प्रिय ज्योतीबा,
खूप वर्षांनी पत्र लिहिण्याचा योग येतं आहे. मनात साठलेल्या काही गोष्टी पत्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी ९ जानेवारी २०२२ रोजी ‘फातिमाचा’ गूगलने तिच्या जयंती निमित्त डूडलवर केलेला जागतिक सत्कार खरंच यथोचीत होता. आपण आपल्या कार्याची सुरूवात केली तेंव्हा, समाजाने आपणा दोघांस वाळीत टाकले होते. घरच्यांशीही वैचारिक मतभेद होऊन शेवटी आपल्यास घर सोडण्यास भाग पडले. तेंव्हा फातिमाचा भाऊ ‘उस्मानने’ आपल्याला त्यांच्या घरात घेतले आणि नवीन वैचारिक, संस्कृतीक, शैक्षणिक क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुलींच्या शिक्षणाचं घेतलेलं व्रत टिकून राहिलं.
आपण पाहिलेल्या स्वप्नाला शेवटी आज गोड फळं लागलेली दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुली आज आपल्या योग्यतेची मोहोर उमटवताना दिसल्या की मन भरून येतं. वाटतं जाऊन कवटाळवं त्यांना. त्यांना भरभरून सांगावं आपल्या काळाविषयी, आपल्या काळातल्या मुलींच्या अवस्थेविषयी… आणि थोडंफार आपल्या कामाविषयीही ! आपण कुठलीही जात, धर्म, लिंग न पाहता शिक्षणाची दारं खुली केली…. शुद्र-अतिशुद्रां बरोबरच उच्च वर्णीयांसाठीही विधवाविवाह आणि बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आपला लढा कुण्या जातीविरुद्ध नव्हताच मुळी… तो होता फक्त मानसिकतेविरुद्ध ! माणसाने माणसासोबत माणसासारखे वागण्याच्या सरळ साध्या सोप्या नैसर्गिक गोष्टीबद्दल !
अलीकडं जग बरंच बदललंय. विज्ञान-तंत्रज्ञान आणि इंटरनेट जाळ्यानं सर्वांना ऐकमेकांशी जोडलंय. मुलं- मुली आता शाळा कॉलेजांत आता एकत्र वावरतात. त्यांचं मिळून-मिसळून वागणं पाहून वाटतं की कुठलेच भेद नसतील त्यांच्यात ! कित्ती छान मनासारखं आकाशात मनसोक्त उडणाऱ्या पाखरांसारखं स्वातंत्र्य जगता येतं असेल त्यांना ! मोकळ्या मनानं असं विचार करणं, वावरणं हेच खरं तर माणसाच खरं जगणं. त्या जगण्याचा भक्कम आधार डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हा आहे. त्यामुळं नेते लोकंही त्यांचं मन किती मोठं आणि भेदरहित आहे असंच दाखवताना दिसतात. कुणी संकुचित वागायला लागला की शिवबा राजे, शाहू महाराज आणि तुमचे दाखले देतात म्हणे. राजकारणात कुकृत्य गिरवतानाही काही नेते मात्र फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा मिरवताना दिसतात. त्यांना सत्याचा आरसा दाखवण्याची गरज आहे. पण सत्यही आता शोधून सापडणं अवघड आहे. पूर्वी कसं कुणी नेता किंवा तत्त्वव्यत्ता बोलायचा तेंव्हा लोकांना त्यांचा “आपला माणूस” सापडायचा. पोटतिडकीने माणसांच्या समृद्धतेसाठी कितीतरी समाजसुधारकांनी आपलं जिवन वाहिलं. पण आज कुठल्याही कार्याला स्वार्थाचा वास येतो. दिडसे वर्षांपूर्वी आपण ज्या गोष्टींविरुद्ध आपलं सर्वस्व त्यागलं त्याच गोष्टी आजही पाहायला मिळातात तेंव्हा खूप त्रास होतो.
आपण जाती-धर्माच्या भिंती पाडल्या पण मनामनातल्या भिंती नाहीश्या व्हायला तयार नाहीत. हे खूप चिंताजनक आहे. पूर्वी वाटायचं की संकुचित वागणं याला शिक्षणाचा अभाव हे कारण असेल. पण मोठं-मोठया पदांवरले; समाज-सुधारक, वाचून अधिकारी झालेले लोकही संकुचितपणे वागतात तेंव्हा जीव कासावीस होतो. शिक्षणाने लोक खरंच साक्षर होतात का हाच प्रश्न पडतो. दरवर्षी हजारो पुस्तकं वाचणारी माणसं इथे भेटतील पण थॉमस पेनच “राईट ऑफ मॅन” वाचून संपूर्ण जिवनात बदल घडवून लोकांसाठी संपूर्ण जिवन वाहून घेणारे तुमच्या सारखे विरळ दिसतील. उदार आणि उपदार माणसंही नमाशेष होतं आहेत असं वाटतंय. तुम्ही कर्मठ धर्मांधतेने व्यापलेल्या त्या काळात व्यवस्थेला हादरे देऊन अस्पृशांसाठी आपल्या घरातला हौद रिकामा केला होता. पण आज रस्त्यावर कुणाचा अपघात झाला तर इस्पितळात पोचवायलाही कुणी सरसावत नाही. इथे सर्वजन आपापल्यात एवढे गुंतलेत की आजूबाजूस पाहण्यास कुणासही आता क्षणभर वेळं नाही. पण मोबाईलात पाहून सोसीयल का काय म्हणतात त्या मिडियावर हळहळ व्येक्त करतात. आणि आपल्या जयंत्या-पुण्यतिथ्यांकडेही आता राजकारणापलीकडे पाहिलं जात नाही.
अलीकडंच पुणे खूप बदलंय खरं, पण मन रमत नाही तेवढं. फातिमाचीही खूप आठवण येते. ती सोबत असली की नेहमीच हायस वाटायच. पुणे विद्यापिठास माझं नाव दिल आहे आणि माझ्या पूर्णाकृती पुतळ्याच अनावरही अलीकडेच झालं आहे. पण भिडेवाड्याकडं पाहून जीव आजही तगमगतो. पुन्हा एकदा मुलींची शाळा भरवावीशी वाटते. पण यावेळी उद्देश मुलींना नुसतं साक्षर करणं नसून त्यांना व्यापक वैचारिक दृष्टीकोण देणं हा असेल. उद्याची आई अशी आधुनिक पुरोगामी झाली म्हणजे जाती-धर्म-लिंग भेदाचे किडे नाहीसे होतील. मूल्यशिक्षण इथल्या समाजात रूजेल आणि सर्व समाज यावेळीतरी पूर्णतः समृद्ध होईल. तरंच आपलं अंतिम ध्येय पूर्ण होईल. मला विश्वास आहे. आपण हे कार्य नक्कीच फत्ते करू.
आपलीच,
सावित्री.
(सदरील पत्र हे काल्पनिक आहे.)
✍🏽करणकुमार जयवंत पोले, परभणी
E-mail:- polekaran@gmail.com
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?