सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे आयपीएल रंगेल कि रंगत संपवेल?

२०२२ च्या आयपीएलचा थरार २६ मार्च पासून सुरु होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दर वर्षी आयपीएल म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. या वर्षी मात्र बीसीसीआयने आयपीएलसाठी नवे नियम आणल्यामुळे चाहत्यांमध्ये शंका आहे कि नव्या नियमांमुळे आयपीएलचा थरार कमी तर होणार नाही ना ?
मागचे दोन हंगाम करोनामुळे अर्ध्यात बंद करावे लागले होते. या वर्षी तसं होऊ नये म्हणून बीसीसीआयने नवे नियम आणले आहेत. त्यामुळे नियम सर्व चाहत्यांना माहित असायला पाहिजे.

बायो बबलचा भंग केला तर खेळाडूंना कोटी रुपयांचा दंड

मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद या तीन शहरातच या वर्षीचा आयपीएल होणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. कोरोना पासून खेळाडूंना दूर ठेवायचे असल्यामुळे बायो बबलचे नियम खूप कडक केले आहेत. नियम तोडणाऱ्या खेळाडूंना एक कोटी पर्यंतचे दंड ठरवले आहेत. पहिला नियम तर हा आहे कि, ‘बायोबबल मध्ये कुणीही बाहेरील व्यक्तीस प्रवेश देण्यात आला तर एक कोटी रुपये दंड म्हणून आकारण्यात येतील. या पार्श्वभूमीवर संबंधिताला सात दिवसांचं पुन्हा विलगीकरण करावं लागेल. विलगीकरणाच्या कालखंडात संबंधित व्यक्ती जेवढ्या लढतींमध्ये खेळू शकणार नाही, त्यांचं मानधनसुद्धा वजा केलं जाईल’.

खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही कठोर नियम

आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळाडू आणि मार्गदर्शकांसमवेत पत्नी-प्रेयसी आणि मुलं सोबत राहण्यास परवागी असते. परंतु कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे त्यांच्यावरही बंधने लादण्यात आली आहेत. या कौटुंबिक सदस्यांकडून पहिल्यांदा परिघाचं उल्लंघन झाल्यास खेळाडू आणि कुटुंबाला सात दिवसांचं विलगीकरण पुन्हा करावे लागेल. पंच, मार्गदर्शक आणि अन्य अधिकाऱ्यांसाठीही सारखीच कारवाई होईल. दुसऱ्यांदा चूक झाल्यास संबंधित कौटुंबिक सदस्याची बायो बबलमधून हकालपट्टी करण्यात येईल. याशिवाय क्रिकेटपटूला आणखी सात दिवसांच्या विलगीकरणाला सामोरं जावं लागणार.

कोरोनाचे नियम

बायो बबलमध्ये नियमित कोरोना चाचण्या करून घेणं सर्वांना बंधनकारक असेल. पहिल्यांदा चूक झाल्यास ताकीद दिली जाईल, दुसऱ्यांदा चूक घडल्यास 75 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. याचप्रमाणे स्टेडियम किंवा सरावाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. ‘बीसीसीआय’ने सर्वांत मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसं शक्य न झाल्यास आयपीएलची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.

ज्यांचे पॉईंट जास्त तेच सुपरओव्हर मध्ये विजेते म्हणून घोषित केले जातील.

आयपीएलसाठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे.

बॉलला लाळ लावायला बंदी

लकाकी मिळवण्यासाठी चेंडूला लाळ लावता येणार नाही. कोरोना काळात खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क कमीत कमी असावा तसंच जंतूंचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गोलंदाज चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करतात. अनेक गोलंदाज गोलंदाजी करतात तसंच चेंडू अनेक क्षेत्ररक्षकांकडे जातो. एकाच्या लाळेत विषाणू असल्यास त्याचा त्रास अन्य खेळाडूंना होऊ शकतो. खेळाच्या माध्यमातून चेंडू फलंदाजांकडे तसंच तपासणीसाठी अंपायर्सकडेही जातो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

या वर्षी आयपीलचा स्पॉन्सर देखील बदलला आहे. विवो कडून टाटाने स्पॉन्सरशिप घेतली आहे. स्पॉन्सरशिप सोबत लखनौ आणि अहमदाबाद हे संघ देखील वाढले आहेत. २६ मार्चला पहिला सामना होणार आहे तर २० मे ला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद मध्ये अंतिम सामना होणार आहे.


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.