दर रविवारी सकाळी आठ वाजता चांडाळ चौकडीच्या करामती मालिकेचा भाग येतो. लोक या वेब सीरिजसाठी किती वाट बघतात हा विषय पुढे जाण्याअगोदर व्हिडिओ खाली कशा कंमेंट असतात एकदा वाचा.
मी इंडियन आर्मी मध्ये आहे माझी ज्या जागेवर ड्युटी आहे तिथे नेटवर्क नाही मी रविवारी दोन किलोमीटर चालत येतो फक्त तुमची वेब सिरीज बघण्यासाठी, खूप छान एपिसोड असतात.
आर्मीत असणाऱ्या तरुणाची कमेंट वाचून अंदाज घ्या कि ही वेब सिरीज महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर पोहचली आहे. एवढ्यात थांबू नका अजून पुढच्या एक दोन कमेंट बघा
चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत असतो अगदी त्याच उत्सुकतेने बाळासाहेब आम्ही तुमच्या सिरीजची आठवडाभर वाट पहात असतो, कधी रविवारची सकाळ उगवते असे होत असते
जुन्या शक्तिमान मालिकेची आपण जशी आतुरतें ने वाट पाहायचो त्याची जागा आता चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज ने घेतली अस वाटत !
चांडाळ चौकडीच्या करामती ही सगळी टीम कुठल्या फिल्म इन्स्टिटयूट मध्ये अभिनयाचे धडे घेतलेली नाही. जेमतेम दहावी बारावी शिकलेली ही सगळं माणसं अभिनयाच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या मनावर राज्य करून आहेत. रामभाऊ , सुभाषराव आणि बाळासाहेब या तिघांच्या केमिस्ट्रीने अक्षरशः वेड लावून टाकलंय. यु ट्यूब वर पाच मिनिटाचे व्हिडिओ बघायला कंटाळणारे लोक चांडाळ चौकडीच्या करामतीचे एकेक तासाचे एपिसोड बघतात. सुरुवातीला यांचे व्हिडिओ अर्ध्या तासाचे असायचे पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर व्हिडिओ एक तासापर्यन्त बनवले गेले. मराठी कॉन्टेन्टला लोक बघत नाही तुम्ही हिंदी मध्ये करा म्हणजे लोक बघतील, असे बोलणारे खूप ऐकले आतील पण यांनी आपल्या मातृभाषेत ज्या पद्धतीने विनोदी व्हिडिओ बनवले ते चांगल्या चित्रपट निर्मात्याला सुद्धा जमलं नाही. चांडाळ चौकडीला जो ग्रामीण महाराष्ट्र समजला तो पुणे मुंबईतील यु ट्युबर्सला अजिबात समजला नाही. वेब सिरीज मधील सगळीच पात्रे अफलातून आहेत पण बाळासाहेबांना तोड नाही. सहा फुटीचा हिरो चित्रपटात कडक एंट्री घेतो तेव्हा थेटरात आवाज करणारी हिरोची फॅन मंडळी बघितली असेल. पण जो चित्रपटात दारू पिल्यावर दोन पायावर नीट उभा राहत नाही, पिऊन रस्त्याच्या कडेला बिनधास्त झोपतो अशा सदैव तर्राट बाळासाहेबांच्या एन्ट्रीची दर रविवारी सकाळी आठ वाजता वाट बघणारे प्रेक्षक कधी बघितले नसतील.
दारू पिल्याशिवाय दारुड्याची भूमिका करत नसणार म्हणून पैज लागायची
बाळासाहेब म्हणजे भरत शिंदे हे कोणाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी आयुष्यात एकदाही दारूचा थेंबही स्पर्श केला नाही. बारामती जवळ कांबळेश्वर हे त्यांचं मूळ गावं. चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये हेच गाव दाखवलं जातं. भरत शिंदे यांचा अभिनय बघून कित्येक लोक पैज लावायचे कि दारू पिल्याशिवाय असा अभिनय करू शकणार नाहीत. पण जेव्हा हे समजलं कि व्यसनमुक्तीच्या कामात भरत शिंदे यांचा सहभाग असतो तेव्हा लोकांच्या भुवया उंचावल्या. याचबरोबर भरत शिंदे हे कीर्तनकार सुद्धा आहेत. वारकरी संप्रदायातील त्यांची ही तिसरी पिढी आहे. त्यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ यु ट्यूबवर सहज बघायला मिळतील. गावात पथनाट्य, नाटकात बाळासाहेब छोट्या छोट्या भूमिका करायचे. त्यांना दारुड्याचं पात्र कसं सापडलं याची पण गंमतीशीर गोष्ट आहे.
सुभाषराव आणि रामभाऊ हे पथनाट्य, नाटक यात आधीपासून आघाडीवर होते. बाळासाहेबांनी एकदा या दोघांना विनंती केली कि मला पण तुमच्या सोबत घ्या. नाही हो करून त्यांनी भरत शिंदेना घेतलं. पण भूमिका कशाची करणार हे विचारल्यावर भरत शिंदे म्हणाले मी दारुड्याची भूमिका करतो. त्यानुसार भरत शिंदे यांनी दारुडा बाळासाहेब रंगमंचावर उतरवला. तो पाहून प्रेक्षक इतके खुश झाले कि बाळासाहेब ज्या गावात नाटकांचे प्रयोग करत तिथे बाळासाहेब हे पात्र तुफान गाजत. जवळपास साडे पाच हजार प्रयोग त्यांनी केले. बाळासाहेब, रामभाऊ या सगळ्या नटांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. याचमुळे ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत दोघांना अभिनय करण्याची संधी मिळाली. हे सगळं चालू असताना बाळासाहेब आणि त्यांच्या टीमला वेब सिरीजकडे वळलं पाहिजे हे जाणवलं. दोन वर्षांपूर्वी चांडाळ चौकडीचा पहिला भाग आला. अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षकांनी याला प्रतिसाद दिला. दोन तीन महिन्यातच चार ते पाच पाच लाख Subscriber झाले. कांबळेश्वरच्या आसपासच्या गावात पोहचलेलं बाळासाहेब हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं. चांडाळ चौकडीच्या करामतीचे व्हिडिओ ३५ कोटीहुन अधिक वेळा पहिले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक गाजलेली वेब सिरीज म्हणून चांडाळ चौकडीच्या करामती टॉपच्या यु ट्यूब चॅनेल मध्ये येते.
भरत शिंदे यांना अभिनयाची आवड होतीच पण बाळासाहेब या पत्राने त्यांच्या अभिनयाला न्याय दिला. बाळासाहेब म्हणतात जे अंगात आहे ते बाहेर काढलं की लोकांना आवडतं आणि ते बिनधास्त केलं कि अभिनय खुलतो. बाळासाहेब प्रत्येकाला आपल्या गावातील दारुडा वाटतो. तो बघताना आपल्या आसपासच्या माणूस आपल्याशी बोलतोय असं वाटतं. हीच भरत शिंदे यांची ताकत आहे कि ग्रामीण भागातील कोणालाही बाळासाहेब निख्खळ मनोरंजन देण्यात यशस्वी ठरतो. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजची जादू एवढी आहे कि काश्मीर मध्ये तैनात असणारे महाराष्ट्राचे जवान दर आठवड्याला प्रोजेक्टरवर मिळून ही वेब सिरीज बघतात. बाळासाहेब आणि त्यांच्या टीमने एक चांगला सिनेमा बनवून महाराष्ट्राला मनोरंजन क्षेत्रात वेगळ्या उंचीवर घेऊन गेलं पाहिजे एवढी क्षमता त्यांच्यात आहे. भरत शिंदे यांनी तशी इच्छा बोलून दाखवली होती.
गावच्या राजकारणात भरत शिंदे यांचा वट आहे
भरत शिंदे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण गावातील प्रत्येक सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भजन, कीर्तनाचा वारसा लाभलेले भरत शिंदे गावच्या विकासासाठी सतत झटत असतात. गावातील लोकांना यामुळे भरत शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे याच विश्वासातून गावकऱ्यांनी भरत शिंदे याना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे केले. ते जिंकले सुद्धा. चांडाळ चौकडीच्या करामती मधील सुभाषराव, रामभाऊ यांचा ही कांबळेश्वर गावच्या राजकारणात सक्रिय सहभाग असतो. भरत शिंदे यांच्या पत्नी दुर्गा भरत शिंदे या गावच्या सरपंच आहेत. वेब सिरीज गाजली आणि त्यांनतर गावाच्या कामाला वेळ देणे शक्य नाही म्हणून स्वतःहून भरत शिंदे यांनी राजकारणातून माघार घेतली. तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याचं त्यांनी आवाहन केलं. आता ते वेब सिरीजसाठी जास्तीत जास्त वेळ देतात. उरलेला वेळ कुटुंब आणि गावासाठी देतात.
हे पण वाचा
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?