती जागा घेणार आहेत. आपण शिवसेनाप्रमुखच राहणार असं बाळासाहेबांनी सांगितल्यावर “मी शिवसैनिकच राहणं पसंत करेन, कारण त्याचा मान सगळ्यात मोठा !” असं उत्तर दादांनी बैठकीत दिलं.

आज काळ सर्वच जण कोणत्या ना कोणत्या पदासाठी सत्तेसाठी राजकारणात येतात मग ते अभिनेते असो कि समाजसेवक पण तो काळ वेगळा होता ती लोक वेगेळी होती.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.