सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सोलारवरचा ट्रॅक्टर निघाला तर ? किती भारी होईल ना

तीन चार वर्ष झाली असतील ह्या गोष्टीला, दिवाळीला घरी गेलो होतो. मी घरी गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या शेतात कामाला असलेले बन्सी मामा सुट्टीवर होते. दिवाळी असल्यामुळे त्या दिवशी दुसरा माणूस भेटणे मुश्किल होते. वडिलांना बाहेर गावी जायचे असल्याने जनावरांना शेतात घेऊन जायची ड्युटी माझ्यावर आली. तीन चार महिने पुण्यासारख्या शहरात राहून आलेल्या माझ्यावर शेतात जायची वेळ आली होती. दोन बैल, एक गाय, तीच एक वासरू एवढे सगळ्यांना घेऊन मी शेतात गेलो. सकाळ पासून अख्खा दिवस त्यांच्या सेवेत होतो. त्यांना खायला आणणे, पाणी दाखवणे त्यांची सोड बांध करणे. एकाच दिवसात मी थकून गेलो होतो, संध्याकाळी माझ्या अंगात बळ उरले नव्हते.

घरी आल्यावर वडिलांना सांगितलं कि, “आपण काय परत हे सगळे जनावरं घेऊन शेतात जात नसतो, आपल्याच्यान हे होत नसतंय.” मी बोलत असलेलं वडील शांत ऐकून घेत होते, मी काय काय बोलतो त्यांनी ऐकून घेतलं आणि माझ्या जवळ आले आणि शेती बद्दल सांगू लागले. वडील म्हणाले, ऐक विष्णू, “आज तू पाहिल्यान्दा दिवसभर काम केलायस म्हणून तुला त्रास होत आहे पण रोज काम केल्याने त्रास जाणवत नाही. पण तुला एक सांगू, शेतीच काम खूप कठीण आहे, जनावरांना आणि शेतकऱ्याला देखील खूप घाम गाळावा लागतो पण आपण काय करणार काम करण्याशिवाय पर्याय नाही. ” वडिलांचं सर्व ऐकल्यावर मी त्यांना सुचवलं कि ट्रॅक्टर आहे कि ट्रॅक्टरने होतात कि सर्व काम. त्यावर वडील म्हणाले हा खरं आहे तुझं पण काय न, डिझेलचे भाव एवढे वाढलेत कि ट्रॅक्टरने सगळे काम केले तर उत्पनातले निम्मे पैसे त्यातचं जातात. हा जर ट्रॅक्टर जर सोलरवर चालणारा आला तर मात्र काही तरी होईल. वडील एकदम उत्साहित होऊन म्हणत होते. विष्णू सोलारवर चालणार ट्रॅक्टर आला तर ? किती भारी होईल नाही का ?
आज बीबीसीला गुजरातच्या ‘नवीन माळी’ यांची बातमी वाचली ना सगळं प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मित्रांच्या मदतीने नवीन माळी या शेतकऱ्याने सोलरवर चालणार छोटा ट्रॅक्टर बनवला आहे.

गरज शोधाची जननी असते

गुजरातच्या ‘बनासकाठा’ या गावाचे तरुण शेतकरी ‘नवीन माळी’ शेतीत नवीन नवीन प्रयोग करतात. अनेक वर्षाच्या त्यांच्या अनुभवावरून त्यांना लक्षात आलं कि शेती करण्यासाठी आपल्याला उपकरणं व्यवस्थित पाहिजेत. शेतीसाठी ट्रॅक्टरपेक्षा महत्वाचं उपकरणं दुसरं सापडणं मुश्किल आहे. ट्रॅक्टर घ्यायचं माळी यांचं ठरलं होत पण ट्रॅक्टरच्या किंमत खूप जास्त असल्यामुळे आणि मोठ्या ट्रॅक्टरचा वापर छोट्या कामासाठी कारण अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग शोध सुरु झाला छोट्या ट्रॅक्टरचा पण छोट्या ट्रॅक्टरच्या किमती पण पाच ते सहा लाखाच्या वरच आहेत. एवढ्या किमतीचे ट्रॅक्टर घेणे सामान्य शेतकऱ्यांना घेणं शक्य नाही. तेवढं बजेट शेतकऱ्यांकडे नसतं. नवीन माळी यांच्या कडे पण ट्रॅक्टर घेता येईल पैसे नव्हते. पण ट्रॅक्टर घ्यायचा हे ठरवलं होत तिथूनच शोध सुरु झाला आणि सोलारवर चालणारा ट्रॅक्टर बनला.

मित्र हर्षद पांचाळ याला नवीनने त्याचं ट्रॅक्टर घ्यायच्या प्लॅन विषयी सांगितलं. पैसे कमी पडत असल्यामुळे आपल्याला ते शक्य नाही हे जेंव्हा नवीन बोलला, तेंव्हा हर्षदने त्याला आयडिया दिली कि आपण सोलारवर चालणारा ट्रॅक्टर बनवला तर ? तू फक्त प्लॅन तयार कर आपल्याला कसा बनवता येईल बाकीची मदत मी करतो. नवीनला ही आयडिया आवडली आणि सोलारवर चालणारा ट्रॅक्टर बनवायचा प्लॅन फिक्स केला.
नवीनने सोलर आणि ट्रॅक्टर या विषयांचा सगळा अभ्यास केला. अभ्यास करून नवीनने ट्रॅक्टर बनवण्याचा सर्व प्लॅन बनवून हर्षद पांचाळला दिला. हर्षद पांचाळचे इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान होते. इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव होता. नवीनच्या प्लॅनवर त्याने काम करायला सुरुवात केली. नवीन आणि हर्षद दोघांनी मिळून केवळ १ लाख ७५ हजारात सोलारवर चालणारा छोटा ट्रॅक्टर बनवला. आपल्याकडे एक म्हण आहे, “गरज हि शोधाची जननी आहे. हर्षद आणि नवीनच्या बाबतीत देखील तसेच झाल्याचं आपल्याला दिसतं आहे.

फवारणी , वखरणी करायला मदत होईल

नवीन माळी यांनी बनवलेल्या ट्रॅक्टरला एकदा उन्हांत चार्जिंग केली कि तो दिवस भर चालतो. ५०० किलो पर्यन्त वजन उचलण्याची त्याची क्षमता आहे. ५०० किलो पर्यन्त कामे करायला सोलार ट्रॅक्टर एकदम सोयीचा आहे. शेतीतल्या मोठ्या कामाला म्हणजे नांगरणी वैगेरे करायला मोठ्या ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही. पण छोटे छोटे कामे जे सध्या बैलांकडून करून घेतले जातात, जसे वखरणी, पेरणी ही कामे सोलार ट्रॅक्टर कडून करून घेणे शक्य आहे.
आकाराने लहान असल्या कारणाने पिकांची फवारणी करायला पण सोलार ट्रॅक्टरची मदत होऊ शकते कारण पिकामध्ये छोटा ट्रॅक्टर पिकाला हानी पोहचवत नाही किंवा ती खूप कमी असते.

नवीन माळी यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं कि, १ लाख ७५ हजारात बनवला जाऊ शकतो. आम्हाला जर पैसे मिळाले तर आम्ही नवीन ट्रॅक्टर बनवू शकतो. कमी किंमत असल्यामुळे लहान शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर घेणे शक्य होईल. नवीन यांनी बनवलेला ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरू शकतो. नवीन माळी आणि त्यांचा मित्र हर्षद पांचाळ इतर शेतकऱ्यांसाठी सोलार ट्रॅक्टरची निर्मिती करतीलच पण त्यांना वेळ लागू शकतो. तूर्तास आपण नवीन माळी यांचं अभिनंदन करून नव्या ट्रॅक्टर्सची वाट बघू.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.