सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कोरोना संपल्याची चाहूल लागताच सोन्याची मागणी वाढलीय

भारतीय परिवारांमध्ये सोन्याचं महत्व वेगळं सांगायची गरज नाही. विशेष करून आपल्या आईला सोन्याबद्दल विचारलं तर एखाद्या अर्थ शास्ञज्ञ पेक्षा चांगलं समजून सांगेल. अडीचणींच्या काळात घरी असलेलं सोनंच आपल्या कामाला येत. ” मी बारावीला असतानाचा एक किस्सा सांगतो, जून, जुले महिना होता, शेतात पेरणीचे दिवस होते शेतकऱ्याच्या घरी पेरणीचे दिवस असल्यावर काय परिस्थिती असते हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक शेतकरी त्याचे सर्व पैसे बी-बियाण्या मध्ये टाकतो. त्या काळात इतर कामासाठी पैसे उरत नाहीत. असच काहीस आमच्या घरी झालं होत. घरची परिस्थिती बिघडली होती आणि दुर्दैवाने त्याच काळात शाळा महाविद्यालये चालू होतात. मी बारावीला होतो, शिकण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे होते. घरी पैसे नव्हते म्हणून काय करावे ह्या चिंतेतच वडील होते. मला तर वाटलं एखादं वर्ष घरीच राहावं लागतं कि काय पण तसं झालं नाही. आईने तिचं सोन वडिलांकडे दिलं. वडिलांनी ते बँकेत ठेवून पैसे घेतले आणि मी शाळेत जाऊ शकलो.”
हा सर्व प्रकार आयुष्यात पहिल्यांदाच बघितल्यामुळे सोन्याच महत्व माझ्या डोक्यात फिट बसलं. त्यामुळे कधीही सोन्याच्या संबंधित बातमी बघतो तेंव्हा आर्वजून त्याच्या कडे लक्ष देत असतो. तशीच बातमी आली आहे कि सोन्याची आयात वाढली आहे. आयात वाढल्यामुळे सोन्याच्या भावात बदल होऊ शकतात त्यामुळे आपल्या सर्वाना त्याबद्दल माहिती पाहिजे.

सोन्याची आयात कशी वाढली ?

मार्च २०२०मध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर देशातील सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली होती. करोनामुळे जगभरातील देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम सोन्याच्या आयातीवरही झाला होता. त्यामुळे सोन्याच्या पुरवठ्यामध्येही घट झाली होती. २०१९-२०मध्ये सोन्याची आयात ४३० टनांपर्यंत घटली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर सोन्याच्या मागणीत एकाएकी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

कोणत्या देशातून सर्वाधिक आयात ?

२०२१-२२ या वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची सोन्याची दर महिन्याची सरासरी आयात ७६.५७ टन होती. तर एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीतील एकूण आयात ८४२ टन इतकी होती. ही आयात २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांतील दरमहा सरासरी आयातीइतकीच झाली. यापूर्वी २०१५ मध्ये १ हजार ४७ टन आणि २०१७ मध्ये १ हजार ३२ टन सोन्याची आयात झाली होती. भारताने ज्या देशांकडून सोन्याची आयात केली, त्यात सर्वाधिक वाटा स्वित्झर्लंडचा (४६९.६६ टन) आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (१२०.१६ टन), दक्षिण आफ्रिका (७१.६८ टन) आणि गिनी (५८.७२ टन) या देशांचा क्रमांक लागतो.

सोने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध असतो

सोने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा जवळचा संबंध आहे. कारण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सात टक्के वाटा मौल्यवान खडे आणि दागिने उद्योगाचा आहे. तसेच देशाच्या निर्यातीमधील जवळपास १५ टक्के वाटा याच उद्योग क्षेत्राचा आहे. या क्षेत्रातून रोजगार निर्मितीही होत असल्याने या क्षेत्राचे महत्त्व मोठे मानले जाते. देशात जवळपास दीड हजार टन सोन्याचे उत्पादन होते. त्यापैकी सर्वाधिक उत्पादन कर्नाटकमध्ये होते.

मागणी वाढल्याने आयातीमध्ये वाढ झालीय

करोना काळात असलेल्या निर्बंधांमुळे लग्न सराईवेळी होणारा दागिन्यांवरील खर्च, पर्यटन, मनोरंजन आदींवरील खर्च कमी झाला. तर करोना महासाथीनंतरच्या काळात लोकांचा फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांकडे असलेला कल कमी झाला. परिणामी लोकांकडून १० ते १५ हजार रुपयांचे दागिने किंवा सोने खरेदी करून गुंतवणूक करण्यात येऊ लागली. त्यामुळे सोन्याची मागणी जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव दहा दिवसांत १९२० डॉलर प्रति औंसवरून वाढत जाऊन २०७० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली. भारतीय बाजारात ५१ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवरून ५४५०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाला डॉलर्समध्ये व्यवहार करता येत नसल्याने त्यांनी सोन्याचा चलनासारखा वापर सुरू केला. त्यामुळे रशियाकडून सोन्याच्या मागणीत वाढ झाली. तसेच युद्धामुळे भूराजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानेही सोन्याची मागणी वाढली.
मागणी वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत आणि त्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगत आहेत कि येत्या काळ सोन्याचे भाव वाढणारच आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.